Wednesday, November 25, 2026

पाकिस्तानी मालिका भारतीयांना का आवडतेय?

Share

प्रस्तावना

पाकिस्तानी कलाकार फवाद खान, माहिरा खान आणि हानिया आमिर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘जो बचे हैं संग समेट लो’ ही नेटफ्लिक्स मालिका ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होत असून, ती सध्या भारतीय समाजमाध्यमांवर आणि प्रेक्षकांमध्ये खूप गाजत आहे. एका बाजूला अनेक भारतीय नागरिक व विचारवंत आहेत, ज्यांच्या मते भारतीय लष्कराच्या ‘सिंदूर’ मोहिमेदरम्यान भारताविरोधात कठोर विधाने करणाऱ्या कलाकारांना पुन्हा डोक्यावर घेणे राष्ट्रस्वाभिमानाला धरून नाही; तर दुसऱ्या बाजूला कलाप्रेमी व समीक्षकांचा एक हळवा वर्ग आहे, ज्यांच्या मते कलेला राजकीय सीमा नसतात.

पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया

या वादाच्या मुळाशी ‘सिंदूर’ मोहिमेनंतर या तिघांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. फवाद खानने म्हटले होते की, “या लाजिरवाण्या हल्ल्यात जखमी व मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. मृतांच्या आत्म्याला शांती आणि आप्तस्वकीयांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. सर्वांना नम्र विनंती आहे की, भडकाऊ शब्दांनी आगीत तेल ओतणे थांबवा. निष्पाप प्राणापेक्षा ते मोठे नाही. सर्वांना सुबुद्धी सुचो. ईश्वरेच्छेने तसेच होवो. पाकिस्तान झिंदाबाद!”

हानिया आमिरनेही “संताप, वेदना आणि जड अंतःकरण” अशा भावना व्यक्त करत एका लहान मुलाच्या मृत्यूचा व उद्ध्वस्त कुटुंबांचा उल्लेख केला, तसेच भारतीय कारवाईला “क्रूरता”, “लाजिरवाणी” आणि “भ्याड” संबोधले.

माहिरा खानची भाषा अधिक आक्रमक होती. तिने आधी “अत्यंत भ्याडपणा! ईश्वर आमच्या देशाचे रक्षण करो, सर्वांना सुबुद्धी सुचो” असे लिहिले. त्यानंतरच्या सविस्तर निवेदनात तिने भारतावर टीका करताना म्हटले की, “मी अशा देशात राहते जिथे मला काय बोलायचे हे कोणी ठरवून देत नाही. मला स्वतःचा आवाज आहे आणि मी तो वापरू शकते. आम्ही नेहमी हिंसाचाराचा निषेध करतो, अगदी पुराव्याशिवाय माझ्या पाकिस्तानला दोषी ठरवले जाते तेव्हाही! भारता, तुमची युद्धखोर व द्वेषपूर्ण भाषा अनेक वर्षांपासून सुरू आहे. तुमची प्रसारमाध्यमे फुटीरतेच्या आगीत तेल ओततात. नरसंहार व युद्धगुन्ह्यांसमोर तुमचे प्रभावशाली आवाज भीतीपोटी शांत राहतात; हे मौनच तुमचा सर्वात मोठा पराभव आहे. मध्यरात्री शहरांवर हल्ला करून तुम्ही त्याला विजय म्हणता? लाज वाटायला हवी तुम्हाला. माझ्या पाकिस्तानवर माझे प्रेम आहे. अशा घृणास्पद चिथावणीनंतरही आपण त्या खालच्या पातळीवर कधीच उतरू नये. सर्वत्र शांतता नांदो. पाकिस्तान झिंदाबाद. पाकिस्तान चिरंजीव होवो.”

मनोरंजन की राष्ट्र: निवड आपली

मुळात ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाम हल्ल्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. या विधानांमुळे दुखावलेल्या अनेक भारतीय प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, या कलाकारांनी केवळ स्वतःच्या देशावर प्रेम व्यक्त केले नाही, तर भारतीय लष्कराच्या कारवाईला ‘भ्याड’ आणि ‘लाजिरवाणी’ ठरवून भारताच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. ज्या कलाकारांना भारतीय प्रेक्षकांनी एकेकाळी प्रचंड प्रेम, प्रसिद्धी आणि बाजारपेठ दिली, त्यांनी संकटाच्या काळात भारताविरोधी भूमिका घेतल्यानंतरही आपण त्यांच्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असू, तर ते आपल्या सामूहिक स्मरणशक्तीच्या अभावाचे लक्षण आहे. जागरूक नागरिक म्हणून मनोरंजनापेक्षा देशाचा स्वाभिमान आणि जवानांचा सन्मान मोठा असला पाहिजे. आधुनिक दृक्-श्राव्य व्यासपीठांवरील प्रत्येक प्रेक्षक-नोंद केवळ करमणूक नसून, ती संबंधित कलाकारांना आर्थिक व नैतिक बळ देणारी असते.

खरेच कलेला सीमा नसतात का?

याउलट, मालिका पाहण्याचे समर्थन करणाऱ्या किंवा तटस्थ राहणाऱ्या सांस्कृतिक समीक्षकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्या मते, दोन देशांत तणाव निर्माण होतो तेव्हा दोन्ही बाजूचे कलाकार आपापल्या देशाची भूमिका मांडतात. भारतीय कलाकार देशाच्या पाठीशी उभे राहतात, तसेच पाकिस्तानी कलाकारांनी त्यांच्या देशाची बाजू घेणे हे राजकीय वास्तव मानले पाहिजे, असे या परोपकारी गटांचे मत आहे. शिवाय, ही मालिका एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित असल्याने अनेक प्रेक्षक केवळ कथा व अभिनयाचा आस्वाद घेण्यासाठी त्याकडे पाहत आहेत. कलाकृती पाहणे म्हणजे कलाकारांच्या राजकीय मतांना पाठिंबा देणे नव्हे; लोकशाहीत नागरिकांनी काय पाहावे हे त्यांच्या वैयक्तिक विवेकावर सोडावे आणि सांस्कृतिक बहिष्काराने राजनैतिक प्रश्न सुटत नाहीत, असा युक्तिवाद या बाजूने केला जातो.

थोडक्यात

‘जो बचे हैं संग समेट लो’ या मालिकेभोवती फिरणारी चर्चा केवळ कलाकृतीपुरती मर्यादित राहिलेली नाही; ती आजच्या प्रेक्षकांसमोर एक मोठा नैतिक प्रश्न उभा करते. एका बाजूला राष्ट्रीय अस्मिता व स्वाभिमानाची जाणीव आहे, तर दुसऱ्या बाजूला कलेचे स्वातंत्र्य आणि निवडीचा अधिकार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मधून दिलेल्या उत्तरानंतर, आपल्या देशाची भूमिका अयोग्य असतानाही पाकिस्तानी कलाकारांना देशाची बाजू घ्यावीशी वाटते; तर मग आपल्या देशाची बाजू योग्य असतानाही आपल्याच बांधवांना हे का कळू नये? हीच खरी खेदाची बाब आहे. या भारतविरोधी विधानांमुळे मालिकेच्या प्रचारावर भारतात तीव्र संताप व्यक्त होत असून, ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ व समाजमाध्यमांवरील वापरकर्त्यांनी तिच्यावर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे. आता प्रेक्षकांनीच ठरवायचे आहे की, आपल्या देशाविरोधात बोलणाऱ्या कलाकारांना उराशी कवटाळायचे की राष्ट्रीय स्वाभिमान जपण्यासाठी भूतकाळातील घटना स्मरणात ठेवायच्या!

अन्य लेख

संबंधित लेख