
आजकाल ऑफिसचे काम, कागदपत्रे आणि पैशांचे व्यवहार यांबद्दलचे मेसेज आपण WhatsApp वरून पाठवतो. अनेक जण संगणकावर WhatsApp Web उघडून काम करतात. पण ही सोय धोक्याची ठरू शकते, असा इशारा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) दिला आहे.
I4C च्या सायबर धोका विश्लेषण युनिटने १८ नोव्हेंबरला “WhatsApp Web चा सुरक्षित वापर” या विषयावर एक सूचना प्रसारित केली आहे. त्यात म्हटले आहे की, WhatsApp Web वर एकदा लॉग इन केल्यानंतर तो सेशन सुरू राहतो. काही वेळा त्याचा गैरवापर करून दुसरी व्यक्ती तुमच्या अकाउंटमध्ये शिरू शकते. यासाठी तिला तुमचा पासवर्ड किंवा OTP लागतोच असे नाही.
सूचनेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संवेदनशील माहिती. सरकारी, कंपनीची, पैशांची किंवा गोपनीय माहिती संगणकावरील WhatsApp Web वरून शक्यतो पाठवू नका, असे I4C ने सांगितले आहे. अशी माहिती चुकीच्या माणसाच्या हातात गेली, तर फक्त तुमचेच नाही तर संस्थेचेही मोठे नुकसान होऊ शकते.
अकाउंट दुसऱ्याच्या ताब्यात गेले, तर काय होऊ शकेल? तो माणूस तुमचे खाजगी मेसेज वाचू शकेल. तुमच्या नावाने तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना मेसेज पाठवू शकेल. “तातडीने पैसे हवेत” असे सांगून पैसे मागू शकेल किंवा धोकादायक लिंक पाठवून तुमचा मोबाइल अथवा संगणक अथवा लॅपटॉप हॅक करू शकेल. मेसेज ओळखीच्या माणसाकडून आला आहे असे वाटल्यामुळे समोरचा सहज विश्वास ठेवेल आणि त्याची फसवणूक होईल.
ही सूचना देताना एक गैरसमजही दूर केला आहे. अनेकांना वाटते की ब्राउझरचा टॅब बंद केला की आपण लॉग आउट झालो. पण तसे नाही. टॅब बंद केल्यावरही सेशन सुरू राहू शकतो. म्हणून काम संपल्यावर WhatsApp Web मधील “Log out” बटण दाबूनच बाहेर पडा.
ही सुविधा कोणत्या स्थळी वापरावी त्याच्या जागेबद्दलही काळजी घ्यायला सांगितले आहे. सायबर कॅफे, सार्वजनिक संगणक, हॉटेलमधील बिझनेस सेंटर, कोणाचा उसना घेतलेला संगणक किंवा इतर अनोळखी संगणकांवर WhatsApp Web उघडू नका. अशा संगणकावर आधीच धोकादायक सॉफ्टवेअर असू शकते. तसेच तुमच्यानंतर तो वापरणारा माणूस तुमच्या सुरू राहिलेल्या सेशनमध्ये शिरू शकतो.
या इशाऱ्यामागे गंभीर कारण असल्याचेही वृत्तांमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानातील गुप्तचर हस्तकांनी ५० पेक्षा जास्त संरक्षणविषयक WhatsApp ग्रुपमध्ये घुसखोरी केल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर ही सूचना आली, असे एका अधिकृत सूत्राने सांगितले आहे. म्हणूनच सरकारी कर्मचारी आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांनी जास्त काळजी घ्यावी, असा संदेश यातून दिला जात आहे.
I4C ने WhatsApp बद्दल इशारा देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी “OTP सांगा” असा फोन करून WhatsApp अकाउंट ताब्यात घेण्याच्या पद्धतीबद्दल सूचना देण्यात आली होती. तसेच व्यावसायिक आणि कंपन्यांचे WhatsApp अकाउंट हॅक झाल्याच्या तक्रारी वेगाने वाढत असल्याचेही गृह मंत्रालयाने नोंदवले आहे. बनावट फाइल्सद्वारे पसरणारे मालवेअर हाही त्यामागचा एक मार्ग असल्याचे सांगण्यात आले आहे.
मग आपण काय करायचे? सर्वात आधी, WhatsApp Web वापरून झाले की नेहमी लॉग आउट करा. मोबाईलमध्ये Settings मध्ये Linked Devices उघडा आणि तिथे अनोळखी किंवा जुने सेशन दिसले तर ते काढून टाका. Two-step verification चालू ठेवा. कोणालाही OTP सांगू नका, मग तो स्वतःला कितीही मोठा अधिकारी म्हणवत असला तरी. अनोळखी लिंक आणि फाइल्स उघडू नका. महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे पाठवताना अधिकृत आणि सुरक्षित माध्यमांचा वापर करा.
दुर्दैवाने फसवणूक झालीच, तर उशीर न करता cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा १९३० या हेल्पलाइनवर तक्रार करा. तुमचे अकाउंट हॅक झाले आहे हेही मित्र आणि नातेवाईकांना लगेच सांगा, म्हणजे ते तुमच्या नावाने आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवणार नाहीत.
थोडक्यात, WhatsApp Web ही उपयोगी सोय आहे, पण ती वापरताना थोडी काळजी घेतली तर धोके टाळता येतात. काम संपल्यावर लॉग आउट करण्याची एक छोटीशी सवय तुमची माहिती, पैसे आणि प्रतिष्ठा वाचवू शकते.