Friday, October 18, 2024

नांदेडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का

Share

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यात उबाठा गटाला मोठं खिंडार पडल आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड-कंधार आणि देगलूर-बिलोली येथील उबाठा गटाचे विविध पदाधिकारी तसेच दोनशेहून अधिक गावांचे सरपंच, उप सरपंच आणि माजी सरपंच, माजी उपसरपंच यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या दोन वर्षात राज्यातील महायुती सरकारच्या कामाने प्रभावित होऊन अनेक जण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. सरकारच्या कार्यकाळात प्रत्येक निर्णय हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील प्रत्येक घटकातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला भगिनींना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तसेच युवकांना मुख्यमंत्री युवा कौशल्यविकास योजनेच्या माध्यमातून दरमहा ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना आणि तीर्थदर्शन योजनेचा लाभ देण्यात येणार असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून या योजना लोकांच्या घरोघरी पोहचवा अशी अपेक्षा याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे जालना आणि नांदेड हा भाग आपण समृद्धी महामार्गाला जोडणार असून त्यामुळे भविष्यात या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल. हिंगोली येथे १०० कोटी खर्च करून हळद संशोधन केंद्र तयार करत असून त्याचा लाभ हळद उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या या भागाचा विकास सरकारच्या माध्यमातून नक्की होईल अशी ग्वाही सुद्धा यासमयी त्यांनी दिली.

यामध्ये डॉ.अंकुश देवसरकर, मधुकर गिरगावकर, सुभाष काटे, शंकर पाटील, अजित पाटील, अशोक पाटील, काशिनाथ पाटील, आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी शिवसेनेचे बालाजी पाटील खतगावकर, शिवसेना प्रवक्ते आणि मुखेड-कंधार विधानसभा निरीक्षक संजीव भोर- पाटील शिवसेना प्रवक्त्या सौ.ज्योती वाघमारे, प्रभारी संजय काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, आनंदराव बोढारकर तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख