भारतीय समाजाला विचारांचे फार मोठे देणे संत एकनाथांनी दिले. संत एकनाथ महाराज षष्ठीनिमित्त त्यांच्या विचारांची ही ओळख.
संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांना वारकरी संप्रदायात शांतीब्रह्माची संज्ञा आहे. हे शांतीब्रह्म ज्या परकीय दमन चक्राच्या काळात कार्यरत होते, त्या काळात सामाजिक समता, समरसरता या शब्दांचा उच्चार करणे देखील अवघड होते. पण कठोरतम संयम, सद्गुरुनिष्ठा आणि त्याचवेळी आध्यात्मनिष्ठ सामाजिक समरसता या विचारांचे भरणपोषण संत एकनाथ महाराजांनी केले.
संत एकनाथ महाराजांच्या संपूर्ण जीवनकाळात परकीय आक्रमकांचे दमनचक्र संपूर्ण समाज जीवन विस्कळीत करून टाकत होते. भारतीय समाजाने आपले आत्मभान आणि आत्मगौरव विसरावा, यासाठी परकीय आक्रमक, क्रूर सत्ताधीश हिंसेचे अक्षरशः थैमान घालत होते. त्या काळात संत एकनाथ महाराजांनी ज्या कठोरतम संयमाने आणि गुरुनिष्ठेने भारतीय समाजाची आध्यात्मनिष्ठ समरसता धारणा केली, ते कार्य अजोड आहे. कारण एकीकडे परकीय आक्रमकांच्या हिंसेचे थैमान, तर दुसरीकडे धर्ममार्तंडांचा अतिरेकी विषमतावाद या कात्रीत संपूर्ण समाज अडकला होता. भारतीय समाज आपले मूळ आध्यात्मनिष्ठ समरसता हे सूत्र विसरला होता. त्या समाजाला आपले मूळ स्वरूप ओळखून कार्यप्रवण करणे ही बाब सोपी नव्हती, पण संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि त्यातले संत यामुळे एक अखंड ज्ञानभक्तीपरंपरा महाराष्ट्रात प्रवाहित झाली आणि त्याचाच अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणून संत एकनाथांचे कार्य महाराष्ट्र धर्माची द्वारका तोलून उभे राहिले.
संत साहित्याचे योगदान
धर्माच्या ठेकेदारांनी किंवा धर्ममार्तंडांनी उभ्या केलेल्या विषमतेच्या भिंती त्यावेळी इतक्या मजबूत होत्या, की त्या कठोर बुद्धिवादाच्या आधारे तोडणे याचा विचार देखील समाजाच्या कोणत्याही घटकाच्या साधा मनातही येत नव्हता. त्या काळात विषमतेच्या भिंतींना आध्यात्मसूत्रांच्या आधारे तडे देण्याचे काम संत एकनाथांनी केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. ती समाजात प्रसृत केली. त्यामुळे समाजाच्या आध्यात्मभानाला विवेकवादाची जोड मिळाली. “धर्ममार्तंड सांगतात तोच धर्म आणि विषमता हाच त्या धर्माचा आधार” हे समाजाला केव्हाही मान्य नव्हतेच, पण धर्ममार्तंडांनी सांगितलेला धर्म आणि त्यातल्या विषमतेला आव्हान देण्याची मात्र तत्कालीन समाजाची क्षमता नव्हती. ती क्षमता संत ज्ञानेश्वरांपासून संत एकनाथ, समर्थ रामदास, जगद्गुरु तुकाराम महाराज या सर्व संतांच्या साहित्य परिशिलनाने विकसित होऊ शकली. धर्ममार्तंडांना आणि त्यांनी मांडलेल्या विषमतेच्या तत्त्वज्ञानाला आध्यात्मसूत्राच्या आधारे बौद्धिक पातळीवर आव्हान देण्याची क्षमता या संत साहित्यातूनच निर्माण झाली.
भारतीय तत्त्वज्ञानाचे मूळ
भारतीय तत्त्वज्ञानाचे मूळ विषमतेत नाही, तर आध्यात्मिक सूत्राच्या समतेत आणि मानवी जीवनमूल्यांच्या समरसतेत आहे, हे सूत्र संत साहित्यानेच भारतीय समाज मनात रुजविले आणि ते नंतर वटवृक्षासारखे फोफावले. या वटवृक्षाचे वैचारिक खोड भारतीय संत साहित्य आहे.
सत्याग्रहाचे प्रवर्तक
संत एकनाथ महाराजांच्या साहित्याचा आधुनिक काळातल्या अनेक संतांनी आणि विचारवंतांनी परामर्ष घेतला आहे. या सगळ्यांचे एक सूत्र हेच आहे, ते म्हणजे संत एकनाथांनी आपल्या सर्व साहित्यातून भारतीय समाजाची जी कानउघाडणी केली, तिचा सूत्रपात नंतर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत झाला. आचार्य विनोबा भावे श्री संत एकनाथांना सत्याग्रहाचे प्रवर्तक मानतात. यवनाने थुंकावे आणि संत एकनाथांनी वारंवार स्नान करावे आणि अखेरीस यवनाने त्यांच्यापुढे हार मानवी ही ऐतिहासिक घटना विनोबाजींना सत्याग्रहाचे सूत्र वाटते.
एकनाथांची समाजाची कान उघडणी करण्याची भाषा आणि शुद्ध परमार्थाची तळमळ संत तुकाराम महाराजांनी स्वीकारली आहे, तर विस्ताराने विवरण करण्याची लेखन पद्धती आणि समाजोन्मुखता रामदासांनी घेतली आहे. एकनाथांच्या भागवतातील आत्मोपदेशक कॄष्ण संत तुकारामांनी आपलासा केला, तर भावार्थ रामायणातील असुरसंहारक राम रामदासांनी मस्तकी धरला. एकनाथांच्या निर्याणानंतर पुढे थोड्याच काळाने महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य साकारण्याचे कार्य हाती घेतले. त्यासाठी लोकांची मनोभूमिका एकनाथांच्या वाङमयाने तयार केली, असे इतिहासाचे अभ्यासक मानतात. हे केवढे मोठे देणे एकनाथांनी आपल्याला दिले, याची या सर्वांवरुन कल्पना येईल, असे मत श्री धुंडामहाराज देगलुरकर यांनी मांडले आहे. ते अतिशय सार्थ आहे.
नाथ भागवतात ज्ञानेश्वरीप्रमाणेच साहित्य आणि शांती यांचे मिलन आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या खालोखाल नाथ भागवताचा प्रसार महाराष्ट्रात फार मोठा आहे, असा निर्वाळा मामासाहेब दांडेकर यांनी दिला आहे.
संत एकनाथ महाराजांनी केलेल्या लोकशिक्षणात त्यांनी केवळ विविधतेचा ध्यास घेतला नाही तर त्यामागे त्यांचे जनहितार्थ कळवळणारे मनच होते. जनसामान्यांच्या आकलन कक्षांचा विचार नाथांच्या मनात कसा सतत तेवत असावा, या जाणिवेने मन भरुन येते, असे उद्गार प्रख्यात विचारवंत डॉ. यु. म. पठाण यांनी काढले आहेत, तर प्रख्यात विचारवंत डॉ. भीमराव कुळकर्णी यांनी अत्यंत थोडक्या शब्दांमध्ये संत एकनाथांविषयी सार्थ उद्गार काढले आहेत. यात ते म्हणतात, “शंकराचार्य, ज्ञानेश्वर, एकनाथ हे तिघेही क्रांतदर्शी युगपुरुष. तिघांनीही राष्ट्रधारणा ही समाजाच्या आध्यात्मिक मनोधारणेतूनच परिणत होते, होऊ शकते हे सिद्ध केले. हे कार्य करण्याची शक्ती स्थल काळाचे भान ठेवून, राष्ट्राला वळण लावण्याच्या प्रयत्नातूनच प्राप्त होते !!
विनायक ढेरे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून ते The Focus India या वेबपोर्टलचे संपादक आहेत.)