उदगीर : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून त्यांच्या स्वावलंबन, निर्णय शक्तीत वाढ केली आहे. महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सुरु असलेल्या आर्थिक विकासाच्या निर्णयाचे कौतुक केले.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे कौतुक करत महिला सक्षमीकरणाला राज्य शासन चालना देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. तर विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास आणि पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचीही उपस्थिती होती.
उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलांशी संवाद साधायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनांसह महिलांच्या अन्य योजनांची माहिती घेतली. याशिवाय राज्यात लखपती दिदी योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाचाही आढावा घेतला. या योजनांचे दृष्य परिणाम दिसत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक कुटुंबात उदरनिर्वाह चालविण्यासाठी महिलांची मुख्य भूमिका असते. त्यामुळे महिलांनी आता राजकीय क्षेत्रातही पुढे येत देशाचे नेतृत्व करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुरुषांनी आता महिलांच्या क्षमतेला ओळखून त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी पाठबळ द्यावे. तसेच आमच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान करणे पुरुषार्थ मानला जातो. प्रत्येक कुटुंबामध्ये हा सन्मान दिसून आला पाहिजे. महिलांनी सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.
- मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर
- BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’
- गुटखा माफियांवर आता ‘मकोका’!
- मत्स्यव्यवसाय आणि हाय-टेक उद्योगांना मिळणार बळ; डच शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांशी महत्त्वपूर्ण चर्चा
- औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश