Monday, October 21, 2024

Semiconductor : अमेरिकेकडून भारताला मिळणार सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट

Share

अमेरिकेच्या सहकार्याने भारताला पहिला राष्ट्रीय सुरक्षा ‘सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट’(Semiconductor) मिळणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला ‘मल्टी मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट’ असेल. त्यामुळे हा प्लांट भारतासोबतच अमेरिकेसाठीही खूप महत्त्वाचा आहे अमेरिकेच्या लष्कराने या उच्च तंत्रज्ञानासाठी भारतासोबत भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतात तयार होत असलेला हा सेमीकंडक्टर (Semiconductor) प्लांट दोन्ही देशांसाठी लष्करी हार्डवेअर तसेच महत्त्वाच्या दूरसंचार नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरण्यासाठी चिप्स तयार करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यात विल्मिंग्टनमध्ये झालेल्या चर्चेनंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली

हा केवळ भारतातील पहिलाच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी जगातील पहिला मल्टी-मटेरिअल उत्पादन प्लांट असेल. ज्यामुळे भारतातील रोजगारही वाढेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की अमेरिकन सैन्याने या उच्च तंत्रज्ञानासाठी भारतासोबत भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ असून हा एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण तो नागरी आण्विक कराराइतकाच महत्त्वाचा आहे. भारत-अमेरिका संयुक्त निवेदनानुसार, राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा, पुढील पिढीतील दूरसंचार आणि हरित ऊर्जा अनुप्रयोगांसाठी प्रगत सेन्सिंग, कम्युनिकेशन्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवर केंद्रित नवीन सेमीकंडक्टर (Semiconductor) उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासाठी एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली.

संपूर्ण जगात अशा खूप कमी कंपन्या आहेत ज्या सेमीकंडक्टर चिप्स बनवतात. सेमीकंडक्टरसाठी संपूर्ण जगाला या निवडक कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. कोरोना काळात सर्व जग ठप्प झाल्याने जगभरात सेमीकंडक्टरची मोठी कमतरता जाणवत होती. मोबाइल फोनपासून कारपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टरचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

कोरोनानंतर सेमीकंडक्टरच्या (Semiconductor) तुटवड्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते कार उत्पादकांपर्यंत सर्वांवर दिसू लागला आहे. तैवान, दक्षिण कोरिया, चीन आणि जपान हे देश जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर उत्पादक देश आहेत. परंतु अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक देशांना सेमीकंडक्टरची तीव्र टंचाई भासत आहे. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा जागतिक चिप बाजारातील बहुसंख्य वाटा आहे. मात्र चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. शिवाय रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

5-जी फोन वापरणे सेमीकंडक्टरमुळेच (Semiconductor) शक्य होत आहे. सेमीकंडक्टर हे ट्रान्झिस्टर, डायोड आणि इंटिग्रेटेड सर्किट्स सारख्या इलेक्ट्रॉनिक घटकांचा आधार आहेत. हे घटक संगणक, स्मार्टफोन, टेलिव्हिजन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरले जातात. मोबाईल फोन, राउटर आणि स्विचेस यांसारख्या संप्रेषण साधनांमध्येही सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. अत्याधुनिक कारमधील इंजिन कंट्रोल्स, ब्रेक सिस्टीम आणि इतर इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये सेमीकंडक्टरचा (Semiconductor) वापर केला जातो. भारतात 2026 पर्यंत 80 अब्ज डॉलर्स किंमतीचे सेमीकंडक्टर (Semiconductor) वापरले जातील आणि 2030 पर्यंत हा आकडा 110 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सेमीकंडक्टरला (Semiconductor) भारतीय अर्थव्यवस्थेला अग्रेसर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असून रोजगारदेखील उपलब्ध होण्यासदेखील यामुळे मदत होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख