Friday, January 3, 2025

‘अर्थसंकल्प मांडण्याचा आपल्याला अनुभव; सर्व बाबींचा विचार करूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित पवार

Share

छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पुरेशा निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. आपल्याला अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असल्याने सर्व बाबींचा विचार करूनच ही योजना जाहीर केली आहे,’ असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ते बोलत होते.

कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही. या योजनेच्या सुरुवातीला रक्षाबंधनापूर्वीच बहिणींच्या खात्यावर ओवाळणीची रक्कम जमा करण्यात आली होती. आता दिवाळीपूर्वीच म्हणजेच याच आठवड्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या रक्कमेची ओवाळणी बहिणींच्या खात्यावर जमा होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, राज्य सरकाने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य केले असल्याचेही सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना चालू वीज देयकाच्या पावत्यांचं वितरण आणि ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’ अंतर्गत आस्थापित कृषी पंपांचे लोकार्पण करण्यात येत आहे. या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेनं राज्य शासनाने ठोस पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत विज योजनेतून, राज्यातल्या ४४ लाख शेतकऱ्यांच्या साडेसात एचपी पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज मिळणार आहे. या योजनेसाठी आपण १४ हजार ७६१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही महत्त्वाची योजना आपल्या सरकारने सुरू केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देखील राबवण्यात येत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख