Thursday, December 5, 2024

उपमुख्यमंत्री होणार का? श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं

Share

मुंबई – महाराष्ट्रातील महायुती (Mahayuti) सरकारच्या नेतृत्वाबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नसला, तरी खाते वाटप आणि मंत्रीपद निश्चितीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. अलीकडेच, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखाली मुख्यमंत्रीपदाचा मार्ग स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे उपमुख्यमंत्रीपदावर असतील, अशा चर्चा उठल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टोक्ती करत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, “उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मी स्वीकारणार नाही. माझा फोकस केंद्रात किंवा राज्यात मंत्रिपदावर नसून माझ्या लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना पक्षाच्या विकासासाठी आहे.”

श्रीकांत शिंदे यांच्या या स्पष्टीकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चालू असलेल्या चर्चांना आता एक स्पष्ट उत्तर मिळाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाच्या रचनेबद्दलचा अंदाज बदलण्याची शक्यता आहे.

श्रीकांत शिंदे यांची सोशल मीडियावरची पोस्ट

ते म्हणाले, “महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.

माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…”, असे ते म्हणाले.

त्यांच्या या पोस्टमुळे अफवांना आळा बसेल आणि राजकीय चर्चांना योग्य दिशा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख