मुंबई: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला (Mahadevi Elephant) पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली.
माधुरी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
राज्य सरकारची भूमिका:
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या ३४ वर्षांपासून नांदणी मठात असलेल्या माधुरी हत्तीणीला परत आणण्याची स्थानिक जनतेची तीव्र भावना आहे. या जनभावनेचा आदर करत राज्य शासन स्वतः स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करेल. तसेच, मठाने दाखल केलेल्या याचिकेतही राज्याचा समावेश करावा, असे सुचवण्यात आले. वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सविस्तर भूमिका मांडली जाईल.
तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यात येईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य शासन एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्या प्रमाणे सुविधा देण्यात येतील आदी बाबींचा समावेश करून या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील जे हत्ती बाहेर नेण्यात आले, अशा सर्व हत्तींची माहिती वन विभागाने गोळा करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मांडली.