पुणे : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी केले. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेत आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अधिकाऱ्यांनी योजनांमधील बारकावे लक्षात घेऊन योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळेल याची काळजी घ्यावी. क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन नेहमीच असेल. काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील. परंतु कामात कुचराई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगून शेतीमध्ये नावीण्यपूर्ण प्रयोग करण्यासाठीही प्रयत्न करावेत. कृषी विभागाने कुटूंब प्रमुखाप्रमाणे शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर जाऊन मार्गदर्शन करावे व आवश्यक ती मदत करावी. कोणत्याही योजनेतील निधी व्यपगत होणार नाही याची काळजीही घ्यावी, शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी वाढीव निधीबाबत प्रस्ताव सादर करावा, सन 2023 व 2024 या वर्षातील कृषी पुरस्काराचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.