Saturday, September 13, 2025

राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान

Share

‘दृष्टी’ स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या वतीने प्रकाशित“राजकारणातील महिलांचा सहभाग” या विशेषांकाच्या मराठी व हिंदी आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त पुण्यात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शेवाळवाडीच्या माजी सरपंच सुमन थोरात आणि पिंपरी दुमाळा (शिरूर) येथील माजी सरपंच गायत्री चिखले यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. सरपंच ते खासदार अशा विविध स्तरांवरील महिला लोकप्रतिनिधी उपस्थित या परिसंवादाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

१९९६ साली स्थापन झालेल्या दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रामार्फत दरवर्षी महिला प्रश्नांवर संशोधनाधारित विशेषांक प्रकाशित केले जातात. आतापर्यंत १७ विषयांवरील विशेषांक प्रसिद्ध झाले असून, नुकताच प्रकाशित झालेला “राजकारणातील महिलांचा सहभाग” हा १८ वा विशेषांक आहे.

महाराष्ट्रातील बचत गटातील महिलांचा सामाजिक विकास, झारखंड-ओडिशा-छत्तीसगडमधील स्थलांतरित तरुणींची स्थिती, हरियाणातील घटत्या लिंगगुणोत्तराचा विवाहपद्धतीवर परिणाम, ईशान्य भारतातील महिलांची परिस्थिती यांसारख्या संशोधनात्मक अंकांनंतर यंदाचा अंक राजकारणातील महिलांच्या प्रसिध्द करण्यात आला आहे.

या विशेषांकात प्राचीन काळातील राज्यकर्त्या स्त्रियांचा परिचय, १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापासून १९९३ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिलांना मिळालेल्या ३३% आरक्षणापर्यंतचा कालखंड, महिला आरक्षण विधेयकाचा इतिहास, ‘नारीशक्ती अधिनियम’, महिला मतदारांचा वाढता आकडा, उमेदवारांचा विकास आणि जागतिक स्तरावरील महिलांची राजकीय स्थिती यांचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा सविस्तर परिचय अशा विविध विषयांवर लेख समाविष्ट आहेत. “राष्ट्रकारणासाठी राजकारण” या संकल्पनेवर अंकांतील लेख आहेत. संपादक स्वाती लेले यांनी सांगितल्याप्रमाणे, दुसऱ्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत महिलांच्या राजकीय प्रवासाचा पट या अंकातून उलगडला आहे. 

यावेळी वसुंधरा काशीकर यांनी लोकप्रतिनिधींच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या प्रश्नांना चारही मान्यवरांनी सविस्तर उत्तरे देत महिलांची राजकारणातील भूमिका अधोरेखित केली. स्त्रिया सत्ताचक्र बदलू शकतात, इतकी क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे त्यांनी हे लक्षात घेऊन उत्स्फूर्तपणे राजकारणात सहभागी व्हायला हवे असा ठाम संदेश या संवादातून देण्यात आला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या राजकीय वाटचालीत कुटुंबाची भूमिका अधोरेखित करताना सांगितले, “कुटुंब हेच आमचे शक्तिस्थान आहे. राजकारण व कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समन्वय साधावा लागतो. मात्र अडचणीच्या काळात कार्यकर्ते हेच आपले कवचकुंडल ठरतात.” भगवद्गीतेतील “विहित कर्म इच्छा नसतानाही करावे लागते” या शिकवणीतूनच राजकीय प्रवासातील प्रेरणा मिळते असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी महिलांच्या नेतृत्वक्षमतेवर भर देत सांगितले, “जिंकण्याचा आत्मविश्वास प्रत्येक स्त्रीमध्ये असतो. कुटुंबाचा आधार मिळाला, तर ती केवळ घरच नव्हे तर देशाचीही प्रगती घडवते.” महिला लोकप्रतिनिधी थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचतात, ही त्यांची खास ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “राजकारणात संघर्ष आहे, पण सामान्यांचा विश्वास हीच खरी शक्ती आहे. केवळ सहभाग पुरेसा नाही, महिलांनी नेतृत्व करायलाच हवे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.

गायत्री चिखले यांनी महिलांना रोखण्यासाठी वारंवार चारित्र्यहनन केले जाते, अशा वेळी कुटुंबाची साथ मोठे बळ देते, असे स्पष्ट केले. तर सुमन थोरात यांनी सरपंच म्हणून महिलांच्या तसेच वंचित घटकांच्या प्रश्नांवर काम करण्याचे समाधान व्यक्त केले. “महिलांच्या राजकीय सबलीकरणासाठी विशेष प्रशिक्षणाची नितांत गरज आहे,” असे मत त्यांनी मांडले.

या परिसंवादातून स्पष्ट झाले की, महिलांचा वाढता राजकीय सहभाग हा केवळ प्रतिनिधित्वापुरता मर्यादित नसून लोकशाहीच्या सबलीकरणासाठी आवश्यक आहे. कुटुंबाचा आधार, समाजाचा विश्वास आणि स्वतःचा आत्मविश्वास या तीन घटकांच्या जोरावर स्त्रिया केवळ राजकारणात यशस्वी होत नाहीत, तर सत्ताचक्र बदलण्याची ताकदही त्यांच्यात आहे. ‘दृष्टी’च्या या विशेषांकाने त्या सामर्थ्याला संशोधनाचा पाया देऊन भविष्यातील महिला नेतृत्वासाठी नवे दालन उघडले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख