डाॅ. आर्या जोशी यांचे संशोधन आणि लेखन सतत सुरू असते. ते संशोधन अतिशय सोप्या शब्दांमध्ये जनमानसापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी त्या करत असलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कार्याची ही ओळख.
धर्मशास्त्र हा विषय केवळ संस्कृत ग्रंथांमध्ये अभ्यासण्यापेक्षा तो आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून दाखविण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असलेल्या संशोधक म्हणून डाॅ. आर्या जोशी यांची ओळख सांगता येईल. धर्मशास्त्र संस्कृत ग्रंथांमध्ये अभ्यासतानाच ते आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून दाखविणे हे
डाॅ. जोशी यांनी हाती घेतलेले मुख्य काम. समाजाची धारणा करतो तो धर्म. विविध संस्कार, व्रते, सण, उत्सव हे आपल्या स्वतःच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या कल्याणाशी जोडलेले आहेत, हे त्यांना दीर्घकाल केलेल्या अभ्यासातून उमगत गेल्याचे त्या सांगतात.
आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेले हे तत्वज्ञान सोप्या भाषेत आणि विशेषतः पुढच्या पिढीला सांगावे असे त्यांना नेहमी वाटते. कारण त्यातूनच समाजाचे प्रबोधन होणार असल्याचे त्या मानतात. त्यामुळे असा प्रयत्न विविध माध्यमातून
डाॅ. आर्या जोशी सातत्याने करत आहेत. हा वसा वीस वर्षे सांभाळताना त्यांनाही त्यातून नवनवीन संकल्पना शिकायला मिळाल्या. डाॅ. जोशी यांनी १९९८-२०२३ अशी पंचवीस वर्षे ज्ञान प्रबोधिनीच्या पौरोहित्य उपक्रमाचे काम पाहिले. या कामातून त्यांना अनुरूप कोंदण मिळालं आणि विविध व्यासपीठांशी, रचनांशी त्या जोडल्या गेल्या.
स्वयंसेवी वृत्तीने लेखन
मराठी विकिपीडियावर त्या मागील ९ वर्षे स्वयंसेवी वृत्तीने लेखन, संपादन असे काम करत आहेत. विविध संस्कार, व्रते, सण उत्सव, भारतातील विविध राज्यांमधील सांस्कृतिक परंपरा याविषयीचे लेख त्या मुख्यत्वे संपादित करतात. लोक परंपरा, सण, उत्सवांची छायाचित्रे काढणे, चित्रफिती तयार करणे आणि ते विकीवर अपलोड करणे हा त्यांचा छंदच बनून गेला आहे. त्यासाठी त्यांची भटकंती सतत सुरू असते. हे सारे समाजासाठीचे देणे आहे, हे काम आपण समाजासाठी करत आहोत, अशा वृत्तीने सुरू असलेल्या कामात त्यांची २५ हजार संपादने पूर्ण झाली आहेत. TEDX Pune च्या माध्यमातून Thought Leader म्हणून त्यांनी त्यांचे काम विकिपीडियावर मांडलेले आहे. Wikimedia Foundation च्या दक्षिण आशियाई देशांच्या प्रकल्प निधी समितीवर त्या गेली चार वर्षे कार्यरत आहे आणि तिथेही या देशांमधील आणि भारताच्या विविध राज्यातील लोक परंपरा, संस्कृती यावर काम करीत असलेल्या सदस्यांना त्या मार्गदर्शन करतात. International Centre for Cultural Studies च्या पुणे केंद्राचे सचिवपदही त्या सांभाळत आहे तेही याच भूमिकेतून.
जिथे जिथे धर्म, परंपरा, समजुती असे विषय समोर येतात अशा विविध विषयांवर त्यांचे कार्य सुरू आहे. यातील प्रामुख्याने एखादे काम नोंदवायचे झाल्यास जीवित नदी या संस्थेसह धर्मशास्त्र अभ्यासक या नात्याने त्या जोडल्या गेलेल्या आहेत. नदी हा मानवी समाजाचा केंद्रबिंदू होता. त्याकाळात नदीशी संबंधित विविध व्रताचरण केले जात असे. आता शहरीकरणामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आल्यावर नदीशी जोडलेली विधिविधाने, पूजा यांच्याकडे आधुनिक काळात कसे पहावे, नदीला कसे सांभाळावे याविषयी समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न त्या करतात. मुख्यतः गणेशोत्सव काळातली मूर्ती विसर्जन, निर्माल्य विसर्जन याविषयी जीवित नदी संस्थेच्या माध्यमातून त्यांचे समाजप्रबोधन सुरू असते.
डॉ. आर्या जोशी यांना आई-वडिलांकडून समाजाबरोबर राहण्याचा आणि समाजाप्रती योगदान देण्याचा वारसा लाभला. त्यांचे घर हे अनेकांचे आपलेच घर होते आणि अनेकजण त्यांच्या विस्तारित कुटुंबाचा भाग होते. हे पाहातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्याने हा वारसा आपल्याला जमेल तसा सांभाळावा असा प्रयत्न त्या करतात.
धर्मशास्त्र आणि पर्यावरण हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. विविध ऋतूंशी जोडलेली आपली व्रते, उपासना आणि या साऱ्यामध्ये निसर्गाशी घडून येणारे एकरूपत्व यापासून आज आपण दूर जात आहोत. त्यामुळे धर्म आणि पर्यावरण यांचा आदिम कालापासून अव्याहत सुरू असलेला सहसंबंध समाजापुढे मांडण्यासाठी
डाॅ. जोशी विविध माध्यमांवर लेखन करीत असतात. त्यांचे दोनशेहून अधिक लेख विविध मासिके आणि नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. समाजमाध्यमांच्या प्रभावाने विधी विधाने, व्रते यांना उत्सवी स्वरूप आले आहे आणि तेच सारे खरे वाटू लागले आहे. या परिस्थितीत धर्माचा मूळ गाभा समजावून सांगणे त्यांना मनापासून आवडते. संस्कृत भाषा, धर्म, संस्कृती हे सर्वसामान्य माणसाला आकलनापलिकडे असलेले विषय वाटतात. पण तसे नसून ते तुमचे आमचे रोजच्या जगण्याचे मूळ आहे या विचारधारेचा प्रसार संशोधक म्हणून करायला डाॅ. आर्या जोशी यांना आवडतो. त्यादृष्टीने त्यांचे वाचन, लेखन सुरू असते.
कोकणातील शाळांमध्ये उपक्रम
मुलांमध्ये रमणे हा त्यांचा छंद ! कोकणातील राजापूर जवळ ताम्हाणे या त्यांच्या गावी मुलांसाठी छोटे-मोठे प्रयोग शाळांमधून करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तिथले शिक्षक सुद्धा त्याला छान प्रतिसाद देतात असे आर्याताई आवर्जून सांगतात. जिथे म्हणून आपली गरज आहे अशा ठिकाणी आपण उभे रहायला हवे या विचारातून त्या मधुरांगण या उपक्रमात वर्षातून एकदा तरी सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि मुलांसह आनंद घेतात. मुलांशी संबंधित विविध विषयांमध्ये जोडले राहणे त्यांना आवडते, मुलांसाठी प्रासंगिक लेखनही त्या करतात.
हे समाजासाठीचे काम
डाॅ. आर्या जोशी यांचे काम असे बहुआयामी तर आहेच, शिवाय ते समाजालाही उपयुक्त ठरणारे आहे. हे सर्व त्या करतात ते केवळ मी समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून. त्यामुळे केलेल्या कार्याची प्रसिद्धी करावी किंवा ते लोकांना सांगत रहावे, असे त्यांना कधीच वाटत नाही. उलट, आपले काम अधिक चांगले कसे होईल आणि त्यासाठी अधिक काय करता येईल, हाच त्यांचा ध्यास असतो. त्यातूनच त्या वेगवेगळे उपक्रम यशस्वी करत असतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मिळणारे पाठबळ हेही आर्याताईंसाठी महत्त्वाचे आहे. आर्याताईंचा प्रवास हा केवळ दिशादर्शकच नाही, तर प्रेरणादायी देखील आहे.
– जान्हवी ओक
(लेखिका आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)