मुंबई: मुख्यमंत्री सहायता निधीतून शेतकऱ्यांच्या मदतीबाबत केवळ एका महिन्याची आकडेवारी देऊन गैरसमज पसरवला जात असल्याचा दावा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) केला आहे. याशिवाय, चुकीची माहिती देण्यात आल्याबद्दल चौकशीचे आदेश देत दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हा खुलासा ‘उबाठा’ गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना करण्यात आला आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ₹६१ कोटी वितरित!
मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) अधिकृत माहिती देत मदतीच्या आकडेवारीतील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात ₹६१ कोटी ५१ लाख ६९८ इतकी मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होत असतो, त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम वाढत असते. अशावेळी, फक्त एका महिन्याची (ऑक्टोबर) माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
₹१४,००० कोटींचे विशेष पॅकेज
शेतकऱ्यांना मदत केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच दिली जाते, असे नाही, यावर मुख्यमंत्री कार्यालयाने जोर दिला आहे. तकऱ्यांसाठी मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्यांकडून मदत दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून ₹१४,००० कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने, या रकमेत सातत्याने वाढ होत आहे.
चुकीची माहिती देणाऱ्यांवर चौकशी
सीएमओने स्पष्ट केले की, दानवे यांनी दिलेली केवळ ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी चुकीची आहे.”अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा मुख्यमंत्री कार्यालयाने दिला आहे.