Wednesday, December 4, 2024

विधानसभेसाठी रिंगणातील आखणी तयार…उमेदवारांनी दंड थोपटले

Share

विधानसभेसाठी रिंगणातील आखणी तयार होत असून उमेदवारांची नावे अंतिम झाल्याने निवडणूकीसाठी दंड थोपटले जात आहेत. राज्यात २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चित्र आज स्पष्ट झालं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तरी बंडखोरी पूर्णपणे शमलेली नाही. मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या २६ मतदारसंघातून आज ५३ जणांनी माघार घेतली. नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघातून ९ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.

पुणे जिल्ह्यातल्या ४८२ अर्जांपैकी १७९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ३०३ उमेदवारांमध्ये लढत होईल. नाशिकमधल्या १५ विधानसभा मतदारसंघांत एकूण ३३७ उमेदवारी अर्ज दाखल होते, त्यापैकी १३७ उमेदवारांनी आज माघार घेतल्यानं आता २०० उमेदवार रिंगणात आहेत. यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. हेमलता पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपाचे बंडखोर नेते शशिकांत जाधव आणि दिलीप भोसले यांचा समावेश आहे. मात्र, समीर भुजबळ, निर्मला गावित यांची उमेदवारी कायम आहे.

सांगली जिल्ह्यातही ८५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सिद्धी कदम आणि रमेश कदम यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज आज मागे घेतला. लातूर जिल्ह्यातल्या ६ विधानसभा मतदारसंघातल्या १०६ उमेदवारांपैकी ८७ जणांनी आज माघार घेतली. जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघातून आज ११९ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता १०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील.

धुळे जिल्ह्यातल्या पाचही मतदार संघातील ४६ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून आता पाचही मतदार संघातून 56 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी धुळे शहर मतदारसंघातल्या १२ उमेदवारांनी माघार घेतली असून त्यात प्रहार पक्षाचे मनोज मोरे तसंच, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागं घेतला. काँग्रेसनं राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे लाटकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर  गेल्या काही दिवसांपासून माघारीसाठी राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र लाटकर माघार घ्यायला तयार झाले नाहीत त्यामुळे मुदत संपण्याच्या १० मिनिटं आधी मधुरिमाराजे यांनीच अर्ज मागे घेतला.

अन्य लेख

संबंधित लेख