Monday, April 27, 2026

एक विस्मृत वारसा आणि घरवापसीची ओढ: बेनी मनाशे समुदायाचा इस्रायलप्रवास

Share

ईशान्य भारताच्या कुशीत वसलेल्या मणिपूर आणि मिझोरमच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये एक असा समुदाय निवास करतो, ज्यांच्या आयुष्याची पहाट केवळ सूर्याच्या कोवळ्या किरणांनीच नाही, तर एका प्राचीन श्रद्धेच्या आणि प्रार्थनेच्या सुरावलींनी होते. त्यांच्यासाठी हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ती त्यांच्या अस्तित्वाची ओळख आणि एका प्राचीन वारशाची जपवणूक आहे. हा समुदाय म्हणजे ‘बेनी मनाशे’. स्वतःला ज्यू धर्माचे पाईक मानणाऱ्या या लोकांसाठी भारत ही कर्मभूमी असली, तरी त्यांचे हृदय मात्र आजही हजारो मैल दूर असलेल्या इस्रायलच्या ‘पवित्र भूमी’साठी धडधडत आहे.

या समुदायाचा असा दावा आहे की, ते बायबलमध्ये उल्लेखिलेल्या आणि सुमारे २,७०० वर्षांपूर्वी हद्दपार झालेल्या इस्रायलच्या दहा हरवलेल्या जमातींपैकी एक असलेल्या ‘मनाशे’ वंशाच्या ज्यू राजाचे थेट वंशज आहेत. काळाच्या ओघात आणि भौगोलिक स्थलांतरामुळे ते आशियाच्या या कोपऱ्यात येऊन पोहोचले. पिढ्यानपिढ्या ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांच्या बहुसंख्येने वेढलेले असूनही, त्यांनी आपले ज्यू संस्कार, प्रथा आणि तोराहवरील निष्ठा अत्यंत जिकिरीने जपली आहे. त्यांच्यासाठी इस्रायल ही केवळ एक भौगोलिक सीमा असलेला देश नसून, ती त्यांच्या पूर्वजांना दिलेली ‘promised land’ आहे.

सध्या हा समुदाय एका ऐतिहासिक स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा आहे. इस्रायल सरकारने या जमातीला आपल्या देशात सन्मानाने वसवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. या पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत हजारो बेनी मनाशे लोकांना टप्प्याटप्प्याने इस्रायलचे नागरिकत्व दिले जात आहे. या प्रक्रियेला आता अधिक वेग आला असून, अलीकडेच २५० हून अधिक जणांचा एक मोठा गट ‘विंग्स ऑफ डॉन’ सारख्या विशेष मोहिमेद्वारे इस्रायलमध्ये दाखल झाला आहे. हे स्थलांतर केवळ धार्मिक कारणास्तव नाही, तर त्याला सामाजिक आणि राजकीय परिमाणंही आहेत. ईशान्य भारतात, विशेषतः मणिपूरमध्ये सुरू असलेला वांशिक संघर्ष आणि तिथली अस्थिरता यांमुळे हा समुदाय मोठ्या संकटात सापडला आहे. अशा वेळी इस्रायलने दिलेला हा मदतीचा हात त्यांच्यासाठी एका सुरक्षित भविष्याचे द्वार ठरत आहे. इस्त्राईलच्या दृष्टीने विचार करता जगाच्या पाठीवर जी व्यक्ती व समुदाय स्वतःला ज्यू धर्मीय मानतो, त्या प्रत्येकाला इस्त्राएल मध्ये स्थान आहे. अश्या वेळी २७०० वर्षांपूर्वी स्थानभ्रष्ट झालेल्या परंतु आजही आपली निष्ठा, परंपरा कायम ठेवणाऱ्या कट्टर ज्यू समुदायाला आपल्या देशी परत नेणे, आजवर झालेल्या ज्यूंवरच्या अत्याचारांच्या संदर्भात सरकार आणि जागतिक ज्यू समाजाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक महत्वाची सन्मानाची आणि तितकीच जबाबदारीपूर्ण गोष्ट असणार आहे.

जागतिक राजकारणाचा विचार करता इस्रायललाही या स्थलांतराचा एक लोकसंख्याशास्त्रीय उपयोग होणार आहे. विशेषतः उत्तर गॅलीली सारख्या भागांत, जिथे हिजबुल्लाच्या रॉकेट हल्ल्यांमुळे स्थानिक लोकसंख्या विरळ होत आहे, तिथे स्थायिक होण्यासाठी बेनी मनाशे सारख्या श्रद्धावान आणि परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम लोकसंख्येची गरज आहे. जरी हा भाग लेबनॉनच्या सीमेजवळ असल्याने युद्धजन्य परिस्थितीच्या सावटाखाली असला, तरी बेनी मनाशे लोकांचा निर्धार ढळलेला नाही. त्यांच्या मते, जगाच्या पाठीवर संघर्ष सर्वत्रच आहे, पण आपल्या मूळ भूमीत राहून आणि आपल्या धर्माचा अभ्यास करत मरण येणे हे कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आणि युद्ध आज चालू आहे, उद्या परिस्थिती अजून वेगळी असेल. अशी आशा ठेवून प्रगत, समृद्ध अश्या इस्राएलच्या प्रवासाला ही मंडळी निघाली आहेत.

या समुदायातील तरुण पिढीसाठी तर इस्रायल हे एक स्वप्नवत गंतव्यस्थान आहे. हे अचानक घडलेले नाही. गेल्या काही काळापासून त्यांना इस्त्राएलमध्ये स्थलांतर सुखकर आणि सुरक्षित व्हावे यासाठी बरीच पूर्वतयारी चालू आहे. मणिपूरच्या बेने मशाशेबहुल भागांतील स्थानिक शाळांमध्ये सामाजिक शास्त्रांसोबतच हिब्रू भाषा, ज्यू प्रार्थना आणि विधींचे धडे दिले जातात. भारतीय मातीवर जेव्हा इस्रायलचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकतो, तेव्हा या मुलांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक असते. त्यांना माहीत आहे की, तिथे गेल्यावर त्यांना शेतीपासून ते आधुनिक उद्योगांपर्यंत विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी मिळतील, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

अर्थात, हा प्रवास सोपा नक्कीच नाही. जे लोक आधीच स्थलांतरित झाले आहेत, त्यांना सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. एका दुर्गम शेतीप्रधान संस्कृतीतून आधुनिक तंत्रज्ञानाने वेढलेल्या समाजात मिसळताना सांस्कृतिक दरी निर्माण होते. काही जुन्या स्थलांतरितांच्या मते, आजही इस्रायलमध्ये त्यांना कधीकधी संशयाने किंवा दुय्यम नजरेने पाहिले जाते. त्यांच्या प्रार्थना आणि पद्धतींकडे काही स्थानिक लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. इस्राएलच्या प्रमुख प्रवाहात मिसळून जाताना अश्या स्वरूपाचे प्रश्न आणि अडचणी येणे स्वाभाविकच आहे. त्यामुळेच हे असे छोटेमोठे अडथळे त्यांच्या ‘अलियाह’ (मायदेशी परतणे) च्या ओढीला कमी करू शकलेले नाहीत.

त्यांच्यासाठी हा केवळ देश बदलण्याचा प्रवास नाही, तर ते एक ‘घरवापसी’चे महाकाव्य आहे. इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ जरी त्यांच्या वंशावळीबद्दल वेगवेगळी मते मांडत असले, तरी बेनी मनाशे लोकांची अढळ श्रद्धा आणि त्यांनी शेकडो वर्षे जतन केलेली आपली संस्कृती हेच त्यांच्या या प्रवासाचे सर्वात मोठे प्रमाण आहे. त्यांच्यासाठी इस्रायल म्हणजे केवळ एक देश नसून, ते त्यांच्या अस्तित्वाचे पूर्णत्व आहे.

– अमिता आपटे

अन्य लेख

संबंधित लेख