सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली “शिवोत्सव २०२६” ची सांगता समारोप रक्षक गुरुकुल कुपवाड मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाने सांगता करण्यात आली. या मर्दानी खेळाचा शुभारंभ रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, व भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय भोकरे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून करण्यात आले.
रक्षक गुरुकुलच्या मावळ्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, भाला चालवणे, कुऱ्हाड चालवणे, लाठी काठी, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे याची प्रात्यक्षिके सादर केली. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, नगरसेवक अँड. स्वातीताई शिंदे, शिव कवच मंडळाचे प्रकाश निकम, शिवभक्त राम काळे, सोमनाथ गोटखिंडे, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी केले.
पहेलगाममध्ये हिंदूंची धर्म विचारून हत्या करण्यात आली त्याला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, पेहलगाममध्ये हिंदूंना जात नाही तर धर्म विचारून त्याची हत्या केली. हिंदूंनो आता जात सांगू नका धर्म सांगा. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हिंदूची सुन्ता झाली असती. हिंदूंचे ३३ कोटी देवी देवता, मंदिर, मंदिरावरील कळस, दारातील तुळस जिवंत ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे. तसेच राज्यात मिरवणुकीमध्ये क्रूरकर्मा औरंगजेब, क्रूरकर्मा अफजल खान, क्रूरकर्मा टिपू सुलतान यांचे पोस्टर फडकवून त्यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांना मिरवणुकीमध्ये घुसून मिरवणूक उधळून लावा.
यावेळी मान्यवरांचा सत्कार शिवोत्सव समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, दिग्विजय शिंदे, गजानन माने, हरपितसिंग गौड यांनी केले. सूत्रसंचालन हिंदू एकताचे जेष्ठ नेते विजयदादा कडणे यांनी केले. फटाक्याच्या आतिषबाजी सह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने कार्यक्रम मोठा जल्लोषात पार पडला.

सर्वप्रथम सांगलीत दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त “शिवोत्सव” साजरा करणाऱ्या हिंदू एकता आंदोलन संघटनेचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. हिंदू एकता आंदोलन ही प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील (विशेषतः सांगली आणि सातारा जिल्ह्यांत) कार्यरत असलेली एक हिंदुत्ववादी संघटना आहे. हिंदू समाजात जातीभेद विसरून धार्मिक स्तरावर एकता निर्माण करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. नितीन शिंदे हे या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवोत्सव’ नावाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही संघटना लव्ह जिहाद, हलाल सक्ती आणि धर्मांतर यांसारख्या मुद्द्यांवर आंदोलने करते. तसेच, कट्टरतावादी मदरशांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी वेळोवेळी केली आहे. आषाढी वारी दरम्यान स्वच्छतेसाठी ‘निर्मल वारी’ या संकल्पनेला पाठिंबा देणे आणि त्यात सहभागी होणे अशा सामाजिक कार्यांतही ही संघटना अग्रेसर असते. रक्षक गुरुकुल सारख्या शिवकालीन युद्ध कला जोपासणाऱ्या संस्थेला समारोप समारंभात संधी देऊन. हिंदू एकता आंदोलनाने एक चांगला पायंडा पाडला आहे याबद्दल देखील त्यांचे अभिनंदन.

त्याचबरोबर सांगलीतील कुपवाड येथील रक्षक गुरुकुलाचे देखील मनःपूर्वक अभिनंदन. रक्षक गुरुकुल कुपवाड ही संस्था प्रामुख्याने शिवकालीन लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला आणि चक्रीपाश यासारख्या युद्ध कलांचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि ५ वर्षांवरील मुले व मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी १५ दिवसांची शिबिरे आयोजित करते.
चक्रीपाश हे महाराष्ट्राच्या, विशेषतः शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील, पारंपरिक युद्धकलेतील एक प्राचीन शस्त्र आहे. हे एक विशेष प्रकारचे शस्त्र असून, त्यात एका गोलाकार धातूच्या तुकड्याला फास किंवा दोरी जोडलेली असते. याचा उपयोग शत्रूंना फिरवून आणि फेकून निःशस्त्र करण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी केला जात असे. हे हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांच्या युद्धतंत्राचा एक महत्त्वाचा भाग होते.
त्याचबरोबर योगा, एअर रायफल शूटिंग, तायक्वांदो, हॉर्स रायडिंग आणि रस्सीखेच यासारखे स्वसंरक्षण, क्रीडा व व्यायाम प्रकार या शिबिरांमध्ये शिकवले जातात. सोबत लेझीम पथक, झांज पथक आणि मानवी मनोरे अशा सांस्कृतिक उपक्रमांचा देखील समावेश असतो. मैदानी खेळांची साथ, शिवसंस्कारांची गाठ असे त्यांचे घोषवाक्य आहे. शिवकालीन युद्ध कलांचे प्रशिक्षण देण्याचे पुण्य कार्य रक्षक गुरुकुल करत आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन.

त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ येथील “सव्यसाची गुरुकुलम” ही संस्थादेखील भारतीय युद्धकला आणि प्राचीन व्यायाम प्रकारांचे जतन तसेच प्रसार करते. प्रामुख्याने शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणासाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
या गुरुकुलमध्ये प्रामुख्याने लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, भालाफेक, विटा आणि चक्रीपाश यांसारख्या पारंपारिक भारतीय विशेषतः शिवकाली शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. युद्धकलांसोबतच योगासने, सूर्यनमस्कार, ध्यान आणि प्राणायाम, भारतीय तत्त्वज्ञान आणि चिंतन वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. अर्थात येथे ‘शस्त्र आणि शास्त्र’ या दोन्ही विषयांचे एकत्रित शिक्षण दिले जाते. महिला आणि मुलींसाठी विशेष स्वसंरक्षण (Self Defense) कार्यशाळांचे आयोजन केले जाते.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये किंवा विशेष प्रसंगी ही संस्था महाराष्ट्रभर (नाशिक, गोंदिया, बेळगाव इ.) निवासी आणि अनिवासी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करते. भारतीय युद्धकला आणि तत्त्वज्ञानाचे संशोधन, विकास आणि जतन करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.

त्याचप्रमाणे शूरवीर कोंडाजी फर्जंद मर्दाना तालीम हे मुंबईतील दादर (पश्चिम) परिसरात स्थित एक प्रसिद्ध व्यायामशाळा किंवा तालीम केंद्र आहे. हे केंद्र प्रामुख्याने पारंपारिक कुस्ती, शारीरिक कसरत आणि मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणासाठी ओळखले जाते. या तालमीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी मावळे कोंडाजी फर्जंद यांचे नाव देण्यात आले आहे.
कोंडाजींनी ६ मार्च १६७३ च्या अंधाऱ्या रात्री केवळ ६० निवडक मावळ्यांसह पन्हाळ्याच्या पश्चिमेकडील पुसाटी बुरुजाकडील दुर्गम कड्यावरून दोरखंडांच्या साहाय्याने चढाई केली. गडावर पाऊल ठेवताच मावळ्यांनी अचानक शिंगे, तुताऱ्या आणि रणवाद्ये वाजवण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीच्या त्या शांततेत झालेल्या प्रचंड गर्जनेमुळे शत्रूला असा भास झाला की जणू हजारो मराठा सैन्य गडावर घुसले आहे. याच गोंधळाचा फायदा घेत कोंडाजी थेट किल्लेदारावर तुटून पडले आणि आपल्या तीक्ष्ण तलवारीने त्याचा शिरच्छेद केला. किल्लेदाराचा अंत होताच आदिलशाही सैन्याची दाणादाण उडाली आणि अवघ्या ३.५ तासांत मराठ्यांनी पन्हाळा काबीज केला. कोंडाजी फर्जंद यांचा हा पराक्रम आजही तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. येथे प्रामुख्याने कुस्ती, वजन उचलणे आणि इतर पारंपारिक व्यायाम प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था केवळ व्यायामापुरती मर्यादित नसून, विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी असते.

आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये एकूण १४ विद्या आणि ६४ कला आहेत असे मानले गेले आहे. पाककलेपासून युद्ध कलेपर्यंत एकूण ६४ कला आपल्याला परंपरेने लाभल्या आहेत. केरळची कलारीपयट्टू ही मार्शल आर्ट कला असेल. तामिळनाडूची सिलंबम ही आधुनिक किंवा प्राचीन कुट्टू वरिसाई ही प्राचीन मार्शल आर्ट असेल. मणिपूरची थांग-ता की सशस्त्र मार्शल आर्ट असेल किंवा सरित सरक ही नि:शस्त्र मार्शल आर्ट किंवा ढाल तलवार घेऊन लढाईची चेइबी गद-गा युद्ध कला असेल असेल.
बिहारच्या रजपुत बांधवांची परी-खंडा. हिमाचल प्रदेशची थोडा. पंजाबच्या शीख बांधवांची सशस्त्र मार्शल आर्ट गटका. मिझोरामची इन्बुआन कुश्ती. आंध्र प्रदेशची काठी सामू. वाराणसीची मुष्टी युद्ध. काश्मीरची स्कवे. ओरिसाची पाइक आखाडा युद्धकला.
युद्धकलेचा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून समृद्ध वारसा मिळालेला आहे आणि महाराष्ट्र त्यात बराच आघाडीवर आहे. युद्धकला ही स्वसंरक्षणाबरोबरच. विशेषतः महिला व मुलींना स्वसंरक्षणाबरोबरच. राष्ट्ररक्षणासाठी देखील अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रात लाठीकाठीपासून तलवार खड्ग दांडपट्टा भाला अशा अनेक युद्ध तंत्रांचा ठेवा आपल्याकडे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी या सर्व प्रकारच्या युद्धतंत्रांचा खुबीने वापर करून इस्लामी सल्तनतींना अक्षरशः धुळीस मिळवले व हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज या मातीत डौलाने फडकू लागला.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटल्यावर. घोडखिंडीच्या लढाईत सिद्दी मसुदच्या १० हजार सैनिकांना बाजीप्रभू देशपांडे यांनी अवघ्या ३०० मावळ्यांनी ६ ते ७ तास रोखून धरले व महाराज सुखरूप पणे विशाळगडावर पोचले.
या लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ गेली. त्यावेळी त्यांच्या दोन्ही हातात दांडपट्टे होते. बाजीप्रभू आणि त्यांच्या साथीदारांच्या पराक्रमाने घोडखिंड “पावन” झाली. या प्रसंगावरून आपल्याला शिवकालीन दांडपट्ट्याची ताकद काय होती हे लक्षात येईल. प्राचीन युद्धकला हा आपल्या प्रेरणेचा स्रोत देखील आहे. स्वसंरक्षणा बरोबर समाज रक्षणासाठी देखील उपयोगी पडणारी ती कला आहे. तसेच युद्धकलेचे प्रशिक्षण हा सर्वांग सुंदर व्यायाम देखील आहे.
आपला वारसा हा आपल्यालाच जपायचा असतो. आपल्याला लाभलेला शिवकालीन युद्धकलेचा समृद्ध वारसा. रक्षक गुरुकुल, सव्यसाची गुरुकुलम आणि शूरवीर कोंडाजी फर्जंद मर्दाना तालीम सारख्या संस्था आज कसोशीने जपताहेत याबद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे.
जय भवानी जय शिवराय!!!