Saturday, April 18, 2026

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी “उधळपट्टीचा छंद” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला.

पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील “बेस्ट मुख्यमंत्री” म्हणून घोषित केले जायचे. तशाच एखाद्या पीआर एजन्सीकडून लिहून घेतलेला हे पेड आर्टिकल वाटते आहे. याउपरही चुकून माकून हा प्रदीर्घ मराठी लेख बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकलेल्या आदित्य ठाकरे यांनी स्वतःच लिहिला असेल तर त्यांनी आपल्या अज्ञानाचे व अकलेचे प्रदर्शन केले आहे असेच म्हणावे लागेल.

२००० साला पूर्वी मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी गारगाई प्रकल्प हा त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्याचा भाग होता असे ते स्वतः म्हणतात. मात्र २००० सालानंतर हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे त्यांच्या पक्षाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तो बाजूला ठेवला. म्हणजे एखाद्या प्रकल्पाची व्यवहार्यता न तपासताच त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करणे आणि नंतर अभ्यासाअंती त्याची अव्यवहार्यता लक्षात आल्यावर तो आपल्या जाहीरनाम्यातून वगळणे याला अज्ञान म्हणावे की अकलेचा दुष्काळ? आणि यातून “स्थगिती सम्राट” ही त्यांच्या पिताश्रींना मिळालेली उपाधी अगदी सार्थ ठरते.

तीच गोष्ट डिसॅलिनेशनची. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी बनवण्याचा डिसॅलिनेशन प्रकल्प. डिसॅलिनेशन केलेल्या पाण्याचे दर महापालिकेच्या पाणी दराशी जुळत नसल्यामुळे व्यवहार्य नव्हता. तसेच डिसॅलिनेशन प्रकल्पातून वीज निर्मिती देखील होणार आहे अशीही भलामण आदित्य ठाकरे करतात त्याचा समाचार आपण पुढे घेऊच.

मात्र २०२१ साली आदित्य ठाकरे यांचे पिताश्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात हे दर जुळायला लागले व डिसॅलिनेशन प्रकल्प व्यवहार्य झाला. याला निव्वळ योगायोग म्हणावे की, पाण्याच्या दरांबरोबर केलेली “मांडवली”? तोच मुद्दा गारगाई प्रकल्पाच्या वृक्षतोडीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचा.

२०१९ पर्यंत आदित्य ठाकरे यांच्या पक्षाच्या हातात असलेल्या महापालिकेने गारगाई प्रकल्पासाठी कोणताही आक्षेप घेतलेला नव्हता किंबहुना या प्रकल्पासाठी त्यांचा आग्रहच होता. आणि तो योग्य देखील होता कारण वाढत्या लोकसंख्येबरोबर मुंबईकरांची वाढती तहान महापालिका भागवणार तरी कशी? मात्र आदित्य ठाकरे म्हणतात, २०१९ साली आम्ही या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास “पुन्हा” सुरू केला. मग आधी केलेला अभ्यास काय होता…? बहुदा आधी पर्यावरणाऐवजी फक्त टक्केवारीचा अभ्यास केलेला असावा. पण आता २०१९ साली आदित्य ठाकरे यांचे पिताश्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे टक्केवारीच्या गणिताचा अभ्यास पुन्हा सुरू करण्याची गरज होती असेच ना? नव्या अभ्यासाअंती टक्केवारीचे गणित जुळले नसावे त्यामुळे गारगाई प्रकल्प अचानक अव्यवहार्य ठरला. २०१३ साली अभ्यासा अंती आदित्य ठाकरे यांच्याच पक्षाच्या महापालिकेने हाती घेतलेल्या गारगाई प्रकल्पाची व्यवहार्यता ६ वर्षात धोक्यात यावी हे आश्चर्यजनकच नाही का?

गारगाई प्रकल्पासाठी सुमारे ५ लाख झाडे तोडली जाणार आहेत हे सत्यच आहे. परंतु देशभरातील प्रकल्पासाठींच्या अशा वृक्षतोडीसाठी देशातील न्यायालयांनी सरकारला काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिका अन्य ठिकाणी तिप्पट म्हणजे १५ लाख वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा ऱ्हास पुरेपूर रोखणार आहे.

शिवाय गारगाई धरणाचे आयुष्यमान किमान १०० वर्षे असणार आहे आणि आदित्य ठाकरे डिसॅलिनेशनच्या प्रकल्पातून वीज निर्मिती होणार अशी जी भलामण करतात अगदी तशीच वीज निर्मिती गारगाई प्रकल्पातून देखील होणार आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांच्या पुढच्या किमान ४ पिढ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व विजेची काळजी करण्याचे सोडून द्यावे.

आता पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाला आदेश देऊन मुंबई महापालिका व राज्य सरकारला गारगाई प्रकल्पातील वृक्षतोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी नवीन वृक्ष लागवडीसाठी मदत केल्यास त्यांचे पर्यावरण प्रेम बेगडी नाही याबाबत महाराष्ट्राच्या जनतेला जनतेची खात्री पटेल.

आज तरी आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम अत्यंत बेगडी आहे अशीच महाराष्ट्राच्या जनतेची समजूत व खात्री आहे. २०१९ साली उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुत्र प्रेमापोटी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याचे व मुंबईच्या उपनगरातील मालवणी, मालाडचे काँग्रेसचे आमदार व तत्कालीन कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री नेमले.

सदर अस्लम शेख महाशयांनी आपल्या मतदारसंघातील मालाडच्या मढ-मार्वे किनारपट्टी भागात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाकावर टिच्चून सी.आर.झेड (CRZ) नियमांचे उल्लंघन करून हजारो तीवरांची (mangroves) कत्तल करून ४९ अनधिकृत चित्रपट स्टुडिओज उभारले होते.

पर्यावरणाचा अपरिमित ऱ्हास आणि हजारो कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यासमोर झाला पण त्यांनी अथवा मुख्यमंत्री असलेल्या त्यांच्या पिताश्रींनी याबाबत निषेधाचा एक शब्द काढला नाही. कारवाई तर खूप दूरची गोष्ट राहिली.

याचा सरळ सरळ अर्थ आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम कचकड्याच्या बाहुलीसारखे आहे. व या स्टुडिओच्या झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या टक्केवारीच्या पेट्या त्यांच्या पिताश्रींच्या बंगल्यावर पोचल्या असे जर महाराष्ट्रातला सामान्य माणूस समजत असेल तर त्यात चूक ते काय?

गारगाई धरण आणि त्याच्या पाईपलाईनसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून शेवटी मुंबईला दररोज पाणी मिळणार किती? तर फक्त ४५० दशलक्ष लिटर म्हणून या प्रकल्पाला विरोध करणारे व त्याचा पर्याय म्हणून “डिसॅलिनेशन प्रकल्प” सुचवणारे आदित्य ठाकरे आपल्या अभ्यासपूर्ण लेखात म्हणतात की, या डिसॅलिनेशन प्रकल्पातून रोज मुंबईला ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळाले असते व पुढे याची क्षमता ६०० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवता आली असती. मात्र या प्रकल्पासाठीचा भांडवली खर्च सांगण्याचे त्यांनी शिताफीने टाळले आहे.

याच लेखात पुढे ते म्हणतात, “आमचा हा (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्प वर्षानुवर्षे प्रक्रिया न करता समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सुमारे ३२०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाण्याचं शुद्धीकरण करून त्यापैकी जवळपास २७०० एमएलडी पाणी पुन्हा वापरात आणणार होता. त्यामुळे आपल्या पाण्याच्या गरजांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला असता”.

मुंबई महापालिका मुंबईकरांना जे प्रतिदिन माणशी १५० लिटर पाणी देते ते शुद्ध स्वरूपाचे पिण्यायोग्य पाणी असते. म्हणजे मुंबईकर शौचालय, स्नानगृह, भांडीधुणी, कपडे धुणे, घराची स्वच्छता, झाडांना पाणी ही सगळी कामे देखील पिण्यायोग्य पाण्यानेच करतो.

सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी हे केवळ औद्योगिक कारणासाठीच वापरता येईल. घरांमध्ये असे पाणी महापालिकेने पुरवायचे म्हटले तर त्याच्यासाठी सबंध मुंबईभर वेगळी पाईपलाईन टाकावी लागेल आणि मुंबईच्या लोकसंख्येचा व इमारतींचा अवाढव्य पसारा बघता आजच्या घडीला तरी ते व्यवहार्य वाटत नाही. शक्य तेवढ्या सोसायट्यांनी आपल्याच आवारात सांडपाणी प्रक्रिया शुद्धीकरणाचे छोटे प्रकल्प उभारले तरच ते व्यवहार्य ठरेल.

मात्र “आज तरी” वाढत्या लोकसंख्येबरोबर मुंबईकरांची वाढती “तहान” मुंबई महापालिका अशा धरणाशिवाय कोणत्याही प्रकल्पाने भागवू शकत नाही. शिवाय सांडपाणी शुद्धी प्रकल्पासाठी भाजप प्रणित महायुतीच्या ताब्यातील महापालिका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कटीबद्ध आहेच. २०२२ साली आपल्या पिताश्रींचे सरकार पडले आणि नवीन महायुती सरकारने आपल्या योजनेतील प्रकल्पांचं टेंडर देऊन पंतप्रधानांना या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यासाठी आमंत्रित केलं. असा या लेखातील उल्लेख आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण प्रेमापेक्षा त्यांचे राजकीय वैफल्यच प्रकर्षाने दाखवतो.

या लेखात ते मनभावीपणे उपदेश देतात “आपल्याला गरज आहे ती पावसाचं पाणी साठवण्यासाठी टाक्या उभारण्याची, पाणी जमिनीत झिरपवण्यासाठी खड्डे (percolation pits) तयार करण्याची”.

हे ज्ञानामृत पाजण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी आपल्या पिताश्रींना हातात मुंबई महापालिका हातात असताना आपण यासाठी नेमके काय केले होते? असे एकदा खडसावून विचारण्याची गरज आहे. (अगदी प्रियंका चतुर्वेदींना परत खासदारकी मिळवून देण्यासाठी झालेल्या पक्षांतर्गत कलहात जो तारसप्तकातला सूर लावला होता त्याच सूरांत.)

आपल्या लेखात आदित्य ठाकरे मुंबईच्या पॉड टॅक्सीला “हवेत उडणारी ऑटो रिक्षा” म्हणून या सेवेचा उपहास करतात मात्र त्याच्याआधी त्याच लेखात “पुन्हा एकदा सरकारने पुढे आणलेल्या या प्रकल्पाचं बीज दहा वर्षांपूर्वी मी केलेल्या एका सादरीकरणात आहे, असं म्हणावं लागेल. ठाणे आणि नवी मुंबईसाठी ‘लास्ट माईल’ कनेक्टिव्हिटी म्हणून पॉड टॅक्सीचा प्रस्ताव मी तेव्हा मांडला होता.” म्हणून आपलीच पाठ आपणच थोपटून घेतात.

मात्र, नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या प्रस्तावाचा तो मांडल्यावर सखोल अभ्यास सुरू केला व “प्रत्येक प्रकल्पाप्रमाणे सखोल अभ्यास आणि पुढील चर्चानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत आलो की, ‘लास्ट माइल’ हा तत्त्वतः चालण्यास सोयीचा (वॉकेबल) असायला हवा, तो वाहनांवर आधारित असता कामा नये. आणि पॉड किंवा मेट्रोसारख्या, काँक्रीट ओतून अक्षरशः मार्ग कायमचा बांधून टाकणाऱ्या साधनांवर तर अजिबातच नाही”.

म्हणजे आधी प्रस्ताव मांडायचा आणि मग त्याच्यावर अभ्यास व सखोल चर्चा करायची. बहुदा ही बॉम्बे स्कॉटिश शाळेची पद्धत असावी किंवा सत्ता गेल्यानंतर आलेले शहाणपण असावे. वास्तविक आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा फायदा सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सारख्या घनदाट व्यावसायिक आस्थापनांच्या भागात वांद्रे स्थानक ते कुर्ला स्थानक यांना जोडणाऱ्या अवघ्या ८.८५ किमी लांबीच्या प्रवासासाठी ४० किमी वेगाने धावणारी आणि ६ प्रवासी बसू शकतील अशी पॉड टॅक्सी ही चैन नाही तर सुविधा आहे. मुंबईत प्रवासाची किती साधने आहेत याचा जन्मापासून BMW मध्ये फिरणाऱ्या आदित्य ठाकरे यांना अंदाज असावा अशी अपेक्षा आहे.

मुंबई BEST बस आहेत, रिक्षा आहेत, टॅक्सी आहेत, लोकल ट्रेन आहेत, मोनोरेल आहे, मेट्रो आहे. आता तर रॅपिडो बाईक देखील आल्या आहेत. जलद आणि सुखकर प्रवासाची आवश्यकता व प्रवाशाचा आर्थिक स्तर यावर वाहतुकीची साधने अवलंबून असतात. त्यात ठराविक भौगोलिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक अशा पॉड टॅक्सीची भर पडली तर आदित्य ठाकरेंना ती डोळ्यात खुपण्याचे कारण काय? आणि काँक्रीट ओतण्याविषयी तर आदित्य ठाकरे यांनी बोलूच नये. मुंबईत काँक्रीटचे जंगल उभे राहिले आहे ते त्यांच्याच पक्षाच्या महापालिकेच्या कारकिर्दीत आणि या लेखात ते असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की मुंबईतील बेस्ट बस सेवा बंद करून पॉड टॅक्सी सुरू करण्यात येत आहे. वस्तुस्थिती बरोब्बर उलट आहे. मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी बेस्ट (BEST) च्या ताफ्यात २०२६ च्या अखेरपर्यंत सुमारे २,००० ते २,५०० नवीन बसेस दाखल करण्याचा प्रस्ताव आहे. यापैकी बहुतेक बसेस इलेक्ट्रिक (E-buses) असतील, ज्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.

आपल्या लेखात आदित्य ठाकरे यांनी या सर्व प्रकल्पांच्या खर्चासाठी महापालिकेने आणि राज्य सरकारने केलेल्या तरतुदीला “उधळपट्टी” म्हणत आहेत.

“जहाज सगळ्यांत सुरक्षित किनाऱ्यावर असतं परंतु ते किनाऱ्यावर उभं करण्यासाठी बांधलेलं नसतं” अशी एक म्हण आहे.

जनतेला सोयी सुविधा पुरवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना निर्णय घ्यावे लागतात. योजना प्रकल्प राबवावे लागतात. त्यात काहीवेळा आपल्या हातात नसलेल्या घटकांमुळे अकल्पित उद्भवलेल्या बाह्य संकटामुळे जसे की, कोविड किंवा आखाती देशांतील युद्ध, अपेक्षित खर्चाचा अंदाज मागेपुढे होऊ शकतो. मात्र तरीही तो प्रकल्प नेटाने राबवणे हेच तर सत्ताधाऱ्यांचे कौशल्य व पुरुषार्थ असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका हाच पुरुषार्थ गाजवत आहेत. अर्थात् “प्रत्येक योजनेला स्थगिती” देण्यातच ज्या सरकारने पुरुषार्थ मानला त्यांना हे सगळे सांगून फायदा काय?

काही दिवस “नाईट लाईफ”पासून फारकत घेऊन आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या ताब्यातील मुंबईमध्ये टोलेजंग इमारतींपासून अनधिकृत झोपड्यापर्यंत मुंबई कशी अस्ताव्यस्त पसरत गेली याचा अभ्यास करावा. आणि या सर्व नैतिक अनैतिक व्यवहारातील किती पेट्या आणि खोके आपल्या बंगल्यावर पोचत होत्या याचा थोडासा हिशोब पिताश्रींना विचारून घ्यावा.

आज त्या पेट्या व खोके हातात सत्ता नसल्यामुळे बंद झाल्याच्या नैराश्यातून आदित्य ठाकरे यांनी लिहिलेला आहे हा लेख आहे परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. फक्त त्यांच्या अभ्यासात आणि आदित्य ठाकरे यांच्या अभ्यासात एकच फरक आहे. देवेंद्रजी आधी अभ्यास करतात आणि नंतर निर्णय घेतात. त्यामुळे ते यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. आदित्य ठाकरे (आणि त्यांचे पिताश्री) आधी निर्णय घेतात आणि मग अभ्यास करतात. त्यामुळे ते दोघेही सतत तोंडघशी पडून अपयशी ठरले आहेत आणि त्यांच्या हातातून कायमची सत्ता निसटलेली आहे.

क्रोधें अपमानें कुबुद्धि | आपणास आपण वधी |
जयास नाहीं दृढ बुद्धि | तो येक मूर्ख ||

अन्य लेख

संबंधित लेख