Friday, April 24, 2026

मार्टिन ल्यूथर – सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू- भाग ३

Share

३१ ऑक्टोबर १५१७ हा दिवस रिफाॅर्मेशन डे म्हणून पाळला जातो. १५२० मध्ये मार्टिनने तीन पुस्तके लिहली. मागील प्रकरणात आपण To the Christian Nobility of German Nation या पुस्तकाबद्दल पाहिले त्याचे दुसरे पुस्तक होते On the Babylon Captivity of the Church.

यामध्ये मार्टिन ल्यूथर म्हणतो की, रोमन चर्च आणि पोप यांनी चर्चला बंधक बनविले आहे. धार्मिक संस्कार आणि रोमन तत्वज्ञान याचा वापर करून चर्चला पोपनी बांधून ठेवले आहे. ख्रिश्चन धर्मात सात धार्मिक संस्कार  सांगितले आहेत बाप्टिझम, कन्फर्मेशन, युखारिस्ट, पेनेन्स, Anointing of sick, होली ऑर्डर्स आणि मॅट्रिमोनी.

मार्टिन ल्यूथर म्हणतो की, यातील बाप्टिझम, युखारिस्ट आणि पेनेन्स हे तीनच धार्मिक संस्कार खरे आहेत बाकी अनावश्यक आहेत. प्रत्येक व्यक्तीला ख्रिश्चन बनविताना त्याला बाप्तिस्मा दिला जातो. त्यासाठी त्याच्यावर पाणी शिंपडले जाते किंवा त्याचे डोके तीन वेळा पाण्यात बुडविले जाते बाप म्हणजे फादर, सन म्हणजे मुलगा आणि होली स्पिरीट म्हणजे पवित्र आत्मा याला ख्रिश्चन धर्मात ट्रिनीटी असे म्हणतात. God the Father, God the spirit and God the Holy Spirit. ही ट्रीनिटी मार्टिन ल्यूथरला मान्य होती. युखारिस्ट हे एक येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना दिलेले शेवटचे रात्रीचे जेवण होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, तुम्हाला दिलेला ब्रेड हे माझे शरीर असून तुम्हाला दिलेली वाईन हे माझे रक्त आहे. गुरूवारी किंवा रविवारी हा युखारिस्ट चर्चमधे केला जातो. ब्रेड व वाईन टेबलवर मांडली जाते आणि मग प्रेयर म्हणजे प्रार्थना केली जाते आणि मग या प्रार्थनेमुळे हा ब्रेड आणि ही वाईनमध्ये येशू प्रवेशतो अशी श्रद्धा आहे. मार्टिन ल्यूथर म्हणतो की, अशा कोणत्याही प्रार्थनेची आवश्यकता नाही. येशू तिथे असतोच. हे सर्व धर्मगुरूंनी स्वतःचे प्रस्थ वाढवायला केले आहे. पश्चात्तापासाठी (penance) कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. या पुस्तकाचा एकूण सूर हा धर्मगुरूंविरूद्ध रागाने भरलेला दिसतो.

१५२० मध्ये लिहलेले तिसरे पुस्तक म्हणजे On the Freedom of Christian. यात मार्टिन म्हणतो, ख्रिश्चन हे देवाने क्षमा केलेलेच पुत्र आहेत त्यानी देवाचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. ख्रिश्चन माणूस हा मर्जीचा राजा आहे, स्वतंत्र आहे आणि कोणालाही जबाबदार नाही आणि प्रत्येक ख्रिश्चन हा सर्वांचा कर्तव्यदक्ष सेवक आहे आणि सर्वांपर्यंत जबाबदार आहे. फक्त फेथ म्हणजेच दृढ विश्वास हाच तुम्हाला ख्रिस्ताच्या किंवा देवाच्या जवळ घेऊन जाईल.

मार्टिन ल्यूथर बायबलमधील अनेक दाखले देत सांगतो, जीजस ख्रिस्त, आपला देव, आपला ईश्वर हा आपण केलेल्या पापासाठी मृत्यु पावला. आणि तुमच्या आमच्या मुक्तीसाठी तो परत आला. तो एकच देवाचे लाडके कोकरू आहे की जे जगातील पाप नाहीसे करेल, आपण केलेला अधर्म देवानी त्याच्याकडे दिला. सर्वजण पापी आहेत त्यांची कर्मे अथवा गुण यांचा विचार न करता केवळ ईश्वरी कृपा जी जीजस ख्रिस्त याच्या रक्तात भरलेली आहे जी माणसाला पापमुक्त करते.( Roman’s 3:23- 25)

यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही कृतीने, कायद्याने अथवा गुणवत्तेने हे समजणार नाही. म्हणून हे निश्चित आहे की, अढळ विश्वास हाच पापमुक्त करतो. आणि हेच खरे आहे. मार्टिन ल्यूथरने धार्मिक व्यवस्था आणि पोप व त्याची होली ऑर्डर याविरुद्ध शड्डू ठोकरल्याने साहजिकच पोप व राजा याची वक्रदृष्टी त्याच्याकडे वळणे अपरिहार्य  होते.

                                       – डॉ. प्रसाद केळकर

अन्य लेख

संबंधित लेख