Wednesday, December 31, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मरणार्थ कराडमध्ये ‘बंधुता परिषद’

Share

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ, २ जानेवारी रोजी‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रम सोमवार पेठेतील भवानी मैदान, पंतांचा कोट येथे होणार आहे. याच ठिकाणी २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघाच्या शाखेला भेट दिली होती.

या कार्यक्रमास केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि प्रसिद्ध सामाजिक आयोजक व डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील संघ शाखेला दिलेली भेट केवळ औपचारिक नव्हती, तर ती सामाजिक संवाद आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक होती. त्यांनी संघाबाबत आत्मीयता व्यक्त करताना म्हटले होते की, “काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आत्मीयतेने पाहतो.” त्यांच्या या भेटीची सविस्तर बातमी ९ जानेवारीच्या ‘केसरी’ दैनिकात प्रसिद्ध झाली होती.

त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या ‘जनता’ या साप्ताहिकातही या भेटीचा उल्लेख आढळतो. गरज भासल्यास संघाला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचेही त्या वृत्तात नमूद आहे. याआधी १९३९ मध्ये त्यांनी पुणे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला भेट दिली होती. त्या वेळी शिबिरातील सामाजिक ऐक्य, परस्पर स्नेह आणि शिस्त पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले होते. जातीभेदाचा अभाव पाहून त्यांनी विशेष समाधान नोंदवले होते. पुणे भेटीनंतर काही महिन्यांतच त्यांनी कराड येथील शाखेला भेट दिली होती.

डॉ. आंबेडकरांच्या या दोन्ही भेटी सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या भेटी परस्पर सन्मान, संवाद आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानल्या जातात. पुणे येथील शिबिरातील सकारात्मक अनुभवामुळेच त्यांनी कराड शाखेला भेट दिली, असे अभ्यासक मानतात.

डॉ. आंबेडकर यांच्या संघाबाबतच्या आत्मीयतेचा आणखी एक संदर्भ त्यांच्या ‘जनता’ साप्ताहिकात आढळतो. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या बातमीत त्यांचा उल्लेख “नागपूरचा एक थोर आणि उत्साही हिंदू कार्यकर्ता” असा करण्यात आला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर समाजात बंधुभाव, संवाद आणि परस्पर आदराची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने कराड येथे ही बंधुता परिषद आयोजित करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ, त्याच शाखेच्या परिसरात हा कार्यक्रम २ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख