Wednesday, December 3, 2025

जागावाटपापूर्वीच भाजपची ‘मिशन BMC’ साठी जोरदार तयारी; राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण ‘कोर कमिटी’ बैठक

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने नुकतीच एक महत्त्वाची आणि विस्तारित कोर कमिटी बैठक यशस्वीरीत्या पार पाडली. पक्षाचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

रणनितीवर सखोल चर्चा
या बैठकीत आगामी निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठीच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच, पक्षाच्या मुंबईतील बळकटीसाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी आवश्यक असलेल्या पुढील नियोजनावरही बैठकीत विचारमंथन झाले. महायुतीमधील संघटनात्मक एकता कायम राखून निवडणुकीला सामोरे जाण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी आशिष शेलार, राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम, मुंबईतील भाजपाचे सर्व आमदार, मुंबई भाजपाचे सर्व महामंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष तसेच मुंबई भाजपमधील सर्व प्रमुख नेते आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या या बैठकीमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात आता हालचालींना वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या अंतिम निर्णयापूर्वीच भाजपने निवडणुकीसाठी आपली रणनीती पक्की करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख