Saturday, July 27, 2024

प्रतीक्षा शिवाची – हिंदूंच्या प्रेरणादायी, चिवट लढ्याचा इतिहास

Share

प्रसिद्ध लेखक, इतिहास संशोधक विक्रम संपत यांच्या Waiting for Shiva : Unearthing the Truth of Kashi’s Gyan Vapi या इंग्रजी पुस्तकाचा ‘प्रतीक्षा शिवाची – काशी ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ हा मराठी अनुवाद डॉ. प्राची जांभेकर आणि मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. या पुस्तकाचा परिचय.

अयोध्येच्या राममंदिर उद्घाटनानंतर आता कोट्यवधी हिंदूंना काशी आणि मथुरेच्या मुक्तीची आस लागलेली आहे. मागील शेकडो वर्षांत अनेक वेळा सामान्य हिंदूंनी या तीर्थस्थळांच्या मुक्तीसाठी हसत हसत आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या आहेत. पण हा खरा इतिहास आजपावेतो जाणूनबुजून जनसामान्यांपर्यंत पोहोचू दिलेला नाही. मूळ विक्रम संपत लिखीत पुस्तकाच्या ‘शिवाची प्रतीक्षा’ या अनुवादामुळे हा सगळा विषय नेमकेपणाने मराठी वाचकांपर्यंत पोचण्याची व्यवस्था झाली आहे. यात मांडलेला इतिहास ठोस पुराव्यांनिशी लिहिलेला आहे, हे सांगणे न लगे.

शिवछत्रपतींपासून ते सदाशिवभाऊ पेशवे, बाळाजी बाजीराव पेशवे, मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी वेळोवेळी या पवित्र स्थळांना हिंदूंच्या ताब्यात द्या म्हणून त्या त्या भागातील तत्कालीन मुस्लिम शासकांना पत्रे लिहिलेली आहेत.

कुशल शासक म्हणून जनमानसांत आजही अतिशय आदराचे स्थान मिळविलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्ञानवापी मुक्त करता आली नाही म्हणून हातपाय गाळून बसल्या नाहीत. बाजूच्या भग्न मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची मोठी भूमिका त्यांनी आपल्या कार्यकाळात बजावली होती.

१७४७ मध्ये बाळाजी बाजीराव पेशवे काशीयात्रेला जाऊन आले. १७५२ च्या भालकीच्या तहानंतर आपले सरदार जयाप्पाला त्यांनी १७५३ मधील उत्तर हिंदुस्थानच्या मोहिमेत काशीचा विषय मार्गी लावण्याचे हुकूम दिले. पण कुंभेरचा वेढा उठल्यानंतर जयाप्पा काशीला जाणार, तोपर्यंत त्यांच्यावर नागोरची मोहीम आली आणि दुर्दैवाने काशीची मुक्ती मागे पडली. परत मार्च आणि १७५४ मध्ये विजेसिंगाची मोहीम झाल्यावर जयाप्पा, आपले दुसरे सरदार बाबूराव महादेव यांच्याबरोबर काशी मुक्तीसाठी जाणार होते, पण तेही घडू शकले नाही. जयाप्पाने ऑगस्ट १७५४ मध्ये परत एकदा काशीवर जाण्याची योजना आखली. तीही काही कारणाने मागे पडली आणि पुढच्या वर्षी त्यांचे निधन झाले.

पुढे १७५९ मध्ये बाळाजीने सरदार दत्ताजी शिंदे यांना काशी, प्रयाग, बंगाल मोहीम काढायला सांगितली होती. परंतु अब्दालीच्या संकटाचा सामना करण्यासाठी दत्ताजी त्या बाजूला वळले आणि काशीमुक्ती कायमची राहून गेली!

पुढे ब्रिटिश काळात यासंदर्भात हिंदू, मुस्लिम पक्षात सतत कायदेशीर लढाया होत राहिल्या. पण विषय सुटण्याऐवजी रेंगाळत राहिला. अशा सतत केल्या जाणाऱ्या, विविध काळातील प्रयत्नांमुळेच आजही आपण हिंदू पक्ष म्हणून न्यायालयात आपली बाजू स्पष्टपणे मांडू शकतो आहोत. हिंदू समाजाने आपल्या देवाधर्माला कधीच वाऱ्यावर सोडले नाही, याचा हा सज्जड पुरावा या पुस्तकात वाचावयास मिळतो.

शिवद्रोहाचा संतापजनक, दुःखदायक इतिहास
आपला देश ब्रिटिश जोखडातून मुक्त झाल्यावर भारतावर ‘बाह्यांगा’ने हिंदू दिसणाऱ्या नेत्यांचे राज्य सुरू झाले. या नेत्यांना हिंदूंच्या भावना काय आहेत यापेक्षा प्रत्येक बाबतीत मुस्लिमांना काय वाटेल याचीच चिंता सतत सतावत होती. परिणामस्वरूप संविधान सभेचे सदस्य, काँग्रेस नेते पट्टाभि सीतारामय्या, विश्वंभर दास आदी ‘तथाकथित’ बुद्धिवान लोकांनी काशीच्या विध्वंसाला औरंगझेब आणि अन्य मुस्लिम शासक कसे जबाबदार नाहीत हे सिद्ध करण्यासाठी धादांत खोट्या ‘सेक्युलर’ सिद्धांतांना जन्म दिला. ते सिद्धांत ऐतिहासिक सत्यापासून कोसो दूर तर आहेतच, पण त्यांनी शब्दशः रचलेले हे सिद्धांत वाचून कोणत्याही हिंदूच्या अंगाची संतापाने लाही लाही होईल. इतकी नीचपणाची परिसीमा या तथाकथित ‘हिंदू’ बुद्धिजीवी लोकांनी ओलांडली आहे.

अधमपणाची मर्यादा पार करणारे हे सिद्धांत काय होते?
त्यामागील ऐतिहासिक सत्य काय आहे? मागील शेकडो वर्षांत कुणी कुणी या तीर्थस्थळाच्या मुक्तीसाठी सैनिकी, राजकीय, कायदेशीर लढाया लढल्या? या आणि अन्य तपशिलांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

स्वतंत्र भारतातील काँग्रेस नेते, विचारवंत आणि सामाजिक नेतृत्व हे मुघलकालीन अत्याचारांना कशाप्रकारे न्यायसंगत ठरवत होते किंवा काळा इतिहास पुसून तो गोरा कसा करायचा असे प्रयत्न मुघल बादशाह औरंगझेब करत होता, हे या पुस्तकात ऐतिहासिक तथ्यांबरोबर तुलना करून स्पष्ट लिहिलेले आहे.

अशाप्रकारे काशीक्षेत्राची मुक्ती डोळ्यासमोर ठेवून हिंदूंनी केलेल्या प्रयत्नांची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय चळवळ आणि तिला विरोध म्हणून दुसऱ्या पक्षाने केलेले त्याच प्रकारचे प्रयत्न याचाही या पुस्तकात लेखाजोखा मांडलेला आहे.

पुस्तक वाचताना आपल्या पूर्वजांनी दिलेले बलिदान, केलेले संघर्ष, उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम हिंदूंच्या मनात काशीबद्दल किती उत्कट भावना होत्या हे वाचताना आपला ऊर भरून येतो. त्याचवेळी स्वातंत्र्यलढ्यात काही भूमिका बजावली म्हणून मान मिळालेल्या हिंदू नेत्यांच्या संतापजनक शिवद्रोहाची कहाणी वाचून आपल्या संतापाचा स्फोट होतो. दुसऱ्या बाजूने अयोध्येच्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला बघून आणि दशकानुदशके दाबलेल्या ऐतिहासिक सत्याला आताच्या नव्या माध्यमांमुळे ‘सत्याचा प्रकाश’ दिसला याचे समाधान मिळते आणि आता ‘ज्ञानवापी’च्या बाहेर शेकडो वर्षे आपल्या आराध्याची संयमाने प्रतीक्षा करणाऱ्या नंदीला लवकरच आपल्या आराध्याचे दिमाखात दर्शन होईल याचीही मनोमन खात्री पटते.

अमिता आपटे
(लेखिका सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक आहेत.)

या लिंकवरून ‘प्रतीक्षा शिवाची – काशी ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ हे पुस्तक विकत घेता येईल.

Limited-time deal: Waiting for Shiva: Unearthing the Truth of Kashi’s Gyan Vapi (Marathi) https://amzn.in/d/7BN3bZz

अन्य लेख

संबंधित लेख