Monday, March 31, 2025

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला

Share

येत्या विजयादशमीच्या (Vijayadashami) दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षे पूर्ण करत आहे (RSS is completing 100 years). त्यानिमित्ताने पुढील विजयादशमीपासून, शताब्दी वर्षाच्या दरम्यान संघाने सहा मुख्य कार्यक्रम करण्याचे निश्चित केले असून या सर्व उपक्रमांमध्ये व्यापक लोकसंपर्क आणि अधिकाधिक लोकसहभाग हे मुख्य सूत्र ठेवण्यात आले आहे.

बेंगळुरू येथे संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (ABPS) आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांनी वर्षभर आयोजिल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.

विजयादशमीला संचलन

संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात विजयादशमी २०२५ या दिवशी होईल. त्यात संघाच्या गणवेशातील स्वयंसेवकांचे मंडल किंवा वस्ती स्तरावरील संचलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. दरवर्षीप्रमाणे नागपूर येथील कार्यक्रमात सरसंघचालक स्वयंसेवकांना संबोधित करतील.

गावागावात, घरोघरी संपर्क

नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात ‘प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत, घरोघरी’ (हर गाव, हर बस्ती-घर-घर) या संकल्पनेनुसार आणि स्थानिक सोयीनुसार संपर्कासाठी प्रत्येक प्रांतात तीन आठवड्यांचा कालावधी निश्चित केला जाईल. तीन आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी संपर्क मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे व्यापक संपर्क अभियान असेल आणि घरोघरी संपर्क केला जात असताना स्थानिक शाखांकडून संघ साहित्याचे वितरणही केले जाईल

हिंदू समाज संमेलनांचे आयोजन

सर्व मंडल स्थाने किंवा वस्त्यांमध्ये हिंदू समाज संमेलनेही आयोजित केली जाणार आहेत. हिंदू समाजाने भेदभाव न बाळगता सर्वांच्या दैनंदिन जीवनात एकता आणि सुसंवाद रहावा, राष्ट्रकार्यात प्रत्येकाचे योगदान असावे आणि पंच परिवर्तनात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असावा हा संदेश या संमेलनातून दिला जाईल. हिंदू समाज संमेलन असे या संमेलनांचे स्वरूप असेल. त्यात सर्वांचा सहभाग रहावा यासाठी गणमान्य व्यक्तींचा सहभाग असलेल्या स्थानिक समित्याही स्थापन केल्या जातील. पंच परिवर्तनाचा अवलंब व्यक्तिगत आणि कुटुंबात केला जावा, असा विषय आग्रहाने या संमेलनातील वक्त्यांकडून मांडला जाईल.

सामाजिक सद्भाव बैठका, मेळावे

खंड किंवा शहर पातळीवर संघातर्फे सामाजिक सद्भाव मेळावे आयोजित केले जाणार आहेत. त्यांमध्ये एकरसतेने जगण्याचा विचार वर भर दिला जाईल सांस्कृतिक पाया आणि हिंदू चारित्र्य न गमावता आधुनिक जीवन जगणे, असा विषय या मेळाव्यांमध्ये मांडला जाईल. पंथ, संप्रदाय विभिन्न असले तरी समाज म्हणून आपण एक आहोत, हा विचार या बैठकांमध्ये मांडला जाईल.

संवादाचे कार्यक्रम (प्रमुख जन-गोष्टी)

जिल्हा पातळीवर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांशी संवादाचेही कार्यक्रम संघाकडून आयोजित करण्यात येतील. या नागरिक संवाद कार्यक्रमात राष्ट्रीय मुद्द्यांवर योग्य दृष्टिकोन मांडण्यावर आणि आज समाजात प्रचलित असलेल्या चुकीच्या प्रथा बाजूला ठेवण्यावर भर असेल. तशी भूमिका मांडली जाईल, विमर्श बदलण्यासाठी आणि सत्य स्थापित करण्यासाठी प्रमुख जन-गोष्टी कार्यक्रम आयोजिले जाणार आहेत.

युवकांसाठी संमेलने

प्रांत शाखांकडून युवकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. राष्ट्र उभारणी उपक्रम, सेवा उपक्रम आणि पंच परिवर्तन यावर लक्ष केंद्रित करणारे अनेक कार्यक्रम १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी हाती घेण्यात येतील. स्थानिक कार्यकर्ते गरजेनुसार या कार्यक्रमांचे नियोजन करतील.

गेल्या १०० वर्षांतील संघाच्या वाटचालीबद्दल एका प्रश्नाचे उत्तर देताना होसबाळे म्हणाले, हिंदू समाजाचे पुनरुज्जीवन हाच आमचा कार्यक्रम आहे. हिंदू समाजाचे संघटन करणे हा संघाचा कार्यक्रम आहे. अस्पृश्यतेसारख्या अनेक अंतर्निहित दोषांमुळे हे एक महाकठीण काम होते. ते साध्य करण्यासाठी शाखा तसेच एकसंध समाज आणि राष्ट्रासाठी सर्वांना एकत्र आणणाऱ्या देशव्यापी उपक्रमांद्वारे संघ हे काम दृढपणे करत आहे.

अनेक शतकांपासून हे व्रत

संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवारजींनी संघस्थापनेदरम्यान म्हटल्याप्रमाणे, संघ कोणतेही नवीन कार्य सुरू करत नाही, तर अनेक शतकांपासून सुरू असलेले व्रत पुढे नेत आहे, असे सांगून होसबळे म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यात संघ यशस्वी झाला आहे. संघ केवळ राष्ट्राला एकत्र आणण्याचे काम करत नाही तर नैसर्गिक आपत्तीदरम्यान आणि नंतर मदत आणि पुनर्वसन कार्यात सक्रियपणे सहभागी होतो. संघाचा उद्देश हा मोठा टप्पा साजरा करण्याचा नसून आत्मनिरीक्षण करणे, संघाच्या कार्याला समाजाने दिलेल्या पाठिंब्यासाठी दाद देणे आणि राष्ट्राच्या कार्यासाठी आणि समाजाचे संघटन करण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करणे हा आहे. शताब्दी वर्षात अधिक बारकाईने, गुणात्मक आणि व्यापकपणे काम करण्याचा आम्ही संकल्प करत आहोत

अन्य लेख

संबंधित लेख