Saturday, May 25, 2024

भाग १ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार….

Share

बघता बघता शंभर वर्षे होतील या चवदार तळे सत्याग्रहाच्या घटनेला. १९ मार्च १९२७ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सर्वांनी मुळापासून अभ्यासले पाहिजे. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन छोटे-मोठे “उद्योजक” बनलेल्यांची संख्या केवळ महाराष्ट्रात अंदाजे लाखावर जाईल. ही एक स्वागतार्ह, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे माझे मन मला सांगते.

राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, न्याय (निर्बंध) शास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास इत्यादी शास्त्रांचे अध्ययन करून, भीमराव रामजी उपाख्य भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी म्हणजेच महासंग्रामात उतरले. पारंपरिक हिंदू समाजाची रचना आणि त्यात पिचलेला अस्पृश्य समाज याचे आणि आधुनिक हिंदू समाजाचेही एकत्रित भवितव्य त्यातून घडणार होते. त्यासाठी मार्गदर्शनाचे सूतोवाच करणारे त्यांचे १९ मार्च १९२७ चे भाषण हे सर्वांनी मुळापासून अभ्यासले पाहिजे. या भाषणामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. एक अस्पृश्य, वंचित समाजासाठी प्रगतीचा मार्ग मिळाला, “स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार.” आणि हिंदू समाजाला प्रगती करण्यासाठीची सूत्रे म्हणजे नेमके कुठे चुकते, याचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक संबंधातले मार्गदर्शनही मिळाले. या मार्गदर्शनासाठी हिंदू समाज बाबासाहेबांचा युगानुयुगे ऋणी राहील.

स्वाभिमान

लष्करी सेवेमुळे कोकणातील लोकांनी आपला दर्जा कसा वाढविला होता, हे बाबासाहेबांनी महाड परिषदेसाठी जमलेल्या आपल्या अनूसूचित जातींच्या अनुयायांना समजाऊन दिले. ते म्हणतात, “या प्रांतातील लोकांनी आपला दर्जा वाढविला होता, इतकेच नव्हे, तर त्यांची शिक्षणातही विलक्षण प्रगती झाली होती. त्यांच्यातील शेकडा ९० टक्के लोक साक्षर होते, इतकेच नव्हे ५० टक्के लोक तरी वरच्या दर्जाचे सुशिक्षित होते. त्यातल्या त्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, हा शिक्षणाचा प्रसार पुरूष मंडळीत होता, इतकेच नव्हे, स्त्रियांतही होता. काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की, भर पुरूषांच्या सभेत पुराणांचा अन्वयार्थ करून सांगत. या शिक्षणातील प्रगतीला लष्करीपेशाच कारणीभूत झाला.

स्वाभिमानाने जगण्यासाठी पुढे बाबासाहेब मांडतात की, केवळ लष्कर भरती झाली तर सर्व कार्यक्रम आटोपला काय ? पुढे ते सुचवतात की, स्वाभिमानाने जगायचे असेल तर, पांढर पेशा आणि शेतीचा धंदा केला पाहिजे.

भाषणाचा शेवटही अतिशय हृद्य आहे. ते म्हणतात, “आपल्याला विशेषतः सांगावयाची गोष्ट ही की, आपणा सर्वांनी जागृतीचे काम विशेष जोराने करावयास पाहिजे. जागृतीचा विस्तव कधीही विझू देता कामा नये.”

परिषदेचा शेवट मुंबईचे पाहुणे रा.गंगाधर सहस्रबुद्धे यांच्या भाषणाने झाला. (संदर्भ : बहिष्कृत भारत, रविवार, ३ एप्रिल १९२७)

आत्मोद्धार आणि स्वावलंबन

या सत्याग्रहावर टिपण टाकतांना बाबासाहेबांचे एक चरित्र लेखक श्री.धनंजय कीर लिहितात,”…त्यांनी (अनुयायांनी) आपल्या नेत्याचा उपदेश तंतोतंत आचरणात आणावयास प्रारंभ केला. गुरे ढोरे ओढणे, मृत जनावरांचे मांस खाणे, स्पृश्यांच्या घरी भाकरीचे तुकडे मागणे, असा जो दिनक्रम होता, त्याला त्यांनी फाटा दिला. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिणे गुन्हा होत नाही, हे त्यांना कळू लागले. मिळेल तो कामधंदा ते करू लागले. तथापि, त्यांच्या मनावर जर प्रामुख्याने कोणता परिणाम झाला असेल तर तो संघटनेचा नि स्वावलंबनाच्या तत्वाचा….”

इथेच एका गोष्टीकडे लक्ष वेधणे अनाठायी होणार नाही असे वाटते. संघाला आजचे आरक्षण केवळ मान्यच आहे, असे नाही, तर संघाचा त्याला पाठिंबाही आहे (ठराव : रा. स्व. प्रतिनिधी सभा १९८१). एवढेच नव्हे, रा. स्व. संघाचे तिसरे सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस १९७४ च्या पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत जाहीर करतात की, किती काळापर्यंत घ्यायचे, हे आरक्षण घेणारांनीच ठरवायचे आहे. बाकिच्यांचा तो विषय नाही.

बघता बघता शंभर वर्षे होतील या चवदार तळे सत्याग्रहाच्या घटनेला. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन छोटे मोठे “उद्योजक” बनलेल्याची संख्या केवळ महाराष्ट्रात अंदाजे लाखावर जाईल. ही एक स्वागतार्ह, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे माझे मन मला सांगते. अंतःकरण भरून येते. या सगळ्या उद्योजकांना मनापासून विशेष धन्यवाद देतो. स्वतःच्या उद्धाराबरोबर देशाच्या प्रगतीतही यामुळे हातभार लागतोच. देश उद्योजकतेमुळेच मोठा होत असतो. आरक्षणामुळे प्रत्येक अनुसूचित जातीतील मर्यादित संख्येला फायदा होतो, पण कोणत्याही एका जातीला पुरतील, एवढ्या नोकऱ्या आहेत काय ? त्यामुळे कोणत्याही एका अनुसूचित जातितील आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या मंडळींना उद्योगांची कास धरूनच प्रगती करता येईल. पूजनीय बाबासाहेबांचेच एक पुस्तक “प्राचीन भारताचा व्यापार” (Ancient Commerce in India) हे जरूर नजरेखालून घालावे.

मला हे लिहितांना हर्ष होतो की, आमचे जवळचे मित्र उद्योजक आयु. मा. दुष्यंत आठवले आणि “डिक्की” या उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष मा. मिलींद कांबळे यांची तर घोषणाच आहे, ” आम्ही नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे तयार करत आहोत.” उद्योगावर आधारित आयु. दुष्यंतजींचे पुस्तक “आठ वलये ” आता विद्यापीठीय पाठ्यक्रमात दाखल झाले आहे, ही अभिनंदनीय बाब होय. ही बाब अनूसूचित जातीतील तसेच अनारक्षित गटातील बंधूभगिनी ध्यानात घेतील काय ? मी तर ह्या पुस्तकाचा (“आठ वलये”) प्रचार करतो. अपवादाने नव्हे, शेकड्यात, हजारात लक्षाधीश कोट्याधीश या अनूसूचित जमातीतून उभे राहात आहेत, ही भारतास ललामभूत बाब नाही काय ?

डाॅ. रमेश माधवराव पांडव
(लेखक रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळाचे सदस्य आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख