Monday, February 23, 2026

मी विरोधी पक्षनेता असताना दादा मला मुख्यमंत्री म्हणायचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. “महाराष्ट्राला एक अत्यंत सक्षम मुख्यमंत्री मिळाला असता, असे नेतृत्व आज आपल्यात नाही. राज्याने खऱ्या अर्थाने एक न लाभलेला मुख्यमंत्री गमावला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दादांचा तो अचूक ‘टायमिंग’ आणि स्पष्टवक्तेपणा
अजित पवारांच्या शिस्तीचे दाखले देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “दादांचे टायमिंग कधीच चुकायचे नाही. १२ चा कार्यक्रम असेल तर दादा ११:५९ ला तिथे हजर असायचे. मात्र, नियतीने आज त्यांचे टायमिंग चुकवले. दादांना एखादा निर्णय पटला नाही, तर ते तोंडावर स्पष्ट सांगायचे. मंत्रिमंडळातील प्रत्येक विषयाचा त्यांचा अभ्यास दांडगा असायचा.”

विरोधी पक्षनेते असतानाचा ‘तो’ किस्सा
फडणवीस यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “जेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा दादा मला मुख्यमंत्री म्हणून हाक मारायचे. राजकारणातील गणिते काहीही असोत, पण मुख्यमंत्री पदासाठी लागणारी पूर्ण क्षमता अजित दादांच्या व्यक्तित्वात होती. मला विश्वास आहे की नियतीने त्यांचे हे स्वप्न कधी ना कधी पूर्ण केले असते.”

वसंतदादा आणि अजितदादा: महाराष्ट्राचे दोन ‘दादा’
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘दादा’ या शब्दाला एक वेगळे वलय आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि अजितदादा यांची तुलना करत म्हटले की, “महाराष्ट्रात अनेक नेते झाले, पण वसंतदादा आणि अजितदादा ही दोनच नावे अशी आहेत, ज्यांना महाराष्ट्र त्यांच्या कामामुळे ‘दादा’ म्हणून सदैव लक्षात ठेवेल.”

बारामतीचा अपराजित नेता
अजित पवारांच्या राजकीय प्रवासावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सुरुवातीला अबोल वाटणारे अजित पवार पुढे जाऊन ‘काम करणारा मंत्री’ म्हणून ओळखले गेले. बारामतीचा हा ‘अपराजित नेता’ जनतेच्या प्रेमाचा मोठा ठेवा मागे सोडून गेला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख