आळंदी : वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा, राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आळंदी (Alandi) येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या ह.भ.प मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या व ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ह.भ.प कुरेकर महाराज यांना शांतीब्रह्म पुरस्कार आणि ह.भ.प. ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संतपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायातील मान्यवर, वारकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मोठी संत परंपरा आपल्याला लाभल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. कारण धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार, चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात, दुष्ट विचार दूर जातात. मला काय मिळाले यापेक्षा दुसऱ्याला काय देणार हे महत्त्वाचे आहे. स्वत:साठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणाऱ्यांपैकी वारकरी संप्रदाय आहे, असेही ते म्हणाले.