Saturday, January 10, 2026

पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार; ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कसब्यात भाजपची ताकद वाढली!

Share

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election) रणधुमाळीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कसब्यातील ज्येष्ठ नेते आणि ‘पीएमपीएमएल’चे (PMPML) माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. निवडणुकीला अवघा एक आठवडा उरला असताना झालेल्या या बदलामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

प्रतिकूल परिस्थितीत निष्ठेची जोड: मुरलीधर मोहोळ
“सुधीर काळे यांनी पक्षात यावे, अशी आमची इच्छा जुनीच होती. निवडणुका जवळ असताना कोणतीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता ते भाजपमध्ये आले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्याचा पश्चाताप त्यांना कधीही वाटणार नाही, त्यांचा योग्य सन्मान राखण्याची जबाबदारी आमची आहे. त्यांच्या अनुभवामुळे भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे,” असे सुधीर काळे यांचे स्वागत करताना मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुण्यात पुन्हा भाजपचा झेंडा फडकेल: धीरज घाटे
“विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अनुभवी नेते भाजपशी जोडले जात आहेत. सुधीरभाऊ आणि मी एकेकाळी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढलो होतो, पण आमची मैत्री कायम होती. मूळचे संघाचे स्वयंसेवक राहिलेले सुधीरभाऊ आता पुन्हा आपल्या कुटुंबात परतले आहेत. प्रभाग क्रमांक २७ सह संपूर्ण शहरात भाजपचा विजय निश्चित असून पुण्यात पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकेल,” असा विश्वास शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला.

‘मोदी-फडणवीसांच्या कामाने प्रेरित होऊन प्रवेश’: सुधीर काळे
यावेळी सुधीर काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी आजपासून भाजपचा एक निष्ठावान घटक झालो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोककल्याणकारी कामाने प्रेरित होऊन मी हा निर्णय घेतला आहे. ज्या निष्ठेने मी आतापर्यंत काम केले, त्याच प्रामाणिकपणे यापुढे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि शहराच्या विकासासाठी झटणार आहे.”

या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, राजेश येनपुरे यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख