Thursday, November 26, 2026

घटनेचे कवच आणि ‘दिमागी नक्षलवादा’चे आव्हान

Share

दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने आपली राज्यघटना स्वीकारली. या ऐतिहासिक घटनेला आज ७७ वर्षे पूर्ण होत असताना, देशभरात ‘घटना दिन’ मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला विशेष लेख केवळ औपचारिक शुभेच्छा देणारा नाही. तो भारतीय लोकशाहीसमोरील गंभीर आणि छुप्या संकटावर नेमके बोट ठेवतो. गेली अनेक दशके एका विशिष्ट राजकीय परिसंस्थेने घटनेच्या रक्षणाचा मक्ता स्वतःकडे घेतल्याचा आव आणला. प्रत्यक्षा सत्तेच्या स्वार्थासाठी त्याच मंडळींनी घटनेच्या मूळ आत्म्याला नख लावले. आज देशातील जंगलांमधून बंदुकीच्या नळीवर चालणारा हिंसक नक्षलवाद अखेरच्या घटका मोजत आहे. नेमक्या याच वेळी, शहरांमधील वातानुकूलित खोल्यांतून आणि वैचारिक व्यासपीठांवरून कार्यरत असलेला ‘दिमागी नक्षलवाद’ हे आपल्या लोकशाहीसमोरील सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. या वैचारिक विखाराचा बुरखा फाडण्याची आणि घटनेचे खरे सामर्थ्य समजून घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

घटनादुरुस्त्यांचा इतिहास

भारताची राज्यघटना ही केवळ कायद्यांची जंत्री नाही. ती या देशाच्या समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक शहाणपणातून साकारलेला एक जिवंत सामाजिक दस्तऐवज आहे. प्रसिद्ध घटनातज्ज्ञ ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी तिचे वर्णन “सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे एक सामाजिक दस्तऐवज” असे केले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या सदस्यांनी दूरदृष्टीने तिची रचना केली. मात्र, ज्यांच्या हाती स्वातंत्र्यानंतर पाच दशके या देशाची सत्ता होती, त्यांनीच घटनेचे अवमूल्यन करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.

यंदा १९५१ मधील पहिल्या घटनादुरुस्तीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. जनतेतून निवडून न आलेल्या एका हंगामी सरकारने तेव्हा बहुमताचा गैरवापर केला. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघ्या काही महिने आधी नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली गेली. निवडणुकांवर प्रभाव टाकणे आणि विरोधाचा आवाज दडपणे हाच त्यामागील खरा हेतू होता. आणीबाणीच्या काळ्याकुट्ट कालखंडात करण्यात आलेल्या ३८ व्या आणि ३९ व्या घटनादुरुस्त्यांनाही यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दुरुस्त्यांद्वारे न्यायपालिकेचे पुनर्विलोकनाचे अधिकार संकुचित केले गेले. घटनात्मक संस्थांचा समतोल पूर्णपणे बिघडवून टाकला गेला.

निवडून आलेली राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी कलम ३५६ चा झालेला अमानुष गैरवापर सर्वश्रुत आहे. एका पक्षाच्या नावावर हे कलम जवळपास शंभरवेळा वापरण्याचा संशयास्पद विक्रम आहे. एका माजी पंतप्रधानांनी तर यात अर्धशतक ठोकले होते. इतकेच नव्हे, तर कलम ३७० आणि ३५-अ च्या आडून जम्मू आणि काश्मीरमधील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांना तब्बल सात दशके मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले गेले. २०१९ मध्ये ही ऐतिहासिक चूक दुरुस्त झाली. संपूर्ण देशात एकाच घटनेचे राज्य प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने घटनाकारांचे स्वप्न साकार झाले.

बंदुकीकडून वैचारिक विखाराकडे

अनेक दशके भारताच्या आदिवासी आणि दुर्गम भागांत नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर लोकशाही व्यवस्था वेठीस धरली. रस्ते, शाळा, रुग्णालये आणि मतदानाचा हक्क यांपासून सर्वांत गरीब नागरिकांना दूर ठेवले गेले. बंदुकीच्या धाकावर त्यांनी थेट घटनेलाच आव्हान दिले होते. गेल्या काही वर्षांतील कठोर सुरक्षा धोरणे आणि विकासकामांमुळे या सशस्त्र नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे. तो आता उच्चाटनाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. दुर्गम भागातील सामान्य माणूस आज कोणत्याही भीतीशिवाय आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत आहे. ही देशासाठी दिलासादायक बाब आहे.

परंतु, जंगलातील बंदुका शांत होत असतानाच या प्रवृत्तीने आपले कार्यक्षेत्र बदलले आहे. आपल्या काळातील वास्तवापासून पूर्णपणे तुटलेले ‘दिमागी नक्षलवादी’ आज अधिक सक्रिय झाले आहेत. देशाच्या विकासाचा वेग रोखणे हाच यांचा एककलमी कार्यक्रम आहे. समाजात फूट पाडणे, घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आणि प्रत्येक लोकोपयोगी निर्णयाला विरोध करणे, हेच यांचे ध्येय बनले आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणांबद्दल संशयाचे वातावरण तयार केले जात आहे. घटनेच्या नावाखाली घटनेनेच निर्माण केलेल्या व्यवस्थेला खिळखिळे करण्याचा हा डाव सुनियोजित आहे. सामान्य जनतेला प्रगतीच्या प्रवाहापासून रोखून अराजक माजवण्याची ही मानसिकता बंदुकीच्या गोळीपेक्षाही अधिक घातक ठरत आहे.

‘विरोधी पक्ष’ की ‘अवरोध पक्ष’?

घटनात्मक लोकशाहीत विरोधी पक्षाला महत्त्वाचे आणि जबाबदारीचे स्थान असते. सरकारच्या धोरणांवर रचनात्मक टीका करणे आणि जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणे हे त्यांचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने, आज देशातील प्रमुख विरोधी पक्ष ‘विरोधी पक्ष’ राहण्याऐवजी ‘अवरोध पक्ष’ बनल्याचे दिसत आहे. संसदेचे कामकाज ठप्प पाडणे आणि चर्चेतून पळ काढणे हीच यांची कार्यपद्धती झाली आहे. लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणणे हा घटनात्मक जबाबदारी पार पाडण्याचा पर्याय असू शकत नाही. या वर्षाच्या सुरुवातीला विधिमंडळांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व देणारे विधेयक एका विरोधी पक्षाने मंजूर होऊ दिले नाही. यातून त्यांचा घटनात्मक मूल्यांप्रती असलेला अनादर पुन्हा एकदा उघड झाला.

त्याहूनही धक्कादायक प्रकार म्हणजे, इतर मागासवर्गीयांचे (OBC) घटनात्मक आरक्षण कमी करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. हे आरक्षण काढून ते धर्माच्या आधारावर मुस्लिमांना देण्याचा घाट प्रमुख विरोधी पक्षाकडून घातला जात आहे. धर्मावर आधारित आरक्षणामुळे देशाच्या एकात्मतेला तडा जाईल, अशी स्पष्ट भूमिका घटनाकारांनी घेतली होती. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याला कडाडून विरोध केला होता. केवळ सत्तेच्या राजकारणासाठी सामाजिक न्यायाच्या तत्त्वांची अशी मोडतोड करणे हा घटनेचा थेट अपमान आहे. भारताची ‘नारी शक्ती’ आणि वंचित समाज यांना न्याय मिळवून देण्याच्या मार्गात असे कितीही अडथळे आणले गेले, तरी ते यशस्वी होणार नाहीत.

कर्तव्याचा जागर

स्वातंत्र्यानंतरची अनेक दशके देशातील राजकीय चर्चा केवळ ‘हक्कां’भोवतीच फिरत राहिली. या गदारोळात ‘कर्तव्यां’चा जाणीवपूर्वक विसर पाडला गेला. भारतीय संस्कृतीने नेहमीच प्रत्येक अधिकारासोबत येणाऱ्या जबाबदारीला सर्वोच्च महत्त्व दिले आहे. गेल्या दशकात ‘स्वच्छ भारत’ अभियानापासून ते जलसंधारण आणि पर्यावरण रक्षणापर्यंत अनेक जनआंदोलनांच्या माध्यमातून या कर्तव्यभावनेचा नवा जागर झाला आहे. या लोकसहभागामुळेच घटनेचा गजर आता केवळ संसद आणि न्यायालयांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सामान्य माणसाच्या जगण्याचा भाग बनला आहे.

दुसरीकडे, ‘पंतप्रधान आवास’, ‘उज्ज्वला’, ‘आयुष्मान भारत’, ‘मुद्रा’ आणि ‘यूपीआय’सारख्या डिजिटल क्रांतीमुळे मोठे सामाजिक परिवर्तन घडले आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार सुमारे ५० कोटी भारतीय गरिबीच्या खाईतून बाहेर पडले आहेत. सन १९५० मध्ये राज्यघटना लागू होऊनही देश १८६० च्या दशकातील ब्रिटिशकालीन दंडसंहितेनुसार चालत होता. ‘भारतीय न्यायसंहिते’च्या माध्यमातून वसाहतवादी काळातील ‘दंडा’च्या मानसिकतेतून बाहेर पडून नागरिक-केंद्रित ‘न्याया’चे नवे पर्व सुरू झाले आहे. तसेच, आठव्या अनुसूचीतील सर्व २२ भाषांमध्ये राज्यघटना उपलब्ध करून देऊन तिला खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचवले गेले आहे.

‘इंडिया फर्स्ट’ हाच खरा घटनाधर्म

आज भारत निर्णायक वळणावर उभा आहे. सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचा संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत. या प्रवासात आपली लढाई केवळ बाह्य शत्रूंशी नसून ती देशाच्या प्रगतीत खोडा घालणाऱ्या ‘दिमागी नक्षलवादा’शी आहे. घटनेचा खरा सन्मान ती केवळ खिशात मिरवण्यात नसून, तिच्यातील मूल्यांनुसार आचरण करण्यात आहे. आपल्या विचारांमध्ये ‘इंडिया फर्स्ट’ अर्थात राष्ट्र प्रथम ही भावना आणि कृतीमध्ये कर्तव्यनिष्ठा, ही दोनच तत्त्वे आपल्या सामर्थ्याचे खरे स्रोत आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे आणि घटनेचे कवच अधिक बळकट करूनच आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित, समर्थ आणि वैभवशाली भारत घडवू शकतो!

अन्य लेख

संबंधित लेख