Saturday, November 21, 2026

भारताविना विश्वकल्याण कसले?

Share

जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या एका विचित्र त्रिकोणाची चर्चा सुरू आहे. अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन देश एकत्र बसून जगाचे भविष्य ठरवू पाहत आहेत, जगातील संघर्षावर तोडगा काढण्याच्या गप्पा मारत आहेत. पण जरा डोळे उघडून पाहिले तर एक साधे, पण कटू सत्य समोर येते; ते म्हणजे आज जगात जेवढा म्हणून रक्तपात सुरू आहे, जेवढी म्हणून अशांतता माजली आहे, त्या सगळ्याला हीच तीन राष्ट्रे थेट किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत. घराला आग लावणाऱ्यांनीच ती विझवण्यासाठी बैठक बोलवावी, तसा हा सगळा प्रकार आहे. या तिघांच्या यामुळेच चर्चेला काडीचीही किंमत नाही. कारण या रचनेत जोपर्यंत सशक्त आणि खरीखुरी विश्वशांतीची तळमळ असणारा चौथा कोन मिळत नाही, तोपर्यंत जगाच्या कल्याणाची भाषा ही केवळ पोकळ बडबड ठरणार आहे. आणि हा चौथा कोन दुसरा तिसरा कोणी नसून भारत आहे. भारताला बाजूला ठेवून विश्वकल्याणाची चिंता वाहणे म्हणजे आत्मा गहाण ठेवून निष्प्राण देहाला संजीवनी देण्याचे प्रयत्न!

संघर्षाचे सौदागर

अमेरिका, रशिया आणि चीन या तिघांचा इतिहास आणि वर्तमान तपासले, तर त्यांच्या हातावरून निष्पापांचे रक्त सतत निथळते आहे. अमेरिकेने लोकशाहीच्या नावाखाली जगभरात लष्करी हस्तक्षेप केले, अनेक देश बेचिराख केले आणि स्वतःच्या शस्त्रास्त्र उद्योगाची पोळी भाजून घेतली. जिथे शांतता होती तिथे अस्थिरता पेरायची आणि मग शांततेचा दूत बनून मिरवायचे, हे अमेरिकेचे जुनेच धोरण आहे. दुसरीकडे रशियाचेही काही वेगळे नाही. शीतयुद्धाच्या काळापासून ते आजच्या युक्रेन संघर्षापर्यंत, विस्तारवादाची भूक आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या हव्यासापोटी रशियाने युरोपसह जगाला वेठीस धरले आहे.

तिसरा कोन असलेला चीन तर या सगळ्यांच्या पुढे गेला आहे. कर्जाच्या सापळ्यात लहान देशांना अडकवायचे, त्यांच्या जमिनी बळकवायच्या, शेजारी राष्ट्रांशी सतत सीमावाद उकरून काढायचे आणि व्यापारयुद्धाच्या नावाखाली जागतिक पुरवठा साखळीचा गळा घोटायचा, ही चीनची कार्यपद्धती आहे. स्वतःच्या देशात हुकूमशाहीचा वरवंटा फिरवणाऱ्या या देशाच्या तोंडी जागतिक शांततेची भाषा मुळी शोभतच नाही. या तिघांचीही एकच सुप्त स्पर्धा आहे—जगावर कोणाची सत्ता चालणार? त्यांच्या या सत्तेच्या साठमारीत जगभरातला सामान्य, वंचित, गरीब माणूस भरडला जातो आहे. जे स्वतःच रोज उठून आगीत तेल ओतत आहेत, त्यांच्याकडून शांततेची अपेक्षा करणे हा निव्वळ मूर्खपणा ठरेल.

विश्वसत्तेची हाव नसलेला देश

या तिन्ही महासत्तांच्या पार्श्वभूमीवर भारताचे वेगळेपण ठळकपणे उठून दिसते. भारताला जगावर राज्य करण्याची कधीही महत्त्वाकांक्षा नव्हती आणि आजही नाही. याला भारताचा हजारो वर्षांचा इतिहास साक्ष आहे. भारताने कधीही कोणावर आक्रमण केले नाही. कोणाची जमीन हडपली नाही. कोणाची संस्कृती नष्ट केली नाही. उलट, संकटात सापडलेल्यांना उदार मनाने आश्रय देणे आणि चिरंतन ज्ञानाचा जगभर पसरवणे, हीच भारताची कायम ओळख राहिली आहे.

आजही भारत जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलतो, तेव्हा त्यात कोणावर तरी वर्चस्व गाजवण्याचा आव नसतो. जगाच्या हिताची कळकळ असते. कोरोनासारख्या महाभयंकर संकटात जेव्हा या मोठ्या देशांनी स्वतःची दारे बंद करून घेतली आणि लसींचा साठा करून ठेवला, तेव्हा भारताने ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेतून शंभरहून अधिक देशांना औषधे आणि लसी पुरवल्या. आपल्या घरातला घास दुसऱ्याला देण्याची ही वृत्ती अमेरिका, रशिया किंवा चीनच्या रक्तातच नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट हा एक व्यवहार आहे, तर भारतासाठी तो एक धर्म आणि कर्तव्य आहे.

आर्थिक महासत्तेचा उदय

जगाच्या राजकारणात केवळ चांगुलपणा असून चालत नाही, तर त्या चांगुलपणाला ताकदीची जोड असावी लागते. आजवर या तीन देशांनी भारताला गृहीत धरले, कारण भारताची अर्थव्यवस्था विकसनशील अवस्थेत होती. आता काळ बदलला आहे. भारताची आर्थिक ताकद वेगाने वाढते आहे. आज भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच तो तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल.

जसजशी ही आर्थिक ताकद वाढत जाईल, तसतसे जागतिक राजकारणाचे चित्र झपाट्याने बदलेल. आज जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ भारतात आहे. जगातील सर्वांत मोठी तरुण लोकसंख्या भारतात आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत वेगाने मुसंडी मारतो आहे. त्यामुळे भारताला डावलून कोणताही मोठा आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेणे या महासत्तांना परवडणारे नाही. एक दिवस जगातल्या  कोणत्याही मोठ्या समस्येवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली जाईल, तेव्हा भारताच्या सहभागाशिवाय ती होऊ शकणार नाही. सामर्थ्य असूनही त्याचा वापर कोणावर अन्याय करण्यासाठी न करता जगाच्या कल्याणासाठी करणारा देश म्हणून भारताचे स्थान अढळ आहे. तेच उद्या विश्वकल्याणाचे महाद्वार ठरणार आहे.

सांस्कृतिक एकात्मतेचा नवा मंत्र

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांस्कृतिक एकात्मतेची जी भाषा केली, ती सध्याच्या अस्थिर आणि तुकड्यांमध्ये विभागलेल्या जगाला नवी दिशा दाखवणारी आहे. आज जगातील बहुतेक संघर्ष हे ‘मी आणि माझे’ या संकुचित वृत्तीतून आणि एकमेकांच्या संस्कृतीला कमी लेखण्याच्या मानसिकतेतून जन्माला आले आहेत. पाश्चात्त्य देशांनी स्वतःची जीवनपद्धती जगावर लादली, तर साम्यवादी देशांनी संस्कृतीच नष्ट करण्याचा विडा उचलला. यातून जगात एक प्रकारची भयंकर पोकळी आणि अविश्वास निर्माण झाला.

या पार्श्वभूमीवर मोदींनी मांडलेला सांस्कृतिक एकात्मतेचा विचार अमूल्य ठरतो. विविधता असूनही आपण सगळे एकाच धाग्याने जोडलेले आहोत, ही भावना जेव्हा जागतिक राजकारणाचा पाया बनेल, तेव्हाच खरी शांतता नांदेल. भारत हा विविधतेत एकता जपणारा देश आहे. त्यामुळे ही सांस्कृतिक एकात्मतेची भाषा केवळ भारताच्या तोंडीच शोभते आणि तीच जगाला या संकटातून बाहेर काढू शकते. शस्त्रांच्या जोरावर शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यासाठी मनामनांत संवाद आणि सांस्कृतिक स्नेहबंध असावा लागतो. भारत हा संदेश घेऊन उभा आहे. महासत्तांना तो दिसत नसला तरी आज ना उद्या जगाला दिसणारच आहे.

विश्वकल्याणाचा खरा मार्ग

शेवटी प्रश्न इतकाच उरतो की जगाला नेमके काय हवे आहे? सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापायी जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे हे तीन देश हवे आहेत, की शांतता, सहअस्तित्व आणि कल्याणाचा मार्ग दाखवणारा भारत हवा आहे? अमेरिका, रशिया आणि चीनने कितीही बैठका घेतल्या आणि कितीही मोठे करार केले, तरी त्यांच्या मनातली वर्चस्वाची भूक त्यांना शांत बसू देत नाही.

जगाचे खरे चिरकल्याण करायचे असेल, तर या तिघांनाही आपला अहंकार बाजूला ठेवून भारताच्या सोबतीने चालावेच लागेल. शक्तिमान, तरीही संयमी आणि विश्वकल्याण चिंतणारा भारतच या जगाला स्थैर्य देऊ शकतो. भारताविना विश्वकल्याणाची स्वप्ने पाहणे हे मृगजळामागे धावणे. आज नाही तर उद्या, या महासत्तांना हे सत्य उमगेल. जगाचे भविष्य या तीन महासत्तांच्या विस्तारवाद आणि वर्चस्ववादातून  नाही, तर भारताच्या विश्वकल्याणाच्या आग्रहातूनच घडणार आहे. याचे नीट आकलन होईपर्यंत असल्या तोंडदेखल्या, मानभावी आणि अविश्वास लपवून मैत्रीचे सोंग घेणाऱ्या शिखर परिषदांना काहीही अर्थ नाही.

अन्य लेख

संबंधित लेख