मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली.
राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला. शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.
सन 2016 मध्ये राधाकृष्णन यांची कॉयर बोर्ड, कोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी चार वर्षे सांभाळले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील कॉयरची निर्यात 2532 कोटी रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.
दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व 24 जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल पदाचा देखील काही काळ अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
उत्तम क्रीडापटू असलेले राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे.
- मंत्री नितेश राणे यांनी केली ट्रॉम्बे जेट्टीची पाहणी
- भाजपकडून पक्षसंघटना आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यभर १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री नियुक्त!
- राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी विकास आराखडा महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ‘MAITRI 2.0’ पोर्टलचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण! व्यापारी आणि गुंतवणूकदारांना अधिक सोपी व जलद सेवा मिळणार!
- राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी सुनेत्रा पवार! पहिल्याच टर्ममध्ये मोठी जबाबदारी