Saturday, September 13, 2025

देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे

Share

देणगीदार आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये विश्वासार्ह दुवा ठरलेला देणे समाजाचे हा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. देणे समाजाचे हे प्रदर्शन रविववारपर्यंत (१४ सप्टेंबर) निवारा सभागृह, नवी पेठ येथे सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत खुले आहे. अनेकांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते पण कुठली संस्था योग्य आहे, हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ह्या प्रदर्शनात मिळते.


दान करण्यासाठी उत्तम संधी देणारा पितृ पंधरवडा सुरु झाला आहे. या काळात अनेकांना विविध कारणांसाठी दान करायचे असते, पण चांगल्या सेवाभावी संस्था आणि त्यांचे कार्य माहिती नसते. दान करणाऱ्यांना अनेक सेवाभावी संस्थांची एकाच छताखाली माहिती करून देणारा एक अनोखा उपक्रम म्हणजे देणे समाजाचे हे प्रदर्शन. आर्टिस्ट्री संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या या उपक्रमाची २१ वर्ष पूर्ण झाली असून यंदा या उपक्रमाचे बावीसाव्या वर्षात पदार्पण झाले आहे.

देणे समाजाचे या उपक्रमाचे कार्यकर्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समवेत.

उपक्रमाचे सातत्य
एकाच छताखाली म्हणजे एकाच ठिकाणी येऊन विविध सामाजिक संस्थांचे काम समजून घेण्याची संधी देणाऱ्या देणे समाजाचे या उपक्रमाची संकल्पना दिलीप आणि वीणा गोखले यांची. विविध सामाजिक संस्थांची माहिती घेण्याची सुरुवात त्यांच्या स्वतःच्या गरजेतून झाली खरी, पण त्यातूनच विविध सामाजिक संस्था आपापल्या ठिकाणी, आपापल्या पद्धतीने खूप चांगले कार्य करीत असतात हे त्यांच्या लक्षात आले.

या सगळ्याच संस्थांची समाजात व्यापक प्रमाणात पोहचण्याची क्षमता असते असे नाही. काही वेळा काही ना काही कारणांमुळे चांगली कामे, चांगल्या संस्था बंदही पडतात. अशा संस्थांसाठी केवळ बुडत्याला काडीचा आधार असे न करता मदतीची भक्क्म साथ समाजाकडून मिळावी, या हेतूने देणे समाजाचे या प्रदर्शनाच्या आयोजनाला प्रारंभ झाला. या कार्यात आट्रिस्ट्रीच्या वीणा गोखले यांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात करत आणि खंड न पडता सातत्याने त्यांनी या प्रदर्शनाचे आयोजन सुुरुच ठेवले.


पुण्यात सुरू झालेले हे प्रदर्शन म्हणजे ज्यांना सामाजिक कार्यासाठी काही साहाय्य करायचे आहे अशा दानशूरांसाठी पर्वणी आहे. या प्रदर्शनाची व्याप्ती पुण्याबाहेरही पोहचली आहे. पुण्यात सातत्याने केल्या जाणाऱ्या या प्रदर्शनाच्या आयोजनानंतर वर्षातून एकदा अशाप्रकारचे हे प्रदर्शन मुंबईतही दोन ठिकाणी आयोजित करण्यात येते.


आनंद आणि देण्याचे समाधान
म्हणायला हे प्रदर्शन असले तरी या प्रदर्शनात आपण कोणतीही वस्तू खरेदी करून ती घेऊन जात नाही, तर आपल्याबरोबर नेतो आनंद आणि देण्याचे समाधान. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या संस्थांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही, हे जसे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य तसेच या प्रत्येक संस्थेच्या कामाबद्दलची खात्री करून घेतल्यानंतरच या प्रदर्शनात संस्थांना सहभागाची संधी दिली जाते, हेही वैशिष्ट्य. त्यासाठी वीणा गोखले वर्षभर दौरे करतात आणि या दौऱ्यांमध्ये सामाजिक संस्थांचा अभ्यास करतात.


देणे समाजाचे हे एक असे व्यासपीठ आहे की जेथे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला करून दिली जाते. त्यांना आर्थिक तसेच इतर मदत मिळवून देणे आणि त्याच बरोबरीने समाजालाही त्यांचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून देणे, असा ह्या उपक्रमाचा उद्देश. २००५ ते २०२४  ह्या कालावधीत २८५ सामाजिक संस्था ह्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि सुमारे अठरा कोटीपेक्षा जास्त निधीची भरीव मदत सेवाभावी संस्थांना या उपक्रमातून मिळवून दिली गेली.  

वैविध्यपूर्ण सामाजिक कार्य
बीड, बुलडाणा, जळगाव, अकोला, मेळघाट ,पुणे, जालना,सातारा, कोल्हापूर, अमरावती, इंदापूर  अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असणाऱ्या संस्था यावर्षी प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. अनेकविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ह्या समाजसेवी संस्थांचे कार्य मुळातूनच समजून घेण्यासारखे आहे. कुणी शैक्षणिक क्षेत्रात, कुणी वंचित घटकातील मुलांच्या संगोपनात, कुणी पशु पक्ष्यांची सेवा करण्यात, कुणी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात, महिला सबलीकरणात, कुणी फासेपारधी मुलांच्या शिक्षण आणि पालन पोषणात, कुणी ग्राम विकसनात, तर कुणी शेती विषयक प्रकल्पात कार्य करत आहेत. अशा वेगवेळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या, प्रामुख्याने ग्रामीण आणि निमशहरी भागातील २४ सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्यात आले आहे.


समाजात उत्तम काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी एकाच वेळी संवाद साधण्याची ही एक उत्तम संधी असते. अनेकांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते पण कुठली संस्था योग्य आहे, हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ह्या प्रदर्शनात मिळते.


या प्रदर्शनातील विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून एखादी सामाजिक संस्था कशा पद्धतीने काम करत आहे हे जाणून घेण्याची ही एक अनोखी संधी असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते कसे काम करत असतात, विविध प्रकारच्या समस्यांमधून कसे मार्ग काढत असतात हे पाहताना आपण कीती सुखी आहेत, हे अगदी नकळतच आपल्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. लहानपणची एक गोष्ट आठवते, माझे वडील कायम सांगायचे की दुसऱ्याच्या पायात चप्पल  नाही हे पाहिले की आपल्या पायात ती आहे, यासारखे समाधान महत्त्वाचे आहे. हे प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्यांनी देणगी दिलीच पाहिजे अशी सक्ती नसते. आपल्याकडील कौशल्य सामाजिक कामासाठी देऊन किंवा आपल्या मौलिक वेळातील काही भाग संस्थांच्या कामासाठी देऊनही आपण समाजाचे ऋण फेडण्यासाठी एक पाऊल टाकू शकतो.

– जान्हवी ओक
(लेखिका आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख