Wednesday, January 7, 2026

अमरावती : “आश्वासनं नाही, काम बोलतं!” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन

Share

अमरावती : “आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही, तर केलेल्या कामांच्या जोरावर मते मागत आहोत. अमरावतीचा सर्वांगीण विकास हेच आमचे व्हिजन आहे. येत्या १५ तारखेला अमरावतीकरांनी भाजपाची जबाबदारी स्वीकारावी, पुढची ५ वर्षे शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आमची असेल,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांना साद घातली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित भव्य ‘रोड शो’मध्ये उसळलेल्या जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते.

अमरावतीच्या विकासाचा ‘रिपोर्ट कार्ड’
गेल्या कार्यकाळात भाजपाने केलेल्या कामांचा पाढा वाचताना मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या कायापालटाचा उल्लेख केला:

रस्ते विकासासाठी मंजूर केलेला ₹२१२ कोटींचा निधी आणि शहराचे झालेले सुशोभीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अमृत योजनेतून कोट्यवधींच्या निधीद्वारे शहराचा पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था सुधारली, अमरावतीमध्ये विमान प्रशिक्षण संस्था सुरू होत असून तिचे काम अंतिम टप्प्यात आहे, बडनेरा सांस्कृतिक भवन आणि ₹२०० कोटींच्या अंबादेवी प्रकल्पाला राज्य सरकारने दिलेली मान्यता ही अमरावतीची अस्मिता जपण्याचा प्रयत्न आहे.

“रोजगारक्षम अमरावती हेच आमचे लक्ष्य”
अमरावतीला केवळ आधुनिकच नाही, तर ‘रोजगारक्षम’ आणि विकसित शहर बनवण्याचा संकल्प फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवला. बससेवा आणि नागरी सुविधांच्या माध्यमातून सर्वसामान्य अमरावतीकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिग्गजांची मांदियाळी
या रोड शोमध्ये खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार डॉ. संजय कुटे यांसह भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोड शोच्या मार्गावर अमरावतीकरांनी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले, ज्यामुळे शहरात ‘कमळ’ पुन्हा फुलणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख