कल्याण: “कल्याण-डोंबिवलीला केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाच नाही, तर आता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची जोड मिळणार आहे. मुंबईच्या धर्तीवर येथे ‘बीकेसी’सारखे व्यावसायिक केंद्र उभारणार असून, बुलेट ट्रेन आणि आयटी क्षेत्रातून हजारो रोजगारांच्या संधी निर्माण केल्या जातील,” अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार श्रीकांत भारतीय, किसन कथोरे, सुलभा गायकवाड, राजेश मोरे यांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
“महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाने पावन झालेल्या नगरीत येऊन कृतार्थ वाटत आहे. कल्याण-डोंबिवली शहरांना स्वतःची एक संस्कृती आणि इतिहास आहे. या शहरांना सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसेच गेल्या 10 वर्षांमध्ये या शहरांचा अफाट असा विकास झाला आहे. यासोबतच ‘एमएमआरडीए’ च्या माध्यमातून या भागात भूयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजना व मेट्रो प्रकल्पासाठी कोट्यवधी निधी देण्यात आला,” असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
विना भाडेवाढ एसी लोकल आणि ई-बसचे जाळे
मुंबई व एमएमआर क्षेत्रातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी देताना फडणवीस म्हणाले:
लोकल रेल्वे: मुंबईची लाईफलाईन असलेल्या सर्व लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने एसी (AC) केल्या जातील आणि विशेष म्हणजे यासाठी प्रवाशांवर कोणतीही भाडेवाढ लादली जाणार नाही.
प्रदूषणमुक्त प्रवास: लोकल ट्रेनच्या जोडीला मोठ्या प्रमाणावर ‘ई-बस’ सेवा सुरू करून एमएमआर क्षेत्र प्रदूषणमुक्त आणि सुखकर बनवण्यावर भर दिला जाईल.
व्यावसायिक केंद्र आणि आयटी हब
कल्याण-डोंबिवलीच्या आर्थिक विकासासाठी फडणवीसांनी महत्त्वपूर्ण रोडमॅप मांडला:
१. कल्याण बीकेसी: शहरात वांद्रे-कुर्ला संकुलासारखे (BKC) अद्ययावत व्यावसायिक केंद्र उभारून कॉर्पोरेट क्षेत्राला आकर्षित करणार.
२. डेटा सेंटर आणि आयटी: पलावा भागात ॲमेझॉनचे मोठे डेटा सेंटर उभे राहत असून, यामुळे आयटी (IT) आणि एआय (AI) क्षेत्रात तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळतील.
३. बुलेट ट्रेन: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मोठा फायदा या भागाला होणार असून हजारो नवीन रोजगार उपलब्ध होतील.
पायाभूत सुविधांसाठी निधीचा पाऊस
गेल्या १० वर्षात एमएमआरडीएच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीत भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा आणि मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. “१५ तारखेला तुम्ही महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, पुढची ५ वर्षे आम्ही तुमचा विकास करू,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.