Wednesday, January 7, 2026

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’

Share

परभणी: “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही केवळ १५ तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, पुढील ५ वर्षे परभणीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची असेल,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीकरांना साद घातली. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. परभणीला प्रदूषणमुक्त आणि दुर्गंधीमुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कोट्यवधींचा निधी दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

शहराच्या मूलभूत सुविधांवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा आणि भुयारी गटार योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामुळे परभणीकरांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासोबतच शहर स्वच्छ होण्यास मदत होईल. वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी १४ कोटींचा ‘पीएम ई-बस’ प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, लवकरच ४० ई-बसेस परभणीच्या रस्त्यावर धावतील. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पुढील ५ वर्षांत झोपडपट्टीवासी आणि गरिबांना जमिनीचा मालकी हक्क देऊन पक्की घरे बांधून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रोजगार आणि औद्योगिक प्रशिक्षणाबाबत माहिती देताना त्यांनी मेघना बोर्डीकर यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक केले. CIIIT परभणी आणि टाटा ट्रस्ट यांच्यातील करारामुळे शहरात ‘इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर’ सुरू झाले असून, यातून ३००० स्थानिक तरुणांना जागतिक दर्जाचे ट्रेनिंग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. परभणीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपला संधी देण्याचे आवाहन करत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.

अन्य लेख

संबंधित लेख