नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर कडक शब्दांत भाष्य केले. ते म्हणाले, “मार्कर पेनचा वापर करण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेतो, यात नवीन काहीच नाही. जे लोक यावर आक्षेप घेत आहेत, ते उद्याच्या संभाव्य पराभवाची तयारी आजपासूनच करत आहेत. निकालाचा अंदाज आल्यानेच पराभवाचे खापर कशावर फोडायचे, याचे कारण आतापासून शोधले जात आहे.”
यावेळी त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. “मतदान करणे हे केवळ आपला अधिकार नसून ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान न करणे हा लोकशाहीचा अपमान आहे,” असे ते म्हणाले. दरम्यान, उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “निवडून येण्याची खात्री नसल्याने ठोकशाहीचा अवलंब करणे हे अत्यंत दुर्दैवी असून अशा भ्याड हल्ल्यांनी लोकशाही दबावात येणार नाही,” असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.