मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेची ही जागा आता बिनविरोध निवडून येण्याचे निश्चित झाले आहे.
कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे?
डॉ. ज्योती वाघमारे या आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या एक अभ्यासू आणि आक्रमक वक्त्या आहेत. गेल्या काही काळापासून त्या शिवसेनेच्या (शिंदे गट) राज्य प्रवक्त्या म्हणून प्रभावीपणे काम करत आहेत. त्यांची वैचारिक मांडणी आणि दलित समाजातील पकड लक्षात घेऊन, उपमुख्यमंत्री शिंदेंनी हा मोठा डाव खेळल्याचे मानले जात आहे.
ज्येष्ठ नेत्यांना डावलले; शिवसेनेत नाराजीचे सूर?
डॉ. ज्योती वाघमारे यांच्या अनपेक्षित उमेदवारीमुळे शिवसेनेतील (शिंदे गट) अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकीय आशांवर पाणी फेरले गेले आहे. विशेषतः राहुल शेवाळे, आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर आणि शायना एनसी यांसारखी मोठी नावे राज्यसभेच्या शर्यतीत आघाडीवर होती. राहुल शेवाळे यांचे नाव तर जवळजवळ निश्चित मानले जात होते, मात्र ऐनवेळी त्यांना डच्चू मिळाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, या नेत्यांना बाजूला सारून एका प्रवक्त्याला थेट संसदेत पाठवण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि छुपी नाराजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये या निर्णयामुळे अस्वस्थता आहे.
निवडणूक बिनविरोध होणार!
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त असलेल्या जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डॉ. ज्योती वाघमारे यांचा संसदेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.