गोव्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुख्य म्हणजे या उत्सवाची परंपरा गोव्यातील गावा-गावांत, वाड्या- वाड्यांमध्ये आणि घराघरांत जोपासली जात आहे. गोव्यातील या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याची ही ओळख.
गणेशोत्सव म्हटला की मुंबई, पुण्यातील भव्य सार्वजनिक मंडप आणि मिरवणुका डोळ्यासमोर येतात. पण गोव्यातील गणेशोत्सव यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. येथे गणपती हा प्रत्येक घरात चतुर्थीच्या दिवशी, ज्याला स्थानिक भाषेत चवथ म्हणतात, विराजमान होतो. गोव्यात साधारणतः प्रत्येक हिंदू कुटुंब स्वतःच्या घरातच गणपतीची प्रतिष्ठापना करते. त्यामुळे हा उत्सव घरगुती, आत्मीयतेने भरलेला आणि परंपरेला घट्ट धरून ठेवणारा आहे. कोकणच्या निसर्गसंपत्तीचा, नातेसंबंधांचा आणि कुटुंबीयांच्या एकत्र येण्याचा हा सोहळा आहे.
घराघरांत साजरा होणारा उत्सव
महाराष्ट्रात जसे भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाचे वर्चस्व दिसते, तसे गोव्यात नाही. येथे सार्वजनिक गणेशोत्सव संकल्पना उशिरा सुरू झाली. येथे उत्सवाचे केंद्रबिंदू आहेत घरगुती गणपती. गावागावातील वाड्यांमध्ये, तसेच शहरी घरांत, गणपतीची मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली जाते. विशेष करून मातीचीच मूर्ती स्थानिक कारागीर तयार करतात. नदीकाठीची माती वापरून केलेली ही मूर्ती विसर्जनानंतर परत त्याच्या निसर्गात मिसळते. त्यामुळे यात पर्यावरणपूरकतेचा संदेश दडलेला आहे.
गोव्यातील गणेशोत्सव हा धार्मिक सोहळा असला तरी तो तितकाच कौटुंबिक एकत्रीकरणाचाही उत्सव आहे. बाहेरगावी राहणारे अनेक जण खास या दिवसांसाठी आपल्या मूळ गावी परततात. त्यामुळे गावोगावी घराघरांत नातेवाईकांची गर्दी होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण भक्तिभावात रमून जातात.
उत्सवाची पूर्वसंध्या
गणेश आगमनाच्या आदल्या दिवशीचा दिवस ‘तय’ म्हणून ओळखला जातो. ‘तृतीया’ ह्या शब्दाचा अपभ्रंश ‘तय’ असा झाला. हा दिवस देवी पार्वतीच्या पूजनाचा आहे. ह्या दिवशी छोट्या गौरीचं पूजन हरतालिकेच्या पूजनासोबत केले जाते. जंगलातून गोळा केलेली वनफुले व पाने मोठ्या कासाळच्या पानात गुंडाळून देवीचे प्रतीक मानले जाते. त्यासोबत नारळ ठेवून त्याला महादेवाचे स्वरूप दिले जाते. या विधीतून निसर्गपूजा आणि दैवपूजा यांचा सुंदर संगम दिसतो.

(छायाचित्र : आरती दास)
माटोळी : गोव्याची हिरवी छत्रछाया
गोव्यातील गणेशोत्सवातील सर्वात आकर्षक परंपरा म्हणजे माटोळी. गणपतीच्या मूर्तीच्या वर लाकडी चौकटीत फळे, भाज्या, बिया, मुळे, औषधी वनस्पती आणि रानफुले सजवली जातात. प्रत्येक वस्तूला आपला वेगळा अर्थ आणि उपयोग असतो. काही खाण्यायोग्य, काही औषधी, तर काही विषारी वनस्पतींचाही समावेश होतो.



(छायाचित्र : नरेंद्र सावईकरच्या फेसबुक पोस्ट वरून)
ग्रामीण भागात ही सामग्री बाजारातून विकत न आणता शेत-जंगलातून गोळा केली जाते. त्यामुळे ही एक प्रकारे मुलांना स्थानिक जैवविविधतेची शिकवण देणारी प्रक्रिया ठरते. मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं वनस्पती ओळखतात, त्यांचा उपयोग शिकतात. त्यामुळे माटोळी ही केवळ सजावट नसून गोव्याच्या निसर्गाचे जिवंत संग्रहालयच ठरते.
किनारी भागात नारळ-सुपारी, तर डोंगराळ भागात रानफळे, औषधी पाने व मुळे यांचा समावेश अधिक दिसतो. काही वेळा एका माटोळीत शंभरपेक्षा जास्त वस्तूंचा समावेश असतो, ज्यामुळे संपूर्ण घरच एक छोटेखानी जंगल बनते.
परंपरेचा नाद : घुमट आरती
माटोळी जशी गोव्याच्या हिरवाईचे प्रतीक आहे, तशीच घुमट आरती ही येथील लयबद्ध परंपरेचे हृदय आहे. दाक्षिणात्य वाद्य ‘घटम’ सारखे मातीच्या भांड्याच्या आकाराचे हे वाद्य, त्यावर घोरपडीच्या चामड्याची झिलई लावून बनवले जाते. गणेशोत्सवात दुपारी व रात्री होणाऱ्या आरतीवेळी ‘घुमट’, ‘शमेळ’ व ‘कासळे’ यांच्या तालावर भक्तिगीते आणि आरत्या गायल्या जातात.
आरती म्हणजे केवळ सादरीकरण नसून सामूहिक भक्तीचा अनुभव आहे. अनेक गावांत तरुण मंडळी आधीपासून सराव करून ठेवतात. मुलं-मुली सर्वजण गटागटाने एकत्र येऊन ‘घुमट’ वादनाच्या तालावर गाणी / आरत्या शिकतात. विशेष म्हणजे मोबाईलमध्ये रमणारी लहान पिढीही या दिवसांत घुमट हाती घेते. स्पर्धांच्या माध्यमातून ही कला जपली जाते.

घुमट आरतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील साधेपणा आणि आत्मीयता. हा शास्त्रीय संगीताचा भाग नसून लोकसंगीताचा आहे. पण त्यातला नाद अंगावर रोमांच आणतो. पारंपरिक आरत्या जेव्हा घुमटाच्या तालावर घुमतात, तेव्हा वातावरण भक्तीमय व आनंदी होते.
गोड परंपरा : घरगुती पदार्थ
गणेशोत्सव गोडधोडाशिवाय अपूर्ण आहे. गोव्यातील घरोघरी या दिवसांत खास पारंपरिक पदार्थ तयार होतात.
१. नेवऱ्या : खोबरे, गूळ आणि सुका मेवा भरून केलेल्या तळलेल्या करंज्या.
२. पातोळ्यो (पातोळ्या) : हळदीच्या पानात भाताचे पीठ पसरून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून वाफवलेला स्वादिष्ट पदार्थ. त्याचा सुगंध संपूर्ण घरात दरवळतो.
३. मोदक (उकडीचे आणि तळलेले) : गणपतीचे आवडते, तांदळाच्या पिठाच्या आवरणात खोबरे-गुळाचे सारण भरून वाफवलेले / तळलेले.
हे पदार्थ केवळ नैवेद्यापुरते मर्यादित नसून कुटुंबाच्या प्रेमाचे प्रतीक आहेत. पिढ्यान् पिढ्या ह्या पाककृती हस्तांतरित होत राहतात.

नवीन धान्याची पूजा
भारतातील इतर भागांपेक्षा केरळ, कर्नाटक, गोव्यात मान्सूनचे आगमन लवकर होते. त्यामुळे शेतीची कामे तुलनेने लवकर केली जातात आणि त्यामुळे धान्यही लवकर तयार होते. ऋषी पंचीमीच्या दिवशी ‘नव्याची’ पूजा केली जाते.

निसर्ग व नात्यांचा संगम
गोव्यातील गणेशोत्सवाचा मूळ आधार म्हणजे निसर्गाशी असलेले नाते. मातीच्या मूर्ती, हळदीची पाने, रानफळे, औषधी पानं या सर्वांमधून पर्यावरणाबद्दल आदर दिसतो. त्याचबरोबर हा एकत्र येण्याचा उत्सव आहे. नातेवाईक परत घरी येतात, शेजारी एकमेकांना आमंत्रित करतात, एकत्र आरत्या व गोडधोडाचा आस्वाद घेतात. साधेपणा आणि आत्मीयतेतून हा उत्सव रंगतो.
बदलते काळाचे आव्हान
आज मात्र आधुनिकतेने काही अडचणी निर्माण केल्या आहेत. तयार माटोळी सामान विकले जात असल्याने जंगलात जाऊन वस्तू गोळा करण्याची परंपरा कमी होत आहे. जंगलतोड व पावसाच्या बदलत्या पद्धतीमुळे पारंपरिक वनस्पती मिळवणे कठीण झाले आहे. घुमट तयार करण्यासाठी पूर्वी वापरली जाणारी सरडा-चामडी बंद झाल्यामुळे वाद्याचा पारंपरिक नाद हरवत चालला आहे. बकरीचे कातडे वा कृत्रिम झिलई वापरली जात असली तरी जुन्या ध्वनीची जादू कमी भासते.
तरीही गोव्याचा गणेशोत्सव आपली मुळं घट्ट पकडून उभा आहे. नव्या पिढीचा घुमटावरील ओढा, जैवविविधतेची वाढती जाणीव आणि घराघरांतला पारंपरिक सण यामुळे चावथ आजही वेगळा आणि अर्थपूर्ण ठरतो.
– राजेश कोरडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)