मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे म्हणजे अखेरीस या उत्सवाला राजमान्यता मिळणे आहे.
ब्रिटिश राजवटीची पकड घट्ट झाली होती. समाज हताश झाला होता. १८५७ च्या स्वातंत्र्य समराने इंग्रजांना धक्का दिला खरा, पण त्यामुळे त्यांची राजवट हटली नाही. फक्त कंपनी सरकार जाऊन त्या जागी राणीचे सरकार आले. समाजात भेद आणि मतभेद निर्माण करत फोडा आणि झोडा या रणनितीचा वापर करून ब्रिटिश राज्य करत होते. अशा परिस्थितीत समाजातील सर्वांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ साली पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. काही वर्षातच हा उत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला. लोकमान्यांनी सुरू केलेल्या या उत्सवाला अल्पावधीत समाजाची लोकमान्यता मिळाली.
सार्वजनिक गणेशोत्सवात वेगळे काय घडले?
सार्वजनिक गणेशोत्सवाला चालना देण्यामागे, त्या उत्सवामागे वैचारिक बळ उभे करण्यामागे आणि उत्सवाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यामागे लोकमान्य टिळकांचा निश्चित विचार होता. खरे तर गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा महाराष्ट्र राज्यात फार जुनी आहे. घरोघरी गणेश चतुर्थीला गणपती बसवायचे, मनोभावे पूजा करायची आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार अनंतचतुर्दशीला किंवा त्यापूर्वी गणेश विसर्जन करायची ही परंपरा चालत आलेली होती. सार्वजनिक गणेशोत्सवात वेगळे काय घडले तर समाजाने एकत्र येऊन सामूहिकपणे गणपती बसवायचे आणि सर्वांनी एकत्रित मिरवणूक काढून वाजतगाजत विसर्जन करायचे अशी प्रथा सुरू झाली. त्या निमित्ताने समाजातील सर्व घटक जात, पात, पंथ विसरून एकत्र येऊ लागले आणि आनंदाने एक सांस्कृतिक कृती करू लागले. सामाजिक ऐक्यासाठी ही घडामोड उपयुक्त ठरली.
सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्यता लगेचच मिळाली खरी पण तरीही त्याला काही घटकांकडून विरोध झालाच. घरातला गणपती रस्त्यावर आणून सामूहिकपणे गणेशोत्सव साजरा करणे अनेक रुढीवादी लोकांना आवडले नाही. पाश्चात्य विद्येमुळे प्रभावित झालेल्या तथाकथित सुधारकांना अशा प्रकारे हिंदू देवतेचा उत्सव साजरा करणे मान्यच नव्हते. हिंदू परंपरांची वेगळी चिकित्सा करणाऱ्या सत्यशोधक समाजालाही हा उत्सव पसंत नव्हता. मुस्लिमांमधील काहींना वाटले की हा उत्सव मुस्लिमांच्या मोहरमला आणि त्यातील ताबुतांना शह देण्यासाठी आहे. परिणामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच इंग्रज सरकारकडे त्याच्या विरोधात रुढीवाद्यांनी, सुधारकांनी, सत्यशोधकांनी आणि मुस्लिमांनी तक्रारी केल्या. पण इंग्रजांनी ताबडतोब काही उत्सवावर निर्बंध आणले नाहीत. हिंदूंच्या धार्मिक व्यवहारात शक्यतो हस्तक्षेप करू नये असे त्यांचे धोरण होते. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हिंदू व मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे सुरू झाले होते. त्यातून ब्रिटिशांनी धडा शिकला होता. ब्रिटिश सरकारने हिंदू किंवा अन्य धर्मियांच्या धार्मिक व्यवहारात हस्तक्षेप करायचा नाही, असे धोरण ठेवले होते. त्यामुळे त्यांनी गणेशोत्सवाकडेही दुर्लक्ष केले. खूपच तक्रारी आल्यावर इंग्रज सरकारने गणेशोत्सवावर काही निर्बंध घातले. अमरेंद्र गाडगीळ यांनी संपादित केलेल्या श्री गणेशकोश या महत्त्वाच्या ग्रंथात ही माहिती दिली आहे.

जनसामान्यांना संघटित करण्याची दृष्टी
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे जात, पात, पंथ, धर्म, लिंग असे सर्व भेदभाव दूर करुन समाजातील सर्व घटकांना एकाच भावनेने सामावून घेणारी गंगा आहे. गणेशोत्सवाचे हेच महत्त्व आहे, असे मला वाटते. पण उत्सवाच्या सुरुवातीपासून जनसामान्यांनी उत्सवाला महत्त्व देणे आणि अभिजनांनी नाके मुरडणे ही प्रथा कायम टिकली. उत्सवाला विरोध करण्यामध्ये रुढीवादी हिंदू, सुधारक, सत्यशोधकी अशा एरवी एकमेकांच्या विरोधात असलेल्या सर्व अभिजनांचे एकमत होते, हे विशेष. लोकमान्य टिळक मात्र सर्वसामान्यांना महत्त्व देणारे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी होते. त्यांनी त्यांच्या केसरी या वृत्तपत्रातून सार्वजनिक गणेशोत्सवाचे जोरदार समर्थन केले आणि उत्सवात विघ्न आणू पाहणाऱ्या तथाकथित सुशिक्षितांचा चांगलाच समाचार घेतला. सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्यांनी जे वैचारिक बळ दिले, त्यामागे त्यांची ब्रिटिश सरकारविरोधात जनसामान्यांना संघटित करण्याची दृष्टी होती.
दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत जनसामान्य आणि अभिजन हा भेद राहिला. गल्लीबोळातील सर्वसामान्य लोक पदरमोड करून आणि श्रम करून उत्साहाने सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करत असताना स्वतःला उच्च समजणाऱ्या अभिजनांनी उत्सवापासून फटकून राहण्याचा प्रकार कायम राहिला. स्वतः कधी उत्सवात सामील न होता, विधायक सूचनांच्या नावाखाली गणेशोत्सवात मोडता घालण्याचा या वर्गाचा प्रयत्न लपून राहिला नाही. संधी मिळेल तसा सरकारी निर्बंध आणण्याचा प्रयत्न करणे किंवा न्यायालयात याचिका करणे, यात ही मंडळी आघाडीवर असतात. सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रदूषणकारी ठरवून त्यात मोडता घालण्याचाही प्रयत्न असाच आहे. पण उत्सवाला लोकमान्यता असल्याने अशा अभिजनांचे प्रयत्न कधी यशस्वी झाले नाहीत.
वरील सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने (भाजप) यांनी हा विषय विधिमंडळात मांडला आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तत्काळ मान्यता दिली. स्वतः आशिष शेलार व हेमंत रासने हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आहेत, हे विशेष. देवेंद्र फडणवीस सरकारने गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे म्हणजे अखेरीस या उत्सवाला राजमान्यता मिळणे आहे. हा उत्सव कोण्या एका समुदायाची मक्तेदारी नाही. जात, धर्म, पंथ अशा सर्वांच्या पलिकडे जाऊन सर्वांना एकत्र आणणाऱ्या या उत्सावाला खरे तर खूप आधीच राजमान्यता मिळायला हवी होती. पण आता फडणवीस सरकारच्या काळात तरी ती मिळाली हे काही कमी नाही.
सार्वजनिक गणेशोत्सव ही राजकारणाची बालवाडी आहे. या उत्सवाच्या प्रक्रियेत अनेक नेते घडले आहेत आणि ही प्रक्रिया चालूच आहे. उत्सव साजरा करण्यासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही स्थानिक पातळीवर हिरीरीने सामाजिक कार्य करणारी केंद्रे असतात. परिसरात एखादे संकट आले तर मदतीसाठी सर्वप्रथम धावणारे मंडळाचे कार्यकर्तेच असतात. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारा आणि नवे कार्यकर्ते घडविणारा हा विलक्षण सोहळा आहे. मुख्य म्हणजे या उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये सर्व लोक भेद विसरून एकत्र येतात. एवढ्या मोठ्या उत्सवात काही डावे उजवे होणारच. पण त्याचे भांडवल करून उत्सवाला नाके मुरडणारे अभिजन आणि त्यांना साथ देणारी नोकरशाही आता तरी फडणवीस सरकारच्या निर्णयापासून बोध घेईल अशी अपेक्षा आहे.
राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करताना अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या महान परंपरेला हातभार तर लागेलच. पण सरकारी पातळीवर या निमित्ताने गणेशोत्सवाबद्दल सकारात्मकता निर्माण होईल, अशी आशा आहे.
– डॉ. दिनेश थिटे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून पीएच.डी.साठी ‘पुण्यातील गणेशोत्सव
आणि राजकारण’ या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.)