महायुती सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शासकीय कर्मचारी (Government Employees) यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ च्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीने दिला जाणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ वरुन ५० टक्के करण्यात आला आहे.
शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल. याआधी १ जानेवारी २०२३ रोजी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी ४२ टक्के महागाई भत्ता देण्यात आला होता. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये महागाई भत्ता वाढला नाही. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यात ४२ वरून ४६ टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यावेळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता नोव्हेंबरच्या वेतनात देण्यात आला होता.
राज्य सरकारने नुकतंच ऊर्जा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर आता राज्य शासनातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.