Saturday, July 27, 2024

मतदानाच्या दिवशी सुटी देणे बंधनकारक

Share

मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान या कर्तव्याचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. तर काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले की, संस्था/आस्थापना त्यांच्या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागते. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे राज्य शासनाने मतदानाच्या दिवशी सर्व संस्था, आस्थापना, खासगी, शासकीय संस्था, महामंडळे, उद्योग, व्यावसायिक आणि महामंडळाच्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. राज्यात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. नोकरी, व्यवसाय, रोजगारानिमित्त अनेकांनी स्थलांतर केले असले, तरी त्यांचे मतदान मूळगावी किंवा दुसऱ्या मतदारसंघात असते. मात्र अनेक मतदारांना मतदानाला जाण्यासाठी कामावरून सुटी दिली जात नाही. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने या संबंधीचा शासन निर्णय घेतला असून या विभागाचे कार्यासन अधिकारी शामकांत सोनावणे यांनी तसे आदेश काढले आहेत. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना कामाचा हक्क बजावण्यासाठी सुटी न देता कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. परवानगी देताना स्थानिक मतदारसंघातच ज्यांचे मतदान आहेत त्या मतदारांना मतदानासाठी दोन तासांची सवलत दिली जाईल, याची खात्री करून कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करणे शक्य न झाल्याबद्दल तक्रार आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी सुटी

पहिल्या टप्पा १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा २६ एप्रिल – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा ७ मे – रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण

अन्य लेख

संबंधित लेख