इचलकरंजी (कोल्हापूर) : ‘स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज… स्वराज्याचा स्वाभिमान!’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इचलकरंजी येथील श्री शंभुतीर्थ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी पुतळ्याला विनम्र अभिवादन केले.
‘हिंदवी साम्राज्याला समर्पित दिवस’
“ज्यांच्याबद्दल ‘देशधर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था’ असे म्हटले जाते, अशा स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली, याचा मला विशेष आनंद आहे. हिंदवी साम्राज्याला समर्पित असा हा आजचा दिवस आहे. इचलकरंजी या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेचे एक तेज पाहायला मिळते. त्यामुळे या शहराला भगवे शहर म्हणणे वावगे ठरणार नाही,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
CBSE च्या अभ्यासक्रमात आता आपला हिंदवी साम्राज्याचा इतिहास झळकत आहे, याचा सार्थ अभिमान असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.