Sunday, May 26, 2024

मुलांनी वाचावं म्हणून: निमित्त आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिनाचे!

Share

अभ्यासाचं महत्त्व सांगताना जगत्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘असाध्य तें साध्य करितां सायास…’ जे असाध्य आहे, ते साध्य करणं फक्त अभ्यासानं शक्य होतं, असा अभंगाचा अर्थ. अभ्यासाची प्रक्रिया रामदास स्वामी मांडतात, ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे…’ लेखन, वाचन, मनन, चिंतन म्हणजे अभ्यास असं संतवचनांमधून प्रकटतं. ‘आजकालची मुलं काही वाचत नाहीत,’ असं पालक सांगतात, तेव्हा माझ्या मनात प्रश्न उमटतो, की ‘मुलांनी चांगलं वाचलं पाहिजे, यासाठी पालक म्हणून, समाज म्हणून आपण काय करतो…’ आपण चार पावलं टाकली, तर पुढची पिढी शंभर पावलांची झेप घेते, असा माझा शिक्षण क्षेत्रात सतत विद्यार्थ्यांभोवती काम करतानाचा अनुभव आहे. दोन एप्रिलच्या आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिनानिमित्त या विषयावर मंथन व्हावं, ही अपेक्षा घेऊन काही ताजे अनुभव मांडू पाहतो आहे. हे अनुभव आहेत, डिसेंबर २०२३ मधल्या पहिल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट – एनबीटी) आयोजित या महोत्सवाच्या संयोजन समितीचा प्रमुख या नात्याने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अगदी प्रारंभापासून ठरवून निवडक उपक्रम हाती घेतले आणि त्याचं यश विश्वविक्रमाला गवसणी घालणारं ठरलं.

बालवयात कल्पनाशक्ती अफाट असते. प्रौढत्वात ज्याबद्दल कुतूहल वाटत नाही, अशा प्रत्येक गोष्टी बालवयात उत्सुकतेच्या असतात. कल्पनाशक्तीत परीकथा असतात. शौर्यकथा असतात. अनेकविध संकल्पनांबद्दल समजून घेण्याची ओढ असते. आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन १९६७ पासून ज्या हान ख्रिस्तियन अँडरसनच्या जयंतीदिनी साजरा होतो, तो लेखकही परीकथांसाठीच गाजलेला. मुलांच्या कल्पनाशक्तीला सामावणारं साहित्य भारतीय भाषांमध्ये विपूल आहे. हे साहित्य मुलांपर्यंत पोहोचावं, बालवाचक आणि बालकांसाठीचं साहित्य यांच्यातलं अंतर सांधावं, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतात, असं मला वाटतं.

हजारो मुलांनी काढली ग्रंथदिंडी
पुणे पुस्तक महोत्सव घ्यायचा ठरला, तेव्हापासून सतत हाच विचार केला आणि सगळ्यात आधी शाळा गाठल्या. पुणे शहर विद्येचं माहेरघर. इथल्या शाळांमध्ये असे अनेक शिक्षक आहेत, जे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढावी, म्हणून मेहनत घेतात. या साऱ्या शिक्षकांना, शाळांना, शाळांमधल्या विद्यार्थ्यांना एकत्र केलं, आणि महोत्सवाच्या जनजागृतीत त्यांनीच मोलाची भूमिका बजावली. पुणे पुस्तक महोत्सवाची पताका घेऊन हजारो मुलांनी पुणे शहरात ग्रंथ दिंडी काढली, तेव्हा हजारो विद्यार्थ्यांपर्यंत उद्घाटनापूर्वीच पुस्तक महोत्सव पोहोचला होता.

गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम
वाचनाची सवय गोष्टीतून लागते. गोष्टी ऐकत ऐकत आपण मोठे झालो, हे आपणच विसरतो. गोष्टी सांगणारे आई-वडील-आज्जी-आजोबा कुठंतरी हरवत आहेत. या आई-वडील-आज्जी-आजोबांना एका विशाल मैदानावर एकत्र केलं. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही त्यांना सांगितलं, की आज तुम्ही तुमच्या मुलांना गोष्ट सांगायची. मला अभिमान वाटतो, की या उपक्रमानं विश्वविक्रम केला. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हा विश्वविक्रम नोंदवला गेला. गोष्ट फक्त विश्वविक्रमाची नव्हती; रामायण-महाभारत, छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व ऐकत मोठ्या झालेल्या पिढीनं पुढच्या पिढीसाठी दिलेला हा वारसा होता. हजारो पालक त्यांच्या पाल्यांना गोष्ट सांगताहेत आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळत आहेत, हे दृश्य अभूतपूर्व होते. कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री पुणे पुस्तक महोत्सवात झाली. त्यामध्ये लहान मुलांसाठीच्या पुस्तकांचा मोठा वाटा होता, हे समाधानकारक होतं.

बालकांसाठी साहित्य प्रसिद्धी विचारपूर्वक
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे बालकांसाठी विचारपूर्वक साहित्य प्रसिद्ध केलं जातं. त्यासाठी देशाच्या विविध भागातल्या लेखकांना प्रोत्साहन दिलं जातं. मुलांसाठी खास पुस्तक जत्राही न्यास भरवतो. हा उपक्रम १९८३ पासून सुरू आहे. न्सासासह महाराष्ट्रात आणि देशभरात अनेक प्रकाशक केवळ बालकांसाठीच्या साहित्यनिर्मितीवर मेहनत घेतात. गोष्टी ऐकण्यापासून झालेली सुरुवात गोष्टी वाचण्यापर्यंत जाते, तेव्हा वाचनाची संस्कृती निर्माण होते. अशा संस्कृतीचं पोषण करावं लागतं. ‘मोबाईलवर मुलं फार खिळून बसली आहेत,’ हा तक्रारीचा सूर बदलायचा असेल, तर वाचन संस्कृतीच्या पोषणावर समाज म्हणून आपण साऱ्यांनी मिळून चार पावलं टाकली पाहिजेत. मला खात्री आहे, की मुलं शेकडो पावलं धावतील. पुणे पुस्तक महोत्सवात आम्ही हा प्रयत्न केला. मुलांनीही भरभरून प्रतिसाद दिला. हाच प्रतिसाद गावोगावी निर्माण करणं वाचन संस्कृती ठरेल.

राजेश पांडे
(लेखक राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख