२४ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या पाचव्या इंडिया इंटरनॅशनल स्पेस कॉन्क्लेव्ह’ (IISC 2026) या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी भविष्यात अंतराळातल्या वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानासाठी भारताचा व्यापक आराखडा मांडला. सध्या सुमारे ९ अब्ज डॉलर्स एवढ्या गुंतवणुकीत चालणारी भारताची अंतराळ व्यवस्था ४० ते ४५ अब्ज डॉलर्सपर्यंत ही नव्या जोमाने पुढील दहा वर्षाच्या काळात अत्यंत गतिमान पद्धतीने वाढेल. यामध्ये भारताच धोरण स्पष्ट आहे, स्वदेशी स्रोत, स्वदेशी तंत्रज्ञान आणि स्वदेशी प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांशी भागीदारी करत तंत्रज्ञान विकसित करण.
भारताने गेल्या सहा दशकामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) या माध्यमातून महत्त्वाच्या आणि जागतिक अंतराळ संशोधन संस्थांच्या बरोबरीने यशस्वी अंतराळ मोहिमा राबवल्या. जागतिक अंतराळव्यवस्थेच्या तुलनेत भारताने आज मीतीस भारताचा अंतराळव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीचा भाग हा केवळ २% पर्यंत मर्यादित होता. याचे महत्त्वाचे कारण अंतराळ क्षेत्रामध्ये संपूर्ण संशोधन करण्याचं कार्य सरकारी यंत्रणा करत होत्या.
अंतराळातील विविध उपक्रमांमध्ये म्हणजेच उपग्रह निर्मिती, विविध प्रक्षेपण करणारी यानं, सेन्सर्स, अंतराळात थांबण्यासाठी बनवले जाणारे प्लॅटफॉर्म, यासारख्या तंत्रज्ञानासाठी मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात केलेली गुंतवणूक हे दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणूक असते. भारतामधील अंतराळ क्षेत्रात केलेली खाजगी गुंतवणूक ही २०२१–२२ मधील १००.५ दशलक्ष डॉलर्सवरून मार्च 2026 पर्यंत ६१८.५ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे.
पूर्वीच्या काळी कमी असणारे अंतराळ तंत्रज्ञान या व्यवस्थेमध्ये असलेले स्टार्टअप २०२६ पर्यंत वाढून ४०० ते ५०० कंपन्यांपर्यंत विस्तारलेले आहे. हैदराबाद मधल्या स्काय रूट या खाजसब-ऑर्बिटल प्रक्षेपण करूनगी कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये विक्रम-एस या पहिल्या खाजगी रॉकेटचे यशस्वी सब-ऑर्बिटल प्रक्षेपण केल होत. नंतर आपल्या प्रक्षेपण याराचे पहिले पूर्ण क्षमतेचे यशस्वी उड्डाण केले. तसेच आयआयटी मद्रास च्या इनक्युबेशन सेंटर मधून निर्माण झालेले प्रक्षेपण पॅड श्रीहरीकोटा येथे उभारले. २०२४ मध्ये अग्निबाण SOrTeD मोहिमेद्वारे जगातील पहिल्या सिंगल-पीस थ्रीडी-प्रिंटेड सेमी-क्रायोजेनिक इंजिनचे यशस्वी उड्डाण करून त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात मोठी कामगिरी केली. पृथ्वी निरीक्षण आणि हायपरस्पेक्ट्रल उपग्रह इमेजिंगच्या क्षेत्रात भारतीय कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण केले आहे. कृषी, हवामान बदल, खाणकाम आणि सागरी देखरेखीसाठी उच्च-रिझोल्यूशन डेटा पुरवण्यात या कंपन्या आघाडीवर आहेत. लहान उपग्रहांचे प्लॅटफॉर्म, उपग्रह डिप्लॉयर्स आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक प्रोपल्शन प्रणाली विकसित करण्यात या कंपन्यांनी स्वदेशी क्षमता सिद्ध केली आहे.
९ अब्ज डॉलर्सवरून ४०–४५ अब्ज डॉलर्सपर्यंतचा प्रवास हा जवळपास पाचपट वाढ दाखवतो. स्पेस इकॉनॉमी २०३६: द इंडिया ब्लूप्रिंट आणि विविध औद्योगिक संस्था यांनी दिलेल्या माहितीनुसार या वाढीमध्ये चार प्रमुख विभागांचा मोठा वाटा असेल. ५० ते ५५ % वाटा हा अंतराळा मधील उपग्रहाद्वारे दिलेल्या सेवा मध्ये येतो. ग्रामीण व दुर्गम भागात हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट (LEO Satellite Constellations), डायरेक्ट-टू-मोबाईल (D2M) तंत्रज्ञान, सागरी व हवाई दळणवळण आणि बँकिंग व फायनान्शियल नेटवर्क्सच्या कनेक्टिव्हिटीमध्ये प्रचंड वाढ अपेक्षित आहे. पृथ्वीवर निरीक्षण ठेवण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असते त्याचा वीस ते पंचवीस टक्के चा वाटा असतो. यामध्ये रिमोट सेन्सिंग डेटा आधारित कृषी पिकासाठी लागणारा ताळेबंद, पाणी व्यवस्थापन, वनसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, आणि नागरी नियोजन या सेवांसाठी देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर लहान उपग्रहांच्या प्रक्षेपणाचे मागणी वेगाने वाढते आहे. हा तिसरा प्रकार झाला. इस्रोचे SSLV (Small Satellite Launch Vehicle) आणि स्कायरूट व अग्निकुल यांसारख्या खासगी कंपन्यांची रॉकेट्स एकत्रितपणे भारताला किफायतशीर प्रक्षेपणाचे जागतिक केंद्र बनवतील. शेवटच्या चौथ्या प्रकारात उपग्रहांची जोडणे, अँटेना रिसिव्हर्स आणि ग्राउंड स्टेशनच्या उभारणीचा कार्यभार येतो.
भविष्या मधील अंतराळ विज्ञान हे रॉकेट आणि उपग्रह यांच्या निर्मितीच्या पलीकडे क्वांटम तंत्रज्ञान (Quantum Technologies), सेमीकंडक्टर्स आणि अणुविज्ञान याच्या संशोधनात प्रचंड कार्य करेल . २०२३ मध्ये आठ वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्वांटम मोहिमेने (National Quantum Mission) अवघ्या तीन वर्षांत १,००० किलोमीटरपर्यंत सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन साध्य केले आहे. मूळ उद्दिष्ट आठ वर्षांत २,००० किमी होते. उपग्रह-आधारित क्वांटम की डिस्ट्रिब्युशन (QKD) मुळे भविष्यात बँकिंग आणि संरक्षण दळणवळण सुरक्षित होणार आहे. भारतात विकसित होत असलेल्या सेमीकंडक्टर मुळे उपग्रहांसाठी लागणाऱ्या रेडिएशन-हार्डन्ड चिप्स (Radiation-Hardened Chips) देशातच तयार होतील.
पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, बंदर आणि औद्योगिक कॉरिडॉर यांच्या व्यवस्थापनासाठी जीआयएस (GIS) आणि उपग्रह प्रतिमांचा वापर केला करण्यात येत आहे. मानव रहित रेल्वे क्रॉसिंग वर सिग्नल यंत्रणा, गाड्यांचे रियल टाईम ट्रेकिंग, आणि नैसर्गिक आपत्ती काळात रेल्वे साठी उपग्रह आधारित नेव्हिगेशन या प्रणालीमुळे (NavIC) रेल्वे यंत्रणेतील धोके टाळता येतील. स्वामित्व (SVAMITVA) या योजनेअंतर्गत ड्रोन आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागात जमिनीची मोजणी करणे आणि त्याचे नकाशे तयार करणे सोयीचे ठरेल. फसल (FASAL) प्रकल्पाद्वारे पेरणी क्षेत्र आणि उत्पादनाचा अचूक अंदाज वर्तवला जातो. टेलि-मेडिसिन आणि एड्युसॅट (EDUSAT) मुळे दूर अंतरावर असलेल्या शिक्षण प्रणालीद्वारे ईशान्य भारत, हिमालयीन प्रदेश आणि आदिवासी भागांपर्यंत शिक्षण, आणि अन्य सेवा पोहोचवणं शक्य होणार आहे. सीमेवर तैनात असलेले भारतीय जवान यांना सीमेवर 24 तास देखरेख ठेवणे शक्य होईल. त्याचप्रमाणे सागरी हद्दीमध्ये आणि भारतीय सीमांवर बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्यांना त्वरित रोखता येणे शक्य होईल. भारतीय सशस्त्र दलांना अंतराळ तंत्रज्ञानाद्वारे देशाची सुरक्षा करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होईल.
अंतराळ क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागणारे भांडवल-प्रधान आणि दीर्घकाळा नंतर परतावा देणारे क्षेत्र आहे. सरकारी निधी हा या क्षेत्रासाठी पुरेसा निधी देऊ शकत नाही. त्यासाठी जागतिक मोठ्या संस्था यांच्या परस्पर सहकार्याने हे क्षेत्र कार्यान्वित होतं. ४०–४५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ही भारतासारख्या देशासाठी अत्यंत मोठे गुंतवणूक असल्याकारणाने, केंद्र सरकारने २०२४ मध्ये थेट परकीय गुंतवणूक (FDI) धोरणात आमूलाग्र बदल केले. यापूर्वी अंतराळ क्षेत्रात परकीय गुंतवणूक केवळ सरकारी परवानगी नुसार आणि इस्रोच्या मर्यादित सहभागानेच शक्य होती. परंतु आता ही जबाबदारी भारतीय कॉर्पोरेट जगत, वित्तीय संस्था आणि स्टार्टअप्सवर आहे.