मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘आंखें’ चित्रपटातील एका जुन्या संवादाचा दाखला देत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “यांच्या मैत्रीत आता कुर्बानी नक्की कोण देणार?” असा खोचक सवाल उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे विचारला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी शरद पवार यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरावा, यासाठी संजय राऊत आग्रही आहेत. मात्र, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा दिला, तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे काँग्रेसला कठीण जाईल. म्हणजेच, एकाच वेळी दोन्ही नेत्यांच्या पदरात माप टाकण्यास काँग्रेस उत्सुक नसल्याचे चित्र आहे.
केशव उपाध्ये यांचे ट्विट (जसेच्या तसे):
“कुर्बानी देगा कौन?”
गोविंदा आणि चंकी पांडे यांच्या गाजलेल्या आंखें चित्रपटात कादर खान आणि सदाशिव अमरापूरकर यांच्यातला एक भन्नाट संवाद आहे. दोघे जिवलग मित्र… दोघेही बिंदूवर प्रेम करणारे… आणि पार्टीत बिंदू दोघांकडे सारखंच लक्ष देणारी.
तेव्हा सदाशिव अमरापूरकर म्हणतात,
“एकाला कुर्बानी द्यावी लागेल…”
आणि कादर खानचा थेट सवाल —
“कुर्बानी देगा कौन?”
आज हा संवाद आठवण्याचं कारण म्हणजे आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका.
महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते.
राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत, यासाठी संजय राऊत आग्रही.
पण काँग्रेसची अट स्पष्ट —
राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला, तर विधानपरिषदेला उद्धव ठाकरेना नाही.
म्हणजे समीकरण स्पष्ट —
एकाची अडचण ठरलेली.
आता खरी उत्सुकता याचीच…
या दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार?
शरद पवार? उद्धव ठाकरे?
की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार?
उपाध्ये यांच्या या ट्विटमुळे महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसला डावलून पवार आणि ठाकरे आपली सोय लावून घेणार की या तिन्ही पक्षांत पुन्हा एकदा ‘बिघाडी’ होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.