नवी दिल्ली : शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार (Mahadji Shinde Rashtriya Gaurav Award) जाहीर करण्यात आला. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
11 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल. ५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या पूर्वी शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.