Wednesday, December 4, 2024

काँग्रेस विचारसरणी म्हणजे नेमके काय? : महाराष्ट्र निवडणुक – भाग ३

Share

काँग्रेस विचारसरणी ( Thought Process) म्हणजे नेमके काय ?

मागील दोन भागात हा शब्द  आला आहे . पुढे येणार आहे म्हणून आज ह्याचा थोडा खुलासा.

काँग्रेस हे मुळात व्यासपीठ होते इंग्रजांनी स्थापन केलेले.

लोकमान्य टिळकांनी ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून खुबीने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली . व्यासपीठ चळवळ बनली. महात्मा गांधींनी आपले अहिंसेचे तत्वज्ञान समाजाच्या गळी उतरवण्यासाठी ह्या चळवळी ला माध्यम बनवले. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि खरं तर काँग्रेस चळवळीचे अस्तित्व संपले होते.

स्वातंत्र्य ह्या एकमेव उद्देशाने एकत्र आलेल्या विविध विचारसरणीचे हे *कडबोळे विसर्जित करा* असे गांधीजी म्हणाले पण सत्तेच्या लोभाने पछाडलेल्या मंडळीनी ते झिडकारले आणि काँग्रेसचे रूपांतर पक्षात झाले. त्या आधी लढवलेल्या निवडणुका काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून लढवल्या होत्या आता सत्ता मिळवणे , सत्ता टिकवणे आणि ती एकच व्यक्ती/ कुटुंब ह्या कडे राहणे ही विचारसरणी बनली 

त्यामुळे ह्यातील पाहिले तत्व होते ” हिंदूंची विभागणी आणि इतर अल्पसंख्यांक समाजाचे लांगुन चालन ” . पंडित नेहरूंनी  तथा कथित *नियती बरोबर केलेल्या करारा* चा प्रमुख मुद्दा हा होता आणि ह्या आधारावर राष्ट्र सर्वतोपरी ऐवजी सत्ता सर्वतोपरी हे ह्या कराराचे शीर्षक बनले .

मग समाजाचे भेद करताना धर्म , जात , भाषा ह्या गोष्टींना प्रोत्साहन देत धोरणे आखली गेली. त्याचा आमच्या सामजिक जीवनावर खोल परिणाम झाला. शिक्षण , साहित्य , कला सहित सर्व क्षेत्रा द्वारे हिंदू समाजाच्या सुप्त आणि प्रत्यक्ष मनावर हिंदुत्व नाकारण्याचे प्रयोग सरकार द्वारे केले गेले. त्याचे परिणाम हिंदूंचे *अहिंदूकरण* (dehindunisation)

झपाट्याने होत गेले. ह्यासाठी चर्च यंत्रणेला पणवापरले गेले . हे जे सगळे झाले ते म्हणजे काँग्रेस नावाची Thought Process. त्यामुळे आज अन्य पक्ष जे निर्माण झाले त्या सर्वांची स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर हीच निती राहिली कारण जवळ जवळ सर्वच पक्षांचे मुळ काँग्रेस होते.

ह्यातून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे , सजग राहणे अंतर्गत सुरक्षा नीट ठेवणे ह्या सगळ्या बाबींच्या कडे दुर्लक्ष झाले. शिक्षण हे राष्ट्रीय राहिलेच नाही. राष्ट्र , राष्ट्रीयता , राष्ट्रवाद हे शब्द म्हणजे ह्या विचारसरणीला उन्मादी वाटायचे. त्यामुळे छत्रपती शिवराय , राणा संग ,

राणा प्रताप , गुरू गोविंदसिंग हे राष्ट्रपुरुष ह्या विचार सरणीने नाकारले. अल्पसंख्य विशेष करून मुस्लिम समाजाला दुखावले जाईल असे कुठले ही कृत्य , विचार म्हणजे राष्ट्रद्रोही पणा आणि ताजमहाल पासून अजमेरचा दर्गा याचे उदात्तीकरण म्हणजे व्यापक , विशाल दृष्टीकोन असे समीकरण बनले. हिंदू आस्था , श्रद्धास्थाने ,  मुस्लिम आक्रमण होण्यापूर्वी असणाऱ्या वैभवशाली वास्तू ह्याकडे ह्या विचारसरणी ने पूर्ण दुर्लक्ष केले. कारण पंडित नेहरू यांनी तथा कथित *नियती बरोबर तसा करार* केला होता.

याचा परिणाम भारताच्या शेती धोरणात झाला. उद्योग धोरणात झाला . शिक्षण धोरणात झाला आणि आरोग्य धोरणात ही झाला. ह्या विचारसरणीचा ताबा सोयीस्करपणे डाव्यांनी कधी घेतला कधी भांडवल वादी वृत्तीने घेतला .  पण कुणाची प्रेरणा रशिया होती तर कुणाची अमेरिका किंवा ब्रिटिश होती. परिणामी ह्या विचारसरणीने भारत एक सनातन राष्ट्र म्हणून नाकारले आणि *नेशन इन मेकिंग* ही Thought Process ने सर्वत्र ताबा घेतला. 

मग त्याचा परिणाम गाय नाकारली गेली. सेंद्रिय शेती ऐवजी रासायनिक शेती आली. आयुर्वेद आणि योग हे आरोग्य धोरणातून नाकारले गेले आणि पाश्चात्य उपचार पद्धती आल्या. अभिजात भाषा , अभिजात संगीत पडद्याआड गेले त्यामुळे समृध्द ज्ञान आणि विज्ञान परंपरा नाकारली गेली . पाश्चात्य संगीत , साहित्य हे आमचे कलेचे धोरण बनले. उद्योगांना आत्मनिर्भर न होता दिशाहीन बनवले गेले. अनेक प्रकारचे उद्योग क्षेत्र अधिकृत बंदी होती. बाहेरून आयात करण्याचे धोरण आणि अल्प निर्यात यातून परकीय गंगाजळी नाममात्र राहत गेली. काँग्रेस विचारसरणी ( Thought Process) ने स्वातंत्र्यानंतर भारतीय आणि हिंदू समाजाला दिलेली हे देणगी आहे.

ह्या विचारसरणी ने पूजनीय *बाबासाहेब आंबेडकर* नाकारले. त्यांना अपमानित केले. छत्रपती लुटारू ठरवले. सावरकर ह्यांना माफी वीर बनवले.*सुभाषबाबू* बंडखोर फासिस्ट हिटलर बरोबर युती करणारे ठरवले गेले. *सुभाषबाबू* आणि बाकी क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य मिळवण्यात असणारे योगदान नाकारून काँग्रेस नावाच्या इंग्रज पुरस्कृत व्यासपीठा ने कसे स्वातंत्र्य मिळवले हे सांगितले गेले आणि त्याचवेळी फाळणीचे पाप मात्र झाकले गेले.

ह्या विचारसरणीने हिंदू समाजाला आत्मविस्मृत तर बनवले हा एक भाग झाला पण ह्यातून हिंदू समाजाचा *स्वबोध* किंवा *आत्मबोध* हरवला गेला आणि *शत्रूबोध* त्याला कळेनासं झाला. सर्वधर्म समभाव किंवा धर्म निरपेक्षता असले शब्द खुबीने पेरले गेले आणि धर्म / राष्ट्र या संकल्पना पणा चुकीच्या पद्धतीने समाजात पसरवल्या गेल्या.

तुम्ही म्हणाल ह्याचा महाराष्ट्र निवडणुकीत काय संबंध? काँग्रेस , शरद पवार काँग्रेस आणि ह्या दोघांच्या मांडीवर जाऊन बसलेली उद्धव सेना ह्यांचा जाहीरनामा , त्यांनी उलेमा , मौलवी ह्यांना दिलेली आश्वासने हे सर्व वरील *Thought Process* चे प्रतिबिंब आहे. मोदींनी काँग्रेस मुक्त भारत म्हंटले ते पक्ष म्हणून मुक्त नाही तर ह्या विचारसरणी पासून देश मुक्त करण्याची गरज आहे.

भगवे वस्त्र आणि सन्यस्त जीवन जगणाऱ्या लोकांची टिंगल करणारे काँग्रेस चे *राष्ट्रीय अध्यक्ष खरगे* स्वतः रझाकार आणि मुस्लिम दहशतवादाचे बळी आहेत. हैद्राबाद येथे त्यांचे घर , त्यांच्या मातोश्री , भाऊ याना रझाकार मंडळीनी जाळून टाकले. त्यांना काँग्रेस विचारसरणी ने हे विसरायला लावले. म्हणून *एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा किंवा *बटोंगे तो कटोंगे* ह्या घोषणा त्यांना नको वाटतात. काँग्रेस विचार सरणीच्या विकृत परिणामांचे आणखी काय उदाहरण देणार ?

*राष्ट्रवादी काँग्रेस* ह्या पक्षाचे सर्वेसर्वा *शरद पवार* ह्यांचे आयुष्य जाती विद्वेष निर्माण करण्यात आणि तशा संघटनाना निर्माण करण्यात, प्रोत्साहन देण्यात गेले . अठरा जातीत अठरा भेद निर्माण करण्यात त्यांनी बुध्दी पणाला लावली. पांडुरंग नाकारला. महाराज नाकारले. संतांना जातीत कोंडले . फुले, शाहू ,आंबेडकर ही नावे घेत शिवाजी महाराज, टिळक सावरकर ,नाकारायचे. हा सगळा काँग्रेस विचारसरणी चा परिणाम आहे. आणि एकीकडे फुले शाहू आंबेडकर नावे घेत त्यांच्याच विचाराला हरताळ फासत आपल्या पिढ्या मागून पिढ्या गब्बर करत राहायच्या हे ह्यांचे धोरण.

आणि त्यांच्या वळचणीला गेलेला *उद्धव ठाकरे* यांचा पक्ष ज्या भूमिका घेतो आहे हे बघितल्यावर ह्या Thought Process चा परिणाम कसा झपाट्याने होतो हे लक्षात येईल.  सत्ता मिळवण्याच्या एकमेव उद्देशाने 

आपण *स्व. बाळासाहेब ठाकरे* यांच्या निस्सीम अनुयायांना किती फसवत आहोत हे ते सिद्ध करत आहेत. 

देश वाचवायचा असेल त्याचा बांगला देश होवू द्यायचा नसेल , आंतरराष्ट्रीय गुंतागुंतीच्या परिस्थितीत भारताला सन्मानित ठेवायचे असेल , अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा मजबूत करायची असेल तर ही काँग्रेस *Thought Process* समजून घेवून ती नाकारण्याची संधी महाराष्ट्राच्या ह्या निवडणुकीने आम्हाला दिली आहे.  प्रश्न आहे ती संधी आम्ही घेणार का ? देशासमोर एक चांगले उदाहरण प्रस्तुत करणार का ?

रवींद्र मुळे, अहिल्या नगर.

भ्रमण ध्वनी: ९४२२२२१५७०

अन्य लेख

संबंधित लेख