Saturday, September 7, 2024

छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर

Share

भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान सदैव स्मरणात राहिले पाहिजे. त्यांची स्मृती कायम ठेवण्यासाठी २३ मार्च हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राचे योगदान सांगणारा हा लेख.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या यज्ञकुंडात असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली, त्यामधे छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा महाराष्ट्रही अग्रेसर होता. सन १८१८ ला पुण्याच्या शनिवारवाड्यावरुन मराठ्यांचा झेंडा खाली उतरवला गेला आणि पारतंत्र्याची भयाण रात्र सुरु झाली. अवघ्या दहा वर्षात पहिला क्रांतिकारी उठाव केला किल्ले पुरंदर पायथ्याशी रहाणाऱ्या उमाजी नाईक यांनी ! त्यांचा पराक्रम पाहून मॉकिंटॉश या इंग्रज अधिकाऱ्यानी त्यांचे वर्णन “महाराष्ट्राचा दुसरा शिवाजी” या शब्दात केले. या नंतर झालेल्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे नेतृत्त्व करणारे नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी, रंगो बापूजी गुप्ते हे सारे मराठीच होते. त्याच काळात भागोजी नाईक यांनी नांदूर शिंगोटे येथे भिल्लांचा उठाव घडवून आणला.

या संग्रामाला दारुण अपयश आल्यावर त्या नैराश्येच्या अंधःकारात वीजेसारखे कडाडले ते क्रांतीगुरु लहुजी वस्तादांचे शिष्य नरवीर वासुदेव बळवंत फडके ! त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन धगधगणा-या तीन यज्ञज्वाला म्हणजे दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे चापेकर बंधू ! २२ जून १८९७ ला उन्मत्त रँडचा वध करून त्यांनी आपल्या शौर्याचे उत्कट प्रदर्शन घडवले. पुण्यातील क्रांतिकारक डावरे बंधुंपैकी‌ माधव व बळवंत यांना एकवीस वर्षे अंदमानात ठेवले तर गोविंद डावरे यांना इंग्रजांनी जिवंत जाळून मारले.

याच काळात लोकमान्य टिळकांनी जहाल राष्ट्रवादाचा पुरस्कार करत तरुणांची मने प्रज्वालित केली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ” या त्यांच्या शब्दांनी देशभक्तीच्या असंख्य ज्योती धगधगू लागल्या. त्यातील एक तेज:पुंज व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर ! सावरकरांच्या ओजस्वी काव्याने समाजाला प्रेरणा मिळाली, त्यांच्या वैचारिक लेखनातून सशस्त्र क्रांतीला नैतिक अधिष्ठान मिळाले. त्यांच्या शौर्यकथांनी अवघे जग स्तिमित झाले. त्यांच्या सांगण्या वरुन सेनापती बापटांनी परदेशी क्रांतिकारकांकडून बॉम्ब बनवण्याची विद्या शिकून घेतली.

विदर्भाचे सुपुत्र पांडुरंग सदाशिव खानखोजे हे लोकमान्यांच्या सल्ल्यानुसार परदेशात गेले. अमेरिका व कॅनडा येथे लाल हरदयाळ यांच्या बरोबर ‘गदर’ पार्टीचे काम सुरु केले. तळेगाव ढमढेरेचे विष्णु गणेश पिंगळेही त्यांना सामील झाले. पहिल्या महायुद्ध काळात भारतात सशस्त्र उठाव करण्यासाठी पिंगळे भारतात परतले आणि रासबिहारी बोस यांच्या बरोबर कार्य करू लागले असताना ते पकडले गेले. ब्रिटिशांनी त्यांना फासावर लटकवले. पुण्याचा शिवराम हरि राजगुरु हा चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यांचा सहकारी बनला. साँडर्स वधामध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या वीरांनी माथेरान कर्जत परिसरात ब्रिटिश सरकार विरोधात कारवाया करून त्यांना सळो की पळो करून सोडले. सिद्धगडावर झालेल्या संग्रामात या दोन रणमर्दांना हौतात्म्य पत्करावे लागले .

सोलापूरच्या चार वीरांना पुण्याच्या कारागृहात फाशी देण्यात आले. त्यामुळे एक तरुण संतप्त झाला. तो होता वासुदेव बळवंत गोगटे ! त्याने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात हॉटसन या अधिकाऱ्यावर गोळी झाडली. पण हॉटसन त्यात मेला मात्र नाही. पुण्यातील काही रणमर्द वीरांनी लप्कर भागातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवला व चार इंग्रज ठार झाले. बॉम्बचे साहित्य पुरवणा-या भास्कर कर्णिक या प्रखर देशभक्तास अटक झाली असता त्याने जहाल विष प्राशन करून आत्मार्पण केले.
डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार शालेय वयात असतानाच त्यांची प्रखर देशभक्ती त्यांच्या कार्यातून दिसत होती. वैद्यकीय शिक्षणासाठी ते कलकत्ता येथे गेले. अनुशीलन समिती या क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य झाले आणि सक्रीय कार्यकर्ते बनले. १९२५ साली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

या सा-या कर्मवीरांची तप‌:श्चर्या अखेर फळाला आली. देश पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झाला ! १५ ऑगस्ट१९४७ ला पुण्याच्या आकाशवाणी वर गीत लागले होते…
फकीरांनी शत यज्ञ मांडले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये आरुण मंगल लाट
शतकानंतर आज पहिली पहिली रम्य पहाट

मोहन शेटे
(लेखक इतिहासाचे अभ्यासक असून इतिहास प्रेमी मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख