Thursday, January 15, 2026

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत

Share

नागपूर : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी २०२६) उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी लवकरच नागपूरच्या महाल परिसरातील भाऊजी दप्तरी शाळा (नाईट हायस्कूल) येथील केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मतदान हे कर्तव्यच!
मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरसंघचालकांनी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “लोकशाहीच्या रचनेमध्ये मतदान महत्त्वाची बाब आहे, लोकशाही व्यवस्थेत मतदान करणे हा केवळ आपला हक्क नसून ते एक सर्वोच्च कर्तव्य आहे. योग्य सरकार निवडण्यासाठी प्रत्येकाने बाहेर पडून मतदान केले पाहिजे. म्हणूनच आज दिवसाची सुरुवात मी मतदानाने केली आहे.”

मत देताना वैयक्तिक आवड-निवड बाजूला ठेवून सार्वजनिक हित आणि जनहिताचा विचार करावा. ‘नोटा’ (None of the Above) हा पर्याय असंतोष व्यक्त करण्यासाठी असला, तरी तो लोकशाहीसाठी फायदेशीर नाही. सर्वांना नाकारल्याने अप्रत्यक्षपणे चुकीच्या किंवा अवांछनीय उमेदवाराचा फायदा होऊ शकतो. “अराजक म्हणजे राजा नसणे, आणि ही स्थिती समाजासाठी सर्वात घातक असते,” असे सांगताना त्यांनी महाभारतातील भीष्म पितामहाचे उदाहरण दिले. उपलब्ध उमेदवारांपैकी जो सर्वात योग्य आणि जनहिताचा विचार करणारा वाटतो, त्यालाच मतदान करणे अधिक श्रेयस्कर आहे असे ते म्हणाले.

आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह एकूण २९ मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुका पार पडत आहेत. ९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज सायंकाळी ५:३० पर्यंत मतदान सुरू राहणार असून, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख