Wednesday, January 14, 2026

वीस लाख प्रवाशांना रोज मिळणार पीएमपीची सेवा

Share

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२६ पर्यंत सुमारे २,५०० नव्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, असे आश्वासन पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. या विस्तारामुळे पीएमपीएमचा ताफा ४,००० गाड्यांचा होईल तसेच दररोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मोहोळ यांनी पर्वती मतदारसंघात पदयात्रा आणि रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सार्वजिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भाजपचा भर असून त्यासाठीच मेट्रो आणि पीएमपी या दोन्ही सेवा कार्यक्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.


शंभर नवीन मार्ग, बस फेऱ्यांचा आढावा
विस्तारित पीएमआरडीएसह शहरातील बस मार्ग व फेऱ्यांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. ताफ्यात एक हजार ई-बस आणण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. या गाड्या केंद्र सरकारने मंजूर केल्या आहेत. सध्या ३९४ मार्गांवर सेवा देणाऱ्या पीएमपीच्या मार्गात आणखी किमान १०० नवीन मार्गांची भर पडेल. त्यामुळे उपनगरातील दुर्लक्षित भाग, झपाट्याने विकसित होत असलेले शहराबाहेरील परिसर तसेच औद्योगिक आणि आयटी हब्सपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असाही दावा मोहोळ यांनी केला.

पंचवीस इलेक्ट्रिक डबल-डेकर
पर्यावरणपूरक आणि गतिमान वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पीएमपीकडून २५ इलेक्ट्रिक दुमजली (डबल-डेकर) गाड्या भाडेतत्त्वावर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या वर्षात पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा डबल-डेकर धावणार आहेत. सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर मार्गांवर १० दिवसांची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली होती. बॅटरी क्षमता, ऊर्जा कार्यक्षमता आणि शहरातील वाहतूक परिस्थितीसाठीची उपयुक्तता तपासणाऱ्या तज्ज्ञ समितीच्या सकारात्मक अहवालानंतर या गाड्यांना हिरवा कंदील मिळाल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

प्रमुख डबल-डेकर मार्ग
हिंजवडी फेज ३ (वर्तुळाकार)
रामवाडी मेट्रो स्थानक – खराडी
मगरपट्टा सिटी – कल्याणी नगर मेट्रो
पुणे रेल्वे स्थानक – लोहगाव विमानतळ
देहू – आळंदी
चिंचवड – हिंजवडी

नव्या गाड्यांसह पीएमपी सेवेचा विस्तार
२०२६ पर्यंत २,५०० नव्या गाड्या ताफ्यातएकूण ताफा ४,००० गाड्यांचा
रोज १८ ते २० लाख प्रवाशांना सेवा
१०० नवीन बस मार्ग प्रस्तावित
२५ इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेसकेंद्राकडून १,००० ई-बसना मंजुरी

अन्य लेख

संबंधित लेख