मुखेड : “ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुखेड नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी आहे. तुम्ही फक्त २० तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, मुखेडच्या जनतेची आणि इथल्या प्रगतीची काळजी पुढची ५ वर्ष आम्ही घेऊ,” असे आश्वासक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार विजया पत्तेवार आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ‘महाविजय संकल्प सभेत’ ते बोलत होते.
मुखेडच्या विकासासाठी मुख्यमंत्री यांनी मोठ्या घोषणा केल्या. सभेला संबोधित करताना त्यांनी मुखेडवासीयांसाठी विकासाची शिदोरीच उघडली. रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने बोधन–मुखेड–लातूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मुखेड येथे MIDC स्थापन करण्याची मागणी पूर्ण करण्यात येणार असून, त्यामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. शहराच्या नागरी सुविधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव तसेच भूमिगत गटार योजनेला मंजुरी देण्यात येणार असून, यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
“आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या रूपाने मुखेडला एक अभ्यासू नेतृत्व लाभले आहे. आता त्यांना साथ देण्यासाठी विजया पत्तेवार यांच्यासारख्या सुशिक्षित नगराध्यक्षांची गरज आहे,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या महाविजय संकल्प सभेला खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार जितेश अंतापुरकर यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.