मुंबई : मुंबई (Mumbai) उपनगरचे सह पालकमंत्री तथा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींविरोधात मालवणी परिसरात मोहीम उघडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोढा यांनी थेट मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख (MLA Aslam Shaikh) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वैयक्तिक धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मंत्री लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
लोढांची रोहिंग्यांविरोधात मोहीम
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अस्लम शेख यांच्या मतदारसंघात (मालवणी) वास्तव्याला असलेल्या हजारो रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींविरोधात कठोर मोहीम उघडली आहे. प्रशासकीय पाठपुराव्यामुळे त्या भागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ९ हजार चौरस मीटरचा सरकारी भूभाग अतिक्रमणमुक्त केला असून कारवाई अद्याप सुरूच आहे. लोढा यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असतानाही आमदार अस्लम शेख मालवणीत अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालून मुंबईच्या सुरक्षेशी खेळत आहेत.
पोलीस आयुक्तांना लिहिलेले पत्र
श्री देवेन भारती जी.
मुंबईतील मालवणी परिसरामध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून काही निवासी बांधकामे करण्यात आलेली आहेत. या बांधकामांमध्ये अवैधरित्या रोहिंग्या व बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे कळते. शासनाच्या जागेवरील हे अतिक्रमण हटविणे, तसेच अवैधरित्या वास्तव्य करून राहणाऱ्या रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात माझ्या मार्फत अतिक्रमण हटविण्याची मोहीम चालू करण्यात आली होती.
परंतु, मलाड मालवणी परिसरातील लोकप्रतिनिधी श्री. अस्लम शेख, स्थानिक आमदार हे सातत्याने समाज विघातक गोष्टींना अभय देत असून भारतीय संविधानाच्या मुल्यांना ठेच पोहचविण्याचे काम करत आहेत. एका विशिष्ट समुदायाच्या माध्यमातुन सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम श्री. अस्लम शेख हे करत आहेत. तसेच, श्री. शेख हे शासकीय कामकाजात सातत्याने अडथळा निर्माण करत आहेत.
त्यांनी मला व माझ्या कुटूंबियांना वैयक्तिकरित्या धमकी दिलेली असून याबाबतच्या व्हिडीओ ची लिंक सोबत देण्यात येत आहे. तरी, याबाबत कठोरातील कठोर कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ उचित कार्यवाही करण्यात यावी.
भाजपची कठोर कारवाईची मागणी
या धमकीच्या घटनेवर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. साटम यांनी आमदार अस्लम शेख यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.